Login

वांझोटी... भाग:२

A Story Of Women
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - वांझोटी...
भाग: २


“तुझे रिपोर्ट्स ओके आहेत, काहीच कॉम्प्लिकेशन्स नाहीत. तुला अजून काही डाऊट्स असल्यास काही टेस्ट्स कराव्या लागतील. आय विल रेफर यू टु रिस्पेक्टीव्ह लॅब्स.” डॉक्टरांनी तिची फाईल बंद करत म्हटले.

“एक स्त्री बाळ नाही म्हणून प्रत्येक डॉक्टरकडे जाते. तेच रिपोर्ट्स पुन्हा घेऊन येते. पण डॉक्टरांची गणिते पक्की असतात, शरीरात बदल नसतानाही.” ती स्त्री हसत म्हणाली.

“म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला? कारण नसताना आम्ही टेस्ट करायला सांगतो? कमिशनसाठी? बुल-शीट. कधी कधी एक्झामिनेशन, ऑब्जर्व्हेशन चुकीचे होऊ शकते किंवा महत्त्वाच्या गोष्टींसाठी क्रॉस एक्झामिनेशन आवश्यक असते.” डॉक्टर जरा रागातच म्हणाले.

तरीही ती स्त्री शांतच होती.

“हो. रिपोर्टस् चुकीचे होऊ शकतात, महत्त्वाच्या गोष्टी स्कीप सुद्धा होऊ शकतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे क्रॉस एक्झामिनेशनसाठी पुन्हा टेस्ट करणे आवश्यक असते. ओके डॉक्टर. डॉक्टरांवरच्या विश्वासाने अर्धा आजार बरा होतो, आणि उरलेला, त्यांनी दिलेली औषधे विश्वासाने घेतल्यावर नाहीसा होतो. माझ्यासारखी लोकं डॉक्टरांवर देवापेक्षा जास्त विश्वास ठेवतात. पण तो विश्वास कायम राहतोच असे नाही. जेव्हा याच देवाकडून दैत्याचे वार होतात, तेव्हा मनातून त्यांच्यासाठी असह्य हाय येते.” असे म्हणत तिने आपले डोळे डॉक्टरांच्या नजरेत रोखले.

“हे बघ, तुझे आधीचे अनुभव विसर. मी नाही म्हणत माझ्यावर विश्वास ठेव. पण एवढेच सांगतो, मी माझ्या प्रोफेशनशी खूप प्रामाणिक आहे आणि कदाचित हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.” डॉक्टरनी आपली नजर हटवत म्हटले.

“हो डॉक्टर. विश्वास आहे माझा. इन फॅक्ट मी फक्त तुमच्यावरच विश्वास ठेवू शकते.”

“रिलॅक्स. झोप इथे, टेक अ डीप ब्रिथ.” डॉक्टर आपल्या खुर्चीवरुन उठत म्हणाले.

ती आपल्या जागेवरुन उठली आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तपासणीसाठी झोपली. तिने श्वास घ्यायला सुरुवात केली. डॉ. रवी तिच्या श्वासांचा वेग लक्षात घेऊन सांगू लागले.

“रिलॅक्स. घाबरण्यासारखे काहीच नाही. दीर्घ श्वास घे. हळू हळू…”

“डॉक्टर, मी खूप प्रयत्न करते. पण नाही सावरू शकत. दर महिन्याला दिवस मोजते, कन्सीव होण्याची गणिते मांडते. माझे बीज कधी फलित होणार, त्या तारखा माझ्या डोक्यात ठाम असतात. त्या रात्री शरीर खूप काही सांगू लागते, मी त्याच्या स्पर्शाने आसुसलेली असते, मनातच त्याच्या प्रेमाने स्वतःला चिंब भिजवते आणि तो जवळ आला की हृदयाचे ठोके दुप्पट होतात. पूर्ण काया त्याच्या उबेने पेटून उठते. तो पलंगावर जवळ आला की, वाटते की त्याच्यात विलीन व्हावे. तो स्मित देतो, गुड नाईट म्हणतो आणि झोपतो. मी मात्र श्वास, भावना सावरण्याचा प्रयत्न करते. पण तेही वांझोटे ठरतात, माझ्यासारखेच.” असे म्हणत तिने आपले डोळे बंद केले.

“बी रिलॅक्स. ब्रिथ इन स्लोली… ब्रिथ आऊट स्लोली… फॉलो माय काऊंट १… २… ३… ४… रिलॅक्स… गुड… व्हेरी गुड.”

“हं...”

“आय थिंक यू लिव इन द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. तुझ्या शरीरावर तुझ्या मानसिक स्थितीचा जास्त प्रभाव आहे. युवर फिजीक इज कमांडेड बाय युवर मेंटल स्टेट. परहॅप्स थॉट्स कॅन बी वन रिझन फॉर नोट कन्सिव्हिंग.”

“वर्ल्ड ऑफ फॅन्टसी? एका स्त्रीने आपल्या नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक सुखाची अपेक्षा ठेवणे ही फॅन्टसी कशी असू शकते डॉक्टर?”

“मॅडम, कधी कधी पुरुषाची इच्छा नसते. कामाचा व्याप, थकवा, टेन्शन, स्ट्रेस बर्‍याच गोष्टी असतात. फक्त तुमची इच्छा आहे म्हणून, यू कॅन नॉट फोर्स अँड मेक हिम टु डू इट.”

“आय कॅनोट, बट ही कॅन. जर त्याची इच्छा असेल, तर ती शारीरिक क्रिया घडतेच. माझी इच्छा नसतानाही. डॉक्टर, तो संभोग नसतो, तो स्वयंभोग असतो. फक्त माझ्या शरीराचा उपयोग होतो. माझी इच्छा असो किंवा नसो.”
ती उठून बसली. डॉक्टर ही पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसले.

“मला वाटते तू साध्या साध्या गोष्टी जास्त कॉम्प्लीकेटेड करत आहेस.” डॉक्टर हसत हसत म्हणाले.

" हसायला काय झाले डॉक्टर?" ती पुन्हा खुर्चीवर येऊन बसली.

“स्वयंभोग? काय म्हणायचे आहे तुला? सगळे पुरुष आपल्या बायकोवर बलात्कार करतात का? नवरा-बायको म्हणजे एक म्युच्युअल रिलेशनशिप आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आय थिंक आय एम वेस्टिंग माय टाईम विथ यू. तू जाऊ शकतेस.” डॉक्टरच्या मनातला राग स्पष्ट झळकत होता.

“आय एम युवर पेशंट, डॉक्टर. डोन्ट फरगेट, आपलेही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होते ना? आमचेही खूप चांगलं नातं होतं.”

“होतं?” डॉक्टरनी गंभीर स्वरात विचारले.

“होतं. पण सध्या त्या नात्यावर मळ साचला आहे, पैशांचा, महत्त्वाकांक्षी असण्याचा, स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याचे अस्तित्व नाकारण्याचा मळ. खरे तर आता काहीच वाटत नाही. हे असेच, न बदलणारे आहे. हे मी गृहीत धरलेच आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आय हॅव अक्सेप्टेड इट. नो कंप्लेंट्स, नो रिग्रेट्स.”

यावर डॉक्टर जरा चिडले.

“असं असेल तर तुला मूल का हवं आहे?”

“कारण मला आई व्हायचे आहे. मला माझे ममत्व संजिवीत करणारे बाळ हवे आहे, माझ्या हृदयाच्या ठोक्यांसोबत त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची जाणीव करून देणारे स्पंदन हवे आहे. माझ्यात त्या नाजूक अंकुरलेल्या जीवाचे ब्रह्मांड हवे आहे. क्षणोक्षणी माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा, माझ्यात तरंगणारा, फुलणारा, चैतन्य जागवणारा मला माझा अंश हवा आहे.एका नवनिर्मितीचा, अविस्मरणीय, अलौकिक, सुखद अनुभव मला हवा आहे . मला आई व्हायचे आहे. मला माझे बाळ हवे आहे.”

" स्टॉप इट. तुला औषधांची नाही, तुला काऊन्सिलिंगची जास्त गरज आहे. जर माझ्याकडून ट्रिटमेंट घेणार असशील, तर ‘मला मूल हवं आहे ’ हे वाक्य आधी डोक्यातून काढ. सतत तू मेंदूला सांगतेस ‘मला मूल हवं आहे ’, ‘मला मूल होत नाही’, हे तुला सायकॉलॉजिकली कमकुवत बनवते. मग त्याचा निगेटिव्ह इफेक्ट तुझ्या फिजिकवर होतो. विसर की तू बाळ होण्यासाठी काही तरी करत आहेस. जस्ट बी नॉर्मल अँड हॅप्पी. कसलीच चिंता न करता, मस्त जग.”