टीम श्रावणी
लघुकथा
वारी पावली
लघुकथा
वारी पावली
एकादशीच्या दिवशी निघणाऱ्या वारीसाठी त्याने तयारी सुरू केली. शेतांमधली काम करायला घेतली. कारभारणीला नेहमीप्रमाणे
"सोबत येतेस का विद्या ?"असे वरदने विचारले.
पण विद्याने
"नाही हो !इथेच माझे पंढरपुर आहे. तुम्ही निवांत जा. मी सांभाळते ईथले. घरात पण बघायला हवे ना!"
असे वरदला म्हटले.
खरंतर यंदा तब्येतीच्या कुरबुरीमुळे वरदलाही वारीसाठी चालत जाणे जमेल की नाही याविषयी शंका होती.
पण तरीही गेल्या अकरा वर्षाचा नियम चुकवायचा नाही.. म्हणून त्याने एक तप वारीचे पूर्ण करण्यासाठी जायचेच असे ठरवले. आवश्यक ते सामान आणि औषधे घेऊन तो गावकऱ्यांसोबत निघाला.
इकडे गावाकडे विद्या घरातल्या ज्येष्ठांची आणि मुलांची काळजी घेण्यामध्ये गुंग झालेली होती. त्याला जाऊन आज आठ दिवस झाले होते आणि अजून बारा दिवस लागणार होते.
अचानकच सासुबाईंची तब्येत खराब झाली. तिला कळेना काय करावे त्याच्याशी संपर्क करावा का? जर आपण आईंच्या तब्येतीविषयी सांगितले आणि त्याने परत फिरायचे ठरवले तर, त्याच्या वारीच्या नियमात आपण व्यत्यय आणला असे तर ठरणार नाही ना ?
असा विचार करून तिने आलेल्या परिस्थितीशी एकटीनेच तोंड देण्याचे ठरवले.
"डॉ.. या माझ्या सासूबाई. अचानक यांची तब्बेत खराब झाली."सासूबाईंना केबिन मध्ये घेऊन जाताच विद्या डॉक्टरांना म्हणाली.
"काय त्रास होतोय तुम्हाला?" डॉक्टरांनी विचारले.
"पोट दुखत आहे खूप" सासूबाई कळवळतच म्हणाल्या.
"ठीक आहे. मी काही टेस्ट लिहून देतो. सोनोग्राफी मात्र ताबडतोब करून घ्या आणि इतर काही तपासण्यासुद्धा करून घ्या. हम्म हे घ्या."सोनोग्राफी आणि इतर तपासण्यांची चिठ्ठी पुढे करत डॉक्टर म्हणाले.
"डाॅक्टर काय झाले आईंना? काळजी करण्यासारखे आहे का? विद्याने विचारले.
"मला शंका आहे त्यांच्या पोटामध्ये वाढत असणाऱ्या अपेंडिक्समुळे त्यांना त्रास होत असावा. मागच्यावेळी तुम्हाला सांगितले होते ऑपरेशन संदर्भात पण पैशांच्या अभावामुळे ते होऊ शकले नाही. पण आता वेळ दडवून चालणार नाही." डॉक्टर म्हणाले.
"बरं डॉक्टर..तुम्ही म्हणाल तसं. मी लगेच करून घेते सगळ्या टेस्ट." विद्या म्हणाली
आता पण सगळ्यात मुख्य.. ऑपरेशनसाठी पैसे गोळा करण्याचं आव्हान तिच्यासमोर उभं ठाकलं होतं. तिने ते समर्थपणे पेलायचे ठरवले.
"काय करु?पैसे कसे जमा करू?" विद्या विचार करत होती.
तिने बँकेत आपले दागिने गहाण टाकायचे ठरवले आणि तो आल्यावर पैशांची व्यवस्था करेल आणि दागिने सोडवेल याविषयी तिला खात्री होती.
तिने सासूबाईंना ऍडमिट केले आणि लगेच ऑपरेशनची तयारी डॉक्टरांनी सुरू केली. घरामधली धावपळ..लहान असणारी मुले आणि वृद्ध सासरे या सगळ्यांना सांभाळताना तिची खूप धावपळ झाली.
पण म्हणतात ना पांडुरंग असतोच मदतीला. त्याप्रमाणे तिची शेजारीण मदतीला धावून आली आणि सासूबाईंचे आजारपण निभावले.
वीस दिवसांनी वरद परत आला.
आईला झोपलेले पाहुन त्याने काळजीने विचारले.
"अग विद्या काय झाले आईला?"वरदने विचारलं.
"अहो...सांगते सगळे. तुम्ही आधी आवरून घ्या."विद्या म्हणाली.
सगळं आवरून चहापाणी देतच विद्याने वरदला सगळं सांगितलं. त्यावेळेच्या सर्व परिस्थितीची कल्पना दिली. आपण आईच्या इतक्या महत्त्वाच्या ऑपरेशनच्यावेळी इथे नव्हतो..वारीला गेलो होतो याचे खूप वाईट वाटले.
पण तिने सांगितले की त्याच्या बाराव्या वारीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणूनच तिने त्याला त्याची कल्पना दिली नाही आणि एकटीनेच त्याला तोंड दिले.
त्या परिस्थितीत तिला त्याच्या पांडुरंगाने साथ दिली होती आणि याविषयी ती कृतज्ञ ही होती. तिने पैशाची व्यवस्था करताना आपले दागिने गहाण टाकायला मागेपुढे पाहिले नाही. याविषयी त्याला खूपच कौतुक वाटले. आता एवढे पैसे कुठून गोळा करायचे आणि ते दागिने कसे सोडवायचे याविषयी विचार करायला त्याने सुरुवात केली.
"गेल्यावर्षी पीक पाणी फारसे नव्हतेच. शाळेतल्या मुलांच्या ज्या ट्युशन्स घ्यायचो आपण त्यामधून जे उत्पन्न होते त्यातून घरखर्च भागत होता .अशा वेळेला आता पन्नास हजार रुपये गोळा करणे खूपच कठीण आहे गं! वरद म्हणाला.
"अहो! पुढच्यावर्षी सोडवु. माझा खरा दागिना तुम्ही आहात. माझे अंगावरचे दागिने सोडवायला वेळ लागला तरी चालेल. तुम्ही त्याची फार काळजी करू नका. मी ही यंदा तुमच्या बरोबरीने मेहनत करीन आणि आपण दोघे मिळून ते दागिने सोडवू ."असा तिने धीर दिला.
आपल्या बायकोचे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून त्याला भरून आले.
"तुझ्यासारखी गुणी आणि सगळ्या परिस्थित साथ देणारी बायको मिळणे म्हणजे माझे भाग्यच आहे. तू जे काही केलंस आईसाठी त्यासाठी तुझे आभार मानणे खरतरं चुकीचे आहे पण तरी थँक यू विद्या! तू होतीस म्हणून सगळं वेळेत निभावलं."वरदने विद्याचा हात हातात घेत म्हंटले.
"थँक यू बोलून तुम्ही मला परकं करताय."विद्या म्हणाली.
"नाही गं..उलट मला थँक यू म्हणून तुझ्यासाठी काहीतरी खास करायचे आहे."वरद म्हणाला.
"बरं..करा हां काहीतरी खास."हसतंच विद्या म्हणाली.
"आई.. विद्याला गाण्याची खूप आवड होती. लग्नाआधी ती शिकतही होती. पण नंतर संसारात गुंतल्याने तिने त्या आवडीला दूर सारले. आता तिच्या आवडीचे तिला करू द्यायचे ठरवले आहे मी." वरद आईला म्हणाला.
"अरे पण मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे यासाठी तिला वेळ कसा उपलब्ध करून द्यायचा."वरदच्या आईने प्रश्न उपस्थित करत म्हंटले.
त्यावर त्यानेच उपाय काढला.
" दुपारी ट्युशन्स चालू असताना मी आपल्या मुलांना सांभाळणार आणि घरात काही लागले तर तेही पाहणार. गावातल्या चांगल्या गायन शिक्षकाकडे मी तिची वर्षभराची गायन क्लासची फी भरुन टाकतो."वरद त्याच्या आईला म्हणाला.
"विद्या..जरा बाहेर येतेस का गं!" सासूबाईंनी विद्याला आवाज देत म्हंटले.
"हां आई बोला. काही हवंय का तुम्हाला?" पदराला हात पुसत विद्याने विचारले.
"मला काही नको. हे घे. हे तुझ्यासाठी". सासूबाई म्हणाल्या.
वरदने एक पाकिट पुढे केलं. ही भेट तिला देताना तो म्हणाला
"मी तुझ्या भरोशावर वारीला निर्धास्त गेलो आणि तू माझा भरोसा खरा ठरवला. तू जे काही केलंस आईसाठी त्याची परतफेड काहीही केलं तरी होणार नाही पण मी आता असं ठरवलं आहे की वर्षभर तरी तुझ्या आवडीचं करण्यासाठी तुला वेळ उपलब्ध करून द्यायचा. तू या गायन क्लासला जा आणि त्या वेळेमध्ये घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माझी"वरद म्हणाला.
"आणि घर सांभाळायला मी सुद्धा वरदला मदत करेन हो."सासूबाई म्हणाल्या.
वरदचे आणि सासूबाईंचे बोलणे ऐकून विद्या भारावुन गेली. वारीला न जाताही पांडुरंगाने तिला हवे ते दिले होते. तिची आवड जपणारा नवरा आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या सासूबाई. त्यासाठी तिने ही पांडुरंगाला मनोमन हात जोडले आणि
"असाच पाठीशी राहा रे बाबा!" अशी प्रार्थना केली.
ही एकादशी तिच्यासाठी वेगळीच ठरली.
भाग्यश्री मुधोळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा