Login

वांझोटी... भाग:३

A Story Of Lady
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - वांझोटी...
भाग: ३

“ विसरून? तुम्ही विसरू देणार? हा समाज मला विसरू देणार का?”

“म्हणजे?”

“ हं म्हणजे? गोड बातमी कधी देताय? तुम्ही आजकालची मुलं फार फॅमिली प्लॅनिंग करता, हो की नाही? अगं सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. मग, कधी हलवताय पाळणा? द्या ना आता गोड बातमी. आम्ही बाळाचे आजी-आजोबा, मामा-मामी, मावशी-काका-काकू, थांबलो आहोत... का तुम्ही उशीर करताय? हं... कारण काय?” ती वेगवेगळ्या आवाजात बोलली.

“कारण, कारण... नको आहे मला मूल.” डॉक्टर दात ओठ खात म्हणाले.

“रिलॅक्स... तुम्हाला नको आहे, पण तुमच्या बायकोलाही नको का? समाजाच्या प्रश्नांना तिच्याकडे नसलेली उत्तरे ती कशी देत असेल?" तिने प्रश्न केला.

“ म्हणजे मी कधी या विषयावर...” डॉक्टर जरा गडबडले.

“कधीच नाही बोललात, हो ना? या प्रश्नांची उत्तरे द्यायला नको वाटते. कधी कधी एवढा संताप येतो की वाटते ओरडून मोठ्या आवाजात जगाला सांगावे, आम्ही शारिरीक सुख घेताना करताना गर्भनिरोधक गोष्टी नाही वापरत, मी कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेटस घेत नाही, आमचा संसार आहे. आम्ही मूल नसताना असेही जगू, तुम्हाला काय करायचे आहे? काय तर काळजी म्हणे, त्यांचा वेळ जावा, बोलायला विषय मिळावा म्हणून ही काळजी.” तिच्या बोलण्यात आता दुःख जाणवू लागले होते.

इतका वेळ हसत खेळत सांगणारी ती आता आतून तुटल्यागत बोलू लागली होती.

“या गोष्टी तू खूप मनाला लावून घेतेस. बुद्धांचा एक विचार आठवतो, 'डू नॉट गेट अप्सेट विथ पीपल ऑर सिच्युएशन, बोथ आर पॉवरलेस विदाऊट युवर रिॲक्शन.' तुला कळतं का? मला काय म्हणायचे आहे ते.” असे म्हणत डॉक्टर तिच्याजवळ गेले.

“मी रिॲक्ट झाले नसते, पण... माझ्या हातातून वेळ निसटून जात आहे. स्त्रीच्या जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या मातृत्वाला मी मुकते आहे. बाळ नेहमी दोघांचे असते, पण उत्तरे फक्त स्त्रीलाच द्यावी लागतात. त्यात निसर्गसुद्धा पुरुषप्रधान ठरतो.”

“निसर्ग?”

“हो. डॉक्टर, तुम्हाला माहित आहे, पुरुषांसाठी जननेंद्रिये साधारण किती वयापर्यंत सक्रिय असतात?”

“वेल, इट डिपेन्ड्स ऑन पर्सन टु पर्सन, बट ऑन ॲन ॲवरेज इट कॅन गो अबोव सिक्स्टी.”

“आणि एका स्त्रीसाठी?”

“अगेन, इट डिपेन्ड्स ऑन पर्सन टु पर्सन. पण पस्तीस ते चाळीस. जास्तीत जास्त पंचेचाळीस.” डॉक्टर म्हणाले.

“म्हणूनच म्हणते निसर्गसुद्धा पुरुषप्रधान आहे. हा अन्याय नाही का?”

