वर्गमित्र भाग 22

मैत्रीच्या हळुवार नात्याला अलगद उलगडणारी सुंदर हलकी फुलकी कथा वर्गमित्र.

वर्गमित्र- 22
®©राधिका कुलकर्णी.

"अग् किती वेळची वाट बघतोय,कुठेस तू?
लवकर ये."
प्रसाद कामानिमित्त मुंबईत आला होता.आमचे भेटायचे ठरले होते.
"पॅरेडाइज कॅफे" ला तो वाट पहात बसला होता माझी.पण घरातले आवरता आवरता उशीरच झाला होता निघायला.
त्याच्या मेसेजनी अजूनच दडपण आले.कुणाला ताटकळत ठेवणे मला फारसे रूचत नाही पण आज वेळ पाळण्यात मीच चुकले होते.
घाईघाईत एकदाची पडले घराबाहेर.
ऊन मी म्हणत होते.सर्वांगाला अमावस्येसारखी झाकोळून गाडी दामटली.
हश्शहुश्श करत कशी बशी पोहोचले. प्रसाद वाटच बघत होता.आल्या आल्या तूटूनच पडला," काय हे किती उशीर? एक तास नुसते पाण्याचे ग्लास पिउन पिऊन पोटाचा तंबोरा झाला माझा."
त्याचे बोलणे ऐकून हसूही येत होते अन् किव ही.पण हसू दाबले कारण हसले असते तर स्वारी अजूनच भडकली असती.
"सॉरी बाबा" बर बोल. तू इतक्या शॉर्ट नोटीसवर आल्याचे कळवलेस मग वेळ लागणार ना.घरात मुलेबाळे आहेत बाबा,त्यांची सोय लावून यावे लागते मला.तुम्ही काय निघ म्हणले की निघता.
"बर् बर्. बास आता.",
"पूढे बोलू की हाच टॉपिक कंटिन्यु करूयात?"
त्याच्या खोचकपणात दडलेला मिष्किलपणा समजत होता मला.
बर ठिक आहे.
आधी काहीतरी थंड मागव. मला खूप तहान लागलीय.
वेटरऽऽऽ.
काय घेशील?
मला पायनॅपल ज्युस.
त्याने स्वत:साठी कोल्डकॉफी ऑर्डर केली.
  # ## ## ## ## #
थोड्यावेळ फक्त शांततेत गेले.
मी वाट बघत होते तो काय बोलतोय ह्याची.
पण बऱ्याचदा मनातल्या गोष्टी बोलताना शब्द फारकत घेतात.मौन होतात.गळा बंद होतो.तसे काहीसे.
वातावरणातील ती शांतता आता मला जीवघेणी वाटत होती.
आज किती उकाडाय ना रे?
काहीतरी बोलायचे म्हणून मी बडबडले.
"हम्म्.!"
एवढा एकच हुंकार देवून प्रसाद शांत बसला.
मला समजेचना की ह्याला नेमके बोलायचेय तरी काय?
तेवढ्यात आमच्या ऑर्डर प्रमाणे ज्युस आणि कॉफी आली.
आमची पेय पित पित इकडे तिकडे उगीचच नजर फिरवत मी वेळ मारत होते.
प्रसाद न जाणो मलाच बघतोय असा भास होत होता.
मी सरळ कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि खुणेनेच काय असे विचारले.
पण तो तसाच एकटक माझ्यावर नजर रोखून होता.
प्रसादचा असा अविर्भाव मी आजच अनुभवत होते.समजत नव्हते की त्याच्या नजरेच्या विळख्यातून स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी.
काय सांगायचेय ह्याला?
अंगावर जरासा भितीचा काटा उभा राहीला आता.
नुसत्या विचारांनीच मनाची घालमेल व्हायला लागली होती.ह्याच्या मनात काही भलतेसलते विचार तर ऽऽऽऽऽऽ......
आमचे खाणेपिणे संपले.बील देवून तो उठला की.
मी आश्चर्यचकीत भांबावल्या नजरेने त्याच्याकडे बघत होते.
तो मात्र माझ्याकडे न बघताच पूढे वळला.
काहीतरी खूप महत्त्वाचे बोलायचे म्हणून इतक्या उन्हात मी आले अन् हा फक्त ज्यूस पिऊन एक अक्षरही न बोलता उठला तिथून...
आता मात्र माझा पारा चढला होता.
तो जसा जायला वळला मी त्याचा हात धरला.
वीजेचा झटका लागावा तसा तो मागे वळला.
मग मी विचारले," एक तास माझी वाट पाहून मी आल्यावर फक्त एक ज्युस पिण्यासाठी भेटायला बोलावलेस का मला?
"काय बालिश पणा आहे हा प्रसाद?"
एक लक्षात ठेव.आता बोललास तर ठिक नाहीतर मग पून्हा मीच बोलणार नाही कधी..
मी माझी पोतडी(पर्स) उचलून तरातरा गाडीपर्यंत पोहोचले.
  # ## ## ## ## #
गाडी स्टार्ट करत होते तोवरच प्रसाद गाडीपाशी पोहोचला.माझा हात धरला.
"किती चिडतेस तू?"
"थांब जावू नकोस."
मला बोलायचेय पण इथे नाही.कुठेतरी शांत जागी जिकडे माणसांची गजबज गोंधळ आणि डिस्टर्बन्स नसेल. म्हणून तिथुन उठलो. समजले का वेडाबाई?
विस्मय ,भय,राग, हसू अशा अनेक छटा एकाचवेळी मन:पटलावर रंग चढवून गेल्या.
निमूटपणे त्याच्या मागे मी कधी चालायला लागले माझे मलाच समजले नाही.
#################
(क्रमश:22)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all