वर्गमित्र भाग 11

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र.

# वर्गमित्र-11

सकाळी सकाळी फोनच्या घंटीने जाग आली.
"कोणाचा ग फोन एवढ्या सकाळी?" श्रीधरने अर्धवट झोपेतच विचारले.
"अरे बघते थांब जरा."
डोळे किलकिले करतच मी फोन चाचपडला.
मनिषचा फोन!!इतक्या सकाळी?जराशा आश्चर्यातच फोन घेतला.
"काय रे?सगळे ठिक ना?"
"एवढ्या सकाळी कसा काय कॉल केलास?"
मी घाबरतच विचारले.
"हो मी ठिक आहे.पण एक बातमी द्यायला फोन केलाय."
आता मी जास्त घाबरले होते.
"अरे कसली बातमी, काही सिरियस तर नाही ना रे.?पटकन सांग."
"अगंऽऽकाही नाही आपल्या प्रसादचे वडील गेले पहाटे
हार्ट अॅटॅकनी."
घरी पहिला अॅटॅक येवुन गेलेला कळलाच नाही.अस्वस्थ वाटतेय म्हणुन अॅडमिट केले होते रात्री हॉस्पिटलला.पण पहाटे पून्हा दूसरा अॅटॅक आला अन् त्यातच गेले."
"बापरेऽऽऽ! हाऊ शॉकिंग!!"
"तसे ते चांगले होते ना रे तब्येतीने?
म्हणजे आजारी वगैरे नव्हते."
"अचानक असे कसे झाले?"
"फारच वाईट झाले."
"कसा आहे प्रसाद आता.?"
"तु प्लिज त्याची काळजी घे."
"आपल्या सगळ्या गृपवर कळवलेस का?"
"हो.सकाळीच कळवलीय बातमी."
तूलाच माहित नसणार वाटले म्हणुन फोन केला."
"बरऽऽत्याला सावर तू आणि काही असेल तर कळव.
म्हणतच मी फोन ठेवला. 
     # ## ## ## ## #
सकाळी सकाळी मिळालेल्या त्या बातमीने मन उदास झाले होते.
मी नेट ओपन केले.त्याचा मेसेज होता.
रात्री नेट बंद म्हणून आत्ता पहात होते.
खूप काळजी वाटत होती.कारण ठरवूनही कोणतीही मदत करायला मी असमर्थ होते.
त्याला एक फोन तरी करावा असा विचार क्षणभर चमकला.
परत वाटले तो सध्या पुढल्या सर्व तयारीत बिझी असेल,फोन नाही घेतला तर?
पून्हा मनात आले,काय होइल फारफार तर? तो फोन नाही उचलणार,पण मी फोन केला होता हे तर समजेल?मी कॉल करतेच.
मनाचा विचार पक्का झाला आणि कृतीही केली.
रिंग जात होती.
"हॅलोऽऽमी आशू."
"अग् आशू,मनिष बोलतोय.
हा फोनही मनिषनेच उचलला होता.
"तो जरा बिझी आहे म्हणून फोन माझ्याजवळ देवून ठेवलाय.मी कळवतो हं त्याला."
ओके म्हणत फोन बंद केला मी.
देव पण कशी एकावर एक संकटे देत होता प्रसादला. 
बिचारा आधीच ऑफिशियल कोणत्या अडचणीमूळे त्रस्त होता आणि त्यात आता ही भर.
त्याच्याशी पुढले 15 दिवस तरी संपर्क  होणे अशक्य होते आता.
मी त्याच्या वडिलांसाठी मनोमन प्रार्थना करून मनाला शांत केले.
          # # ## ## ## #
आमचेही मुलांना घेवुन सिमल्याचा प्लॅन पक्का होत होता.
मूले तर जाम खूष होती.
मीही मुलांसोबत ट्रिपला जाण्यासाठी खूपच उत्सुक होते पण नकळत ह्या बातमीने जरा उदास झाले होते अचानक.
दोन/चार दिवसच राह्यले होते निघायला.
त्यामुळे सगळी पॅकिंग,गरम कपडे, फस्ट एड बॉक्स जे जे आठवेल तसतसे सगळे पॅकिंग करणे चालू होते.
मनात राहून राहून वाटत होते.पून्हा माझे कधी बोलणे होणार आहे प्रसादशी?
तो आत्ता दु:खात असताना त्याची सगळ्यात जवळची मैत्रिण नुसते म्हणवते स्वत:ला पण मैत्रीत साधे भेटायला जाणेही मला शक्य नाही?
आज पहिल्यांदा वाटले स्त्री खूप असहाय्य असते नाही का??
आत्ता जर मी पुरूष असते तर पटकन गाडी पकडून त्याला भेटायला गेले असते कुणाला सांगण्याची किंवा कुणाच्या परवानगीची ही गरज पडली नसती मला.
      ## ## ## ## ## 
स्त्री खूप स्वतंत्र झालीय.तिचे निर्णय आता तिचे ती घेवू शकते.आजची स्त्री खूप कॉन्फिडंट आहे वगैरे वगैरे.किती काय काय बोलतो आपण.सत्यही आहे थोड्या फार फरकाने.
पण काही वेळेस वाटते की नाही आजही तीला मनाप्रमाणे काही निर्णय घेताना तिचे घर संसार मुलेबाळे सगळ्या सगळ्या चा विचार करावा लागतो.
घरात नवरा बायको दोघेही कमावतात पण घराची जवाबदारी त्याही वेळी फक्त स्त्री कडेच असते.कुठलाही असा प्रसंग जिकडे काही त्याग करायची वेळ येते मग ती नोकरी असेल किंवा मग प्रमोशन,बदली काहीही त्यात माघार स्त्री लाच घ्यावी लागते.
का? तर ती फक्त स्त्री आहे म्हणून?
मुलांची आई घरात हवी.बाप नसला तरी चालेल.
आताही मी जर श्रीला विचारले की जावू का तर कितीही प्रेमळ नवरा असला तरी तो हेच म्हणेल,आता दोन चार दिवसात आपल्याला फिरायला जायचेय.त्याआधी मला माझ्या ऑफिशिअल कमिटमेंट्स कमप्लिट कराव्या लागणार आहेत.तू गेलीस तर मुलांकडे कोण बघेल? 
आणि मग पून्हा मलाच वाद होवुन ट्रिपचा मूड स्पॉइल नको व्हायला मुलांचा म्हणून त्याचेच ऐकावे लागणार होते.
स्त्रीलाच इतकी वेसणे का? सामाजिक वैचारिक भावनिक?
मन उद्विग्न झाले होते.
विचारांनी नकळत मनातल्या मनात बंड पूकारले होते.
आणि मी त्या विचारांना पुन्हा एकदा मनाच्याच एका कोपऱ्यात बंदिस्त करत होते.
      ## ## ## ## ## 
"आईऽऽपास्ता बनव ना ग्.खूप भूक लागलीय"
"आईऽऽऽ!"
मुलांच्या गलबलाटाने विचारांचे काहूर थांबले.
पावले नकळत सवयीने  किचनकडे वळली.
     ## ## ## ## ## 
( क्रमश: 11)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all