वर्गमित्र भाग 5

मैत्रीच्या नात्याला हळुवार स्पर्श करणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र जरूर वाचा.

वर्गमित्र - 5
©®राधिका कुलकर्णी.

मुलांचा होमवर्क,जेवणे सगळे अावरले.श्रीलाही लायन्सच्या  मिटींगहुन यायला उशीर होणार होता.
उद्याची सकाळची थोडी तयारी म्हणुन मी भाजी चिरणे,कणिक मळणे अशी कामे उरकत होते.
डोक्यात मात्र विचारचक्र चालूच.
काय होऊन बसले हे? 
प्रसाद रागात बोलला की आपले बोलणे खरच त्याला पटले.??
विचारातून बाहेर यावे म्हणुन बेडवर पडल्या पडल्या मी मासिक चाळत होते पण कसचे काय?
अचानक मन भूतकाळात गेले.
लग्न होवुन 2/3 वर्षेच झाली असतील.दिड वर्षाच्या सोहमला घेवुन कसल्याशा समारंभानिमित्त मी माहेरी गेले होते.
कार्यक्रम यथासांग पार पडला पुन्हा परतीच्या प्रवासाला निघायची गडबड सुरू झाली.
सगळ्यांचे निरोप घेत, डोळ्यांच्या कडा टिपतच आईला नमस्कार करायला तिच्या खोलीत गेले.तिने आशीर्वाद देऊन तिचे हात माझ्या हातात घेतले.
हातात कागदाची पुडी ठेवल्याचा भास झाला.मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत काही बोलणार तोच तिने डोळ्यांनी गप्प राहण्याचा इशारा केला.बाजुला दादा वहिनी उभे बघुन मीही गप्प झाले.
कदाचित वहिनीच्या नजरेने ते हेरले की काय कोण जाणे पण आई लगेच म्हणाली,
"अग् शेजारच्या कुमुद काकू गाणगापूरला गेल्या होत्या ना मागल्या आठवड्यात त्याचे भस्म दिलेय त्यात.रोज सोहमला लावत जा."
मीही निश्वास टाकला.दादा रेल्वे स्टेशनवर सोडायला आला होता.गाडी सुटली जरा स्थिर झाले.सोहमही झोपला होता.

सहजच आईने दिलेल्या  पुडीत खरच अंगारा आहे का बघुया असा विचार करून मी पुडी उघडली.मला जे दिसले ते पाहुन मी खूप खजिल झाले.
त्यात चक्क किमान 5-6 ग्रॅमचे प्युवर सोन्याचे वळे होते.
आईला खोटे बोलुन मला अशी भेट द्यायची काय गरज होती? 
उद्या फोनवर बोलुनच काय तो सोक्षमोक्ष लावू.थंड वाऱ्याने डोळे जड व्हायला वागले होते.
# # # # # # # # # # # # # # # 
सकाळी पहाटेच श्री घ्यायला आला.गाडीही वेळेतच पोहोचली होती.दादाला मेसेज करून कळवले.
सकाळी दादाचे कॉलेज आणि वहिनीची शाळेत जाण्याची घाई.
 ते दोघे गेल्यावरच बोलु म्हणुन मी 8 वाजायची वाट पहात होते.
तेवढ्यात फोन खणखणला.
होऽऽआईचाच फोन होता.
बबडे,पोहोचलीस का ग नीट?
 प्रवासात झोप झाली ना?
सोहमनी त्रास नाही ना दिला ग वाटेत?
आईच्या इतक्या सहज प्रश्नांना मला सहजपणे उत्तर देणे खूप कठीण जात होते.

