वर्गमित्र भाग 2

मैत्रीच्या नात्याला हळुवार स्पर्श करणारी हलकी फुलकी कथा वर्गमित्र जरूर वाचा.

वर्गमित्र -2

रात्रीचे जेवण उरकले आणि श्रीधरने खास प्रसादच्या आवडीचे आणलेले आईसक्रीम मी सर्वांना सर्व्ह केले.मग पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
श्रीधर आणि प्रसाद तर अशा गप्पा मारत होते जणु तेच जन्मजन्मांतरीचे बालमित्र आहेत.
पुरूषांच्या आवडीचे दोन विषय कॉमन असतात.
एक राजकारण आणि दुसरा क्रिकेट.पण ह्या दोघांचा आणखी एक विषय समान होता 'शेअर्स मार्केटींग'.

मग काय मी आपली नावाला तिथे होते त्यांच्या गप्पांत.
शेवटी कंटाळुन मी बोलले,
"अरे चाललेय काय तुमचे?"
"श्री,,,, प्रसाद माझा मित्र आहे हे विसरू नकोस हं तु." "आल्यापासुन तुच बोलतोएस,माझ्या वाट्याला येऊ दे की माझा मित्र."
ह्यावर प्रसाद -(मिश्किल हसुन)"तु काय ग कुठेही बोलशील;श्रीशी कधी भेट होणार बोलायला?
त्यावरही दोघांनी टाळ्या देऊन दाद दिली.
मनोमन मीही आनंदिच होते त्यांच्यात तयार झालेला बाँड बघुन.
वेळ कसा गेला समजलेही नाही.बाराचे ठोके पडले तसा प्रसाद भानावर आला.
"बापऽऽऽरे,,12 वाऽजले!!! मला निघायला हवे."
त्याने निघायची तयारी केली.
तेवढ्यात माझ्या फोनवर मेसेजची घंटी वाजली.
एवढ्या रात्री कोणाचा मेसेज? असा विचार करतच त्याला टाटा/बाय-बाय करून आम्ही घरात आलो.
मेसेज बघुन आश्चर्य़च वाटले.प्रसादने मेसेज केला होता ,"तुझ्या मुलांच्या रूम मधल्या वॉशरूमचे कबर्ड उघडुन बघ;
"there is something for you."

भीती,आनंद आणि आश्चर्यमिश्रीत भावनांची एकच गर्दी झाली डोक्यात.
घाईघाईने वॉशरूमचे कपाट उघडले.
त्यात एक अगदी छोटेसे लाल चमकीच्या कागदात गुंडाळलेले पुडके होते.वर नावही होते माझे "आशु."
काय असेल आत?बघायची ईच्छा इतकी अनावर होत होती पण मुलांची झोपमोड होउ नये आणि श्रीधर ही मला शोधत आला तर..?
म्हणुन मोह टाळला आणि सरळ झोपायला गेले.
प्रसाद सहसा मेसेेजेस करत नसायचा.त्याच्या मते मेसेज करणे म्हणजे वेळेचा अपव्यय.त्यापेक्षा फोन करून 5/10 मिनिटे बोलले की समोरचा व्यक्ति आनंदी तर होतोच आणि कमी वेळेत जास्त मेसेज(विना गैरसमज )पोहचवता येतो. 

आजकाल मलाही त्याच्या बऱ्याचशा 
गोष्टी पटायला लागल्या होत्या.
आणि होतेही असेच ना..आपण मेसेज एका अर्थी लिहीतो.समोरच्याला वेगळेच काहीतरी वाटते आणि मग ते असे नाही तसे आहे हे समजावण्यात अर्धा अधिक वेळ वाया जातो.मुळ मुद्दा सांगायचा राहुनच जातो ते वेगळेच.ह्या सगळ्यात खरच किती वेळ आपण वाया घालवतो नाही का??
मनातल्या मनात विचार करता करता कधी झोपेने ताबा घेतला कळलेच नाही...

आज सकाळी सकाळीच पुन्हा त्याचा गुड मॉर्निंग मेसेज पाहुन मला आश्चर्यच वाटले.
सोबत टीप-गिफ्ट आवडले का?नंतर सवडीने फोन करेन..बाऽऽय.

सकाळी सगळ्यांच्या शाळा, ऑफिस,डबे,माझे क्लासेसच्या नादात गिफ्ट बघायचे मी साफ विसरून गेले होते.
दुपारचे दोन वाजले असतील.
नुकतेच जेवण ऊरकुन पेपर चाळत मी बेडवर पडले होते.
पुन्हा मेसेजची रींग वाजली.
हो त्याचाच मेसेज..... पण ब्लँक..!!
खूप हसायला आले.त्याला कसे कळले की मी अजुनही गिफ्ट उघडुन बघितलेच नाहीये.
 म्हणुन तो रिमाईंडर मेसेज होता का?
तसेच असेल.कमी शब्दात जास्त पोहोचवणे हीच तर त्याची पॉलिसी.
त्या एका ब्लँक मेसेजनी नकळत त्याने किती काय काय विचारले होते मला.

हि अबोल भाषा किती बोलकी असते नाही का !!!
~~~~~~~~~~~~~~~~~
( क्रमश: 2)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला भाग 2?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all