वऱ्हाडी वकिली
साहित्य : बेसन पीठ २ वाटी, दही अर्धी वाटी, तीळ २ चमचे, कोथिंबीर अर्धी वाटी, ओले खोबरे, ३ ते ४ हिवऱ्या मिरच्या, तेल २ पळी, जिर,मोहरी, हिंग, हळद फोडणीसाठी; मीठ तिखट चवीप्रमाणे.
कृती : वऱ्हाड प्रांतातला उन्हाळा अंगाची लाही लाही करणारा. त्यात आंब्याचा रस असेल तर काय ती जेवणात गोडी! ही गोडी अजून चटकदार व्हावी म्हणून वऱ्हाडात मुख्यतः रस पोळीच्या जेवणात ही वकिली केली जाते. ही पाककला अगदी सोपी आहे. बेसन पीठ शक्यतोवर गिरणीतून दळून आणलेले वापरावे. मध्यम आकाराच्या वाटीने २ वाटी बेसन बारीक चाळणीने चांगले चाळून घ्यायचे. अर्धा वाटी आंबट दह्याचे ताक करून त्यात चवीनुसार मीठ थोडी हळद आणि गरजेनुसार पाणी घालून ढोकळ्याच्या पिठापेक्षा जरा पातळ भिजवायचे. जाड बुडाचे पातेले किंवा कढईला हलकासा तेलाचा हात लावून त्यात ते मिश्रण ओतून मंद आचेवर जवळपास सात ते दहा मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे. गाठ धरू नये म्हणून पीठ घट्ट होईस्तोवर पळीने आटत रहायचे. शेवटी दोन मिनिटं झाकण ठेवून चांगली वाफ आली की गॅस बंद करायचा. शेवेच्या बारीक साच्याला आणि मोठ्या ताटाला तेलाचा हात लावून घ्यायचा. साच्यात हे शिजलेले बेसन घालून कुरडई सारख्या गोल गोल वकिली तेल लावलेल्या ताटात टाकून घ्यायच्या. छोट्या कढईत २ पळी तेल चांगले कढवून घ्यायचे त्यात मोहरी तडतडली की जिरं घालून गॅस बंद करून मग तीळ, हिरव्या मिरचीचे तुकडे, हळद, हिंग, हलकासा लाल रंग यावा म्हणून तिखट असे सर्व घालून तडका तयार करून घ्यायचा. वकिली ताटात वाढताना हा तडका, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असल्यास थोडेसे खिसलेले ओले नारळ घालायचे. अहाहा लज्जतदार वकिली दिसायला नाजूक साजूक लाल पिवळी हिरवी अगदी निसर्गासारखी नटलेली दिसते आणि खाताना देखील आमखर तिखट चटपटीत लागते!
भरपूर प्रोटीनयुक्त हा पदार्थ चवीने हलकासा आंबट असला तरी देखील कोणत्याही आंबविण्याच्या प्रक्रियेविना तयार होत असल्याने झटपट बनतो आणि पटापट संपतो देखील. चोंग्याची रोटी, रस, कुरडई, पापड आणि सोबत ही पारंपरिक वकिली उन्हाळ्याच्या थाळीत बहार आणते. ही वकिली भात खिचडी सोबत खायला देखील रुचकर लागते. अहो मग विचार काय करताय!
करू शकता तुम्ही देखील
ही वऱ्हाडची वकिली लज्जतदार...
लागत नाही या वकिलीस
कोणताही कागदोपत्री कारभार...!
ही वऱ्हाडची वकिली लज्जतदार...
लागत नाही या वकिलीस
कोणताही कागदोपत्री कारभार...!