कारणही तसेच होते जरी मी श्रीशी स्वत:च्या पसंतीने लग्न केले असले तरी मला माझ्या संसारात कुठलीच कमी पडू दिली नव्हती त्याने.वर्षाच्या वाढदिवसापर्यंत सर्व सोन्याचे दागिने केले होते त्याने मला.
ह्या सगळ्याची मला कधीच आवड नव्हती पण लग्नासाठी घरी बाबांना विचारायला रादर सांगायला की आम्ही एकमेकांना आवडतो आणि आम्हाला लग्न करायचेय तेव्हा बाबा त्याला बोलता बोलता एक वाक्य बोलले,"तुमच्या घरच्या श्रीमंतीकडे बघुन मी माझी मुलगी कशी देऊ?"
तुमच्या कर्तुत्वाने एक दागिना घालण्याची तरी ऐपत आहे का तुमची?
तेव्हा फक्त गप्प बसलेला श्रीने कृतीतून त्याचे कर्तृत्व सिद्ध करून माझ्या बाबांची वर्षाच्या आत शाबासकी मिळवली होती.
हे सगळे माहित असुनही आईने मला अशी चोरून मदत मागितल्या सारखी वस्तु का द्यावी?
मी : सगळे ठिक आहे गं आई.
माझ्या आवाजातली नाराजी आईने ओळखली असावी.
" का ग बबडे इतकी वैतागतेस?"
मला तूला काही देण्याचा हक्क नाहीये का बाळा?
मी आता परस्वाधीन.तुझे बाबा असताना आधार वाटायचा.पण आता नाही म्हणले तरी काही करताना तुझ्या दादा वहिनीचा विचार करावा लागतो बाई.
आईचा आवाज बोलताना घोगरा झाला होता.मला उगीचच तीला दुखावल्याची बोच लागुन गेली.
"आईऽऽ तु शांत हो बघू आधी.किती विचार करतेस?" "दादा वहिनीचा काही त्रास होतोय का तुला?" 
"तुला कोणी काही बोलले का,काय झाले?"

आणि तुला माहितीय ना,मला सोन्या दागिन्याचे वेड नाही आणि द्यायचेच तर मग उघड पणे द्यायचेस ना सर्वांदेखत. तुझ्याच घरात तुझ्याच हक्काच्या कमाईचे देताना अशी चोरी का?
आता आई पण जराशी सावरलेली होती.
बबडे,मलाही हौस नाही ग् असे चोरून वागायची.पण तुला दिलेले हे सोन्याचे वळे बाबांनीच एका गुरूपुष्यांमृताला खरेदी केले.मला म्हणाले आता हे बबडीला देऊ पुन्हा आली की.लग्नानंतर तिने स्वाभिमानाने आपली कोणतीही भेटवस्तू स्विकारली नाही.श्रीधर रावांनीही काही मागितले नाही.
आपली फूल ना फुलाची पाकळी.
बाकी त्यांना कसली कमी म्हणा त्यांच्या संसारात.
खरच पोरीने हिरा शोधला अगदी!
काय स्वभाव काय कर्तुत्व!कसे कोण जाणे तुझ्या वहिनीने आमचा संवाद ऐकला अन् बाबांना रागातच म्हणाली,
"बाबाऽऽतुमच्या मुलीला ह्याची गरज नाहीये,ज्याला गरज आहे त्याला द्या ना."
काय बोलणार तिच्यापुढे.खूप वाद झाला.मग ते सोने तसेच आत ठेवले.
नंतर अवघ्या 6 महिन्यात बाबा गेले.
तुही निवांत आलीच नाहीस.
आता हे निमित्तही छान होते म्हणुन बाबांची ईच्छा पुर्ण करावी हा विचार आला आणि बबडे खरच सांगते बाबा गेल्यापासुन रूता माझी जास्तच काळजी घ्यायला लागलीय.मला कधी दुखवत नाहीत दोघेही.
पण हे देताना जर तीला पुन्हा जूने काही आठवले तर उगीच चांगल्या जुळलेल्या नात्यात कडू नको ना पडायला आणि माझे सगळेच तर त्यांचेच आहे की?
नाती जुळवुन ठेवायला कधी कधी काही गोष्टी लपवुनही ठेवाव्या लागतात बबडे.
तूला राग आला असेल कालच्या माझ्या वागण्याचा पण मला फक्त माझेच नाही तर तुझेही दादा वहिनीशी असलेले नाते जुळवुन ठेवायचे होते ग्.मी काय पिकले पान,माझ्या नंतर तुला तुझे माहेरपण असेच मिळत राहो हिच ईच्छा आहे गं माझी.
गैरसमज करून घेऊ नकोस."
मी आईचे सगळेच ऐकत होते.डोकं सुन्न झाले होतं.
         # # # # # # #
नाती जपण्यासाठी खरच असे करणे गरजेचे आहे?
"ज्या गोष्टीतुन काहीतरी चांगलेच निष्पन्न होणार असेल तर असे खोटे सत्याहुनही पवित्र आणि निर्मळ असते."
असे कुठेतरी ऐकले वाचले होते. 
मी काय करायला हवे?
प्रसादची गिफ्ट स्विकारू की नाकारू??

दारावरच्या बेलने विचारांची तंद्री भंगली.
12 वाजले होते.श्री आला होता.

माझा ही निर्णय ठरला होता. काय करायचेय हे मनाशी पक्के करूनच मी श्रीच्या कुशीत विसावले...

## ## ## ## ## ## ## ## 
(क्रमश:5)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all