“आता तुझ्यापुढे देव जरी आला, तरी तू त्याला ही अन्यायी म्हणशील. कम ऑन, निसर्गनियम आहेत ते सर्वांच्या भल्यासाठी. तू नको तिथे लक्ष आणि शक्ती वाया घालवतेस. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन काय करणार आहेस? ही लोकं येणार आहेत का तुझ्या बाळाला सांभाळायला? नाही ना? तू तुझ्या नवऱ्याबरोबर आहेस ना सुखी? मग का देतोस महत्त्व लोकांच्या वायफळ बोलण्याला. यू विल एंड अप विथ नथिंग.”

“हो, बरोबर आहे डॉक्टर. गेली चार-पाच वर्षं जिथे जावे तिथे लोकांच्या प्रश्नांचा भडिमार नकोसा होतो. हळू हळू मित्र-मैत्रिणी मागे सोडून आले. डोक्यात फक्त एकच विचार असतो, कधी मी आई होणार? माझ्या उरात ती धडधड कधी सुरू होणार? कधी तो नाजूक जीव मी माझ्या हृदयाशी घट्ट धरणार?”

“आय थिंक यू शुड कीप युवर सेल्फ बिझी. ‘इम्टी माइंड इज डेविल्स वर्कशॉप’. तुला जे आवडेल ते कर. वाचन, गायन, पाककला? स्वतःला गुंतवून ठेव.”

“गुंतवून? हा माझा प्रयत्न झाला आहे ही घुसमट घालवायला."

“ म्हणजे तुला मुलाला जन्म देणे हे एकमेव ध्येय वाटते. किती स्त्रिया मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. पण त्यांनी जगायचे सोडले नाही. त्यांचे आयुष्य थांबत नाही. लाइफ गोज ऑन अँड ऑन. आपले दुःख विसरून ते आपल्या फील्डमध्ये नाव कमवतात. कोणी मुलं दत्तक घेऊन एका अनाथाला हक्काची नाती, स्वतःचे घर देतात. तुझ्या बाबतीत तर सगळे नॉर्मल आहे, पण तुला मानसिकता बदलावी लागेल.”

“मानसिकता? तुम्ही माझी मानसिकता अगदी अचूक जज केलीत. पण त्या मानसिकतेची कारणं ॲनालाइज करायला तुम्ही विसरलात, डॉक्टर. लग्नानंतर मी एक बायको, सून म्हणून जगत राहिले. या जगण्यात मी पूर्णपणे रिती झाली. आता जाणवत आहे की स्वतःचे अस्तित्व विसरून पुरुषाच्या अधीन होणे हा मूर्खपणा आहे. त्याच्या आयुष्यात आपलेही स्थान आहे, याची जाणीव करून देण्याचे प्रयत्न जेव्हा होतात, तेव्हा त्रास होतो, खूप घुसमट होते.”

“यू नो व्हॉट? तुझ्या या स्थितीला वेड म्हणतात, वेड, आणि वेड्यांचा उपचार माझ्या हातात नाही.” डॉक्टर हसले.

डॉक्टरांचे हसणे तिला चिरून गेले. ती तशीच उभी राहीली.

“हो, वेडच आहे. आई होण्याचे वेडच लागले आहे मला. दर महिन्याला पाळी येते आणि मी सतत ओवुलेशन डेज मोजते. पुन्हा पाळी येणार की नाही, गर्भ असेल की नाही? हेच प्रश्न सर्वकाळ व्यापून ठेवतात. पाळीचा एक दिवस सुद्धा पुढे गेला की वाटते, कदाचित कन्सीव्ह झाले आहे. दोन-तीन दिवस पुढे गेल्यावर तर वाटते शरीरात काहीतरी बदल होत आहेत. मनात इवल्याशा जीवाच्या आगमनाची नकळत स्वप्ने रंगतात. मातृत्वाची हलकी झुळूक स्पर्श होते आणि अचानक लख्ख उजेडाला गिळून खिन्न काळोख समोर यावा तसे या स्वप्नांना चिरून गर्भाशयाचे लाल अश्रू वाहतात. माझे स्वप्नातले मातृत्व भेदून वाहणारे, सर्व आशा आकांक्षा रितं-रितं करून गळणारे. गर्भाशयात एक पोकळी निर्माण होते कारण जतन करण्यासारखे काहीच नसते. नको वाटते, नको. ते लाल भडक गर्भाश्रू काही क्षणांसाठी झोपलेला न्यूनगंड पुन्हा जागा होतो. न्यूनगंड आणि निराशा क्षणाक्षणाला जाणीव करून देतात की, मी वांझोटी आहे. हो, मी वांझोटी आहे.” ती मोठमोठ्याने रडत म्हणाली.

“स्टॉप इट, माधवी… बस्स झाले आता.” असे म्हणत डॉक्टरांनी तिला मिठीत घेतले.

ती काहीही न बोलता डॉक्टरांच्या छातीवर आपले डोके धरुन रडत होती.

“माधवी, तसे काही नाही आहे. तू मुळीच तशी नाहीस आणि खबरदार, पुन्हा तो अपशब्द उच्चारलास तर… खरे तर तुझ्यात काही कमतरता नाही. मीच कमी पडलो, तुझा नवरा म्हणून. आय ॲम सॉरी, माधवी. मला माफ कर. तुझ्या मनात उठणाऱ्या वादळाला वाट मोकळी करून द्यायला तुला माझ्यातील डॉक्टरला भेटावे लागले." डॉक्टरांचे डोळेपण आता ओले झाले होते.

" आणखी काय करु शकत होते मी?"

“तू जेव्हा क्लिनिकमध्ये आलीस, तेव्हा मला खूप संताप आला, वाटले तुला इथून हाकलून द्यावे. पण तुझ्या बोलण्याने गांभीर्य वाढले. आज मी फक्त तुझा नवराच नव्हतो, तर एक डॉक्टर पण होतो. माधवी, आय ॲम रिअली फिलिंग गिल्टी. कधीच का बोलली नाहीस हे? तुझ्या इच्छा का मारत राहिलीस? मी तुला कुठल्याही कन्सीव्ह झालेल्या पेशंटबद्दल सांगायचो तेव्हा, तुला किती कुतूहल वाटायचे, किती कौतुक. पण तुझ्या डोळ्यात मी माझा अभिमान पाहत होतो. त्या पाणावलेल्या डोळ्यात तुझी मातृत्वाची आसवे पाहण्यास मी असमर्थ ठरलो. मला माहीत आहे, कितीतरी कॉम्प्लिकेशन्स असलेल्या पेशंटला पॉझिटिव्ह रिझल्ट दिला आहे मी. तुला या विषयावर माझ्याशी बोलावसे कधीच वाटले नाही. मी इतका तुझ्यापासून दुरावलो आहे का?”

“तू शिखरावर चढताना, तुला माझा अडथळा होऊ नये म्हणून माझ्या इच्छांना गारठून ठेवले. वाट पाहत राहिले तू कधी वळून बघशील की, मी किती मागे राहिले. खऱ्या अर्थाने तुझ्या सोबत चालण्यासाठी, तू कधी तुझा हात पुढे करशील, याचीच वाट पाहत होते मी.”

यावर डॉक्टरांनी हात पुढे केला.

“माधवी, इथून पुढे तू एकटी नाहीस. तुझे मातृत्वाचे स्वप्न मी नक्की पूर्ण करीन. पण त्या आधी तुझे हरवलेले अस्तित्व मला पुन्हा निर्माण करायचे आहे. मी स्वतःभोवती एवढा गुंतून गेलो होतो की, मला माझ्याभोवती सतत राबणाऱ्या जीवांचा विसर पडला. माझ्यातला तो इमोशनल, सेन्सिटिव्ह माणूस मरून गेला होता. पण तू मला भानावर आणलेस. आता माझ्या मनाला तीव्र इच्छा आहे... बाप होण्याची.”

“खरंच?”

“हो, माधवी. आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ.” असे म्हणत डॉक्टरांनी तिला मिठीत घेतले.


समाप्त

0

🎭 Series Post

View all