वासुकी इंडिकस- एक गूढ शोध

वासुकी इंडिकस- 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूरकीच्या टीमने लावलेला अद्भुत शोध ज्यामुळे भारताच्या प्रागैतिहासिक काळाची माहिती जाणून घेण्याची निराळी संधी लाभली, अशा शोधाविषयी थोडक्यात माहिती.
इतिहास वाचायला किंवा इतिहासाचा अभ्यास करायला कंटाळा येत असला वा झोप येत असली तरी ऐतिहासिक शोध आणि पुरातत्त्वीय सर्वेक्षणात रस असणारे बरेच लोक असतील, त्यापैकीच मी एक. मलाही इतिहासाच्या त्याच त्याच घडामोडी वाचायला कंटाळा येतो पण पुरातत्त्वीय सर्वेक्षण वा उत्खननासंदर्भात माहिती कानावर पडली की माझा उत्साह उफाळूनच येतो. आता माझ्या या गुणधर्माविषयी तुम्हाला सांगण्याचे कारण हेच की मला नुकताच एका उत्खननाची माहिती मिळाली आणि माझं लक्ष अगदी त्या उत्खननाने वेधूनच घेतले. पार्श्वभूमी बरीच रेखाटून झाली, आता ज्या कारणास्तव मी लेखणी हातात घेतली त्या विषयाची उकल करते.

"वासुकी इंडिकस" इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूरकी या संस्थेच्या चमूने केलेले एक अद्भुत अन् लक्षवेधी उत्खनन. याच वर्षी काही महिन्यांपूर्वी साधारण १३-१५ मीटर अर्थात ३६-५० फूट लांबी असणाऱ्या व सुमारे १ टन वजन असणाऱ्या सापाचे अवशेष गुजरातमधील कच्छ इथे पानांध्रो लिग्नाइट या खाणीत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली अंदाजे २३००-२६५० फूट खोलवर सापडले. हो तोच कच्छचा प्रदेश ज्याचे गुणगान तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये जेठालाल गडा नेहमीच गात असतो, त्याच प्रदेशात या प