ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
लघू कथा
लेखन:- कृतिका कांबळे
टीम श्रावणी
लघू कथा
लेखन:- कृतिका कांबळे
" काय सारखं सारखं एकच चॅनेल बघत असतेस गं तू?" तनुष घरी आल्या आल्या टीव्ही समोर बसलेल्या आरोहीला ओरडला.
" मग काय झालं? मला आवडती हि मालिका म्हणून सारखं बघत असते मी. तुला काही प्रॉब्लेम आहे का?" आरोहीने बडबड करतच त्याला पाणी आणून दिले.
" आवडायला हरकत नाही गं. पण, एकच मालिका दिवसभर बघून कंटाळा नाही का येत तुला?" तनुषने पाणी पिऊन ग्लास परत तिच्या हातात दिले.
" कंटाळा कशाला येईल? त्यात कंटाळा येण्यासारखं काय आहे? इतकी छान तर मालिका आहे, सगळ्या दुनियेला आवडते ही मालिका फक्त तुम्हालाच आवडत नाही." आरोहीने तोंड वाकडे केले.
" या मालिकेत आवडण्यासारखे काय आहे तेच मला कळत नाही. किती ड्रॉमेटिक आहे मालिका. त्यात ते सगळे कॅरेक्टर किती फेक वाटतात, नुसते ओव्हर ऍक्टिंग करत असतात. आणि तुमच्या सारखे माणसे दिवसभर कामधंदा सोडून बसतात त्यांना बघत एकाच जाग्यावर." तनुष तिला चिडवून दाखवू लागला.
" तू ना... तू गप्पच बस हं तनुष. ओव्हर ऍक्टिंग काय त्यात? सगळे किती छान अभिनय करतात. किती हसवतात, किती शिकवतात, खूप काही घेण्यासारखे आहे या मालिकेमधून." आरोही त्याच्या बाजूला बसून त्याला समजावून सांगू लागली.
" काय घेण्यासारखे आहे या मालिकेत? मुळात अशी कुठे सोसायटी आहे का या भूतलावर? अशी माणसे नाहीत ना अशी माणुसकी नाही. इथे शेजारी ढुंकूनही पाहत नाही शेजारचा माणूस मरत असेल तरी. आणि इथे, या मालिकेत सगळेजण स्वतःचा कामधंदा सोडून दुसऱ्याच्या प्रोब्लेममध्ये अडकलेला असतो. नोकरी करणारे देखील तिथेच आणि बिझनेस करणारे देखील तिथेच राहतात. आणि काय गं, यांच्याच आयुष्यात असे प्रॉब्लेम कसे येतात जे पटकन सॉल्व पण होतात. आणि एक आमचे प्रॉब्लेम... सॉल्व होण्याऐवजी जास्तच गुंता होऊन बसतात नेहमीच. उलट त्यात अजूनच भर पडत असते टेन्शन आणि संकटाची." तनुषची बडबड चालूच होती.
" अरे मग काय झाले? असे बिझनेस करणारे आणि नोकरी करणारे एकत्र राहू शकत नाही. कुठे राहिलेली दिसली नाही म्हणून मालिकेत देखील दाखवू नये असं थोडीच आहे. आणि... मेन तुझा प्रॉब्लेम काय आहे? ते ओव्हर ऍक्टिंग करतात तो की, अशी सोसायटी कुठेच नसते हा?" आरोही त्याची बडबड ऐकून वैतागते.
" मुळात हि संपूर्ण मालिकाच हा माझा प्रॉब्लेम आहे. कामात देखील हेच चालू असते, कोणाच्या हातात फोन पाहिला की तो तारक मेहताच बघत असतो, आणि... घरी आल्यावर तू देखील तेच करत असते. मग डोकं नाही का फिरणार माझं? मुळात... मला एक गोष्ट सांग, ह्या मालिकेतून घेण्यासारखे काय असते? तो जेठालाल नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकतो आणि त्याचा तो परममित्र त्याला सोडवतो. बाकीचे भांडण, मतभेद, गैरसमज, सगळं काही होतं आणि संध्याकाळ पर्यंत सगळं काही नीट देखील होतं? कसं शक्य आहे ते? बरं... यांची सोसायटी इतकी फेमस आहे की सगळे बॉलीवूड ऍक्टर, ऍक्टरेस यांना भेटायला येतात. हल्लीच्या जगात आहेत का अशी माणसे? अशी सोसायटी? शेजारी कुटुंबाला आपलेच कुटुंब बोलणारी आहेत का या जगात कोणी? तू आजारी होतीस तेव्हा साधं बघायला देखील आले नाहीत आपले शेजारी? मी जास्त पाहिले देखील नाही शेजारी कोण राहते ते? मला तर त्यांचे नीट नाव देखील माहित नाहीत? हेच वास्तव आहे आरोही. बाकी हे सगळं फक्त नाटकी आणि दिखावा आहे. आणि मला असा दिखावा नाही आवडत. माणसाने नेहमी कसं सत्यात राहावं. वास्तवात जगावं. तेच बरं पडते." तनुष थोडा चिडला होता.
" मान्य मला तनुष, असे लोक ह्या जगात असल्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, नाहीच आहेत असं तुझं म्हणणं चुकीचे आहे. आणि मला एक सांग... शेजारी आपल्या उपयोगी पडत नाहीत असं जे तू म्हणतोस ना, तू किती शेजारच्यांच्या उपयोगी पडला आहेस? दरवेळी दुसऱ्याने काहीतरी आपल्यासाठी करावं ही अपेक्षा करण्याआधी आपण देखील काहीतरी त्यांच्यासाठी करावं ही इच्छा का मनात येत नाही? गोकुळधाम सोसायटी नसेल या जगात कुठे पण मग ती आपण आपल्या सोसायटीमध्ये आणली तर काय बिघडते? सुरुवात नेहमी आपल्याच घरापासून करावी माणसाने. आणि ती मालिका खरंच खूप शिकवते. खूप हसवते. तू पण बघ कधी मनापासून. तुला देखील आवडेल. सारखं सारखं असं चिडचिड करत जगाला टोमणे मारत फिरू नये मिस्टर तनुष. जरा वास्तवामधून स्वप्नांत देखील रमावं माणसाने. तेवढंच आयुष्य वाढते. आणि जगण्याला नवे वळण मिळते. मनाला शांतता आणि ओठांना हसायला शिकवेल ही मालिका. ये बस माझ्या जवळ सरकून... आज तू देखील बघ माझ्या सोबत. मी आपल्या दोघांसाठी मस्त कॉफी आणते. एकत्र कॉफी घेत मालिका बघू या." आरोहीने त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि कॉफी आणायला किचनमध्ये गेली. तनुष गळ्यातील टाय काढत टीव्ही पाहू लागला.
समाप्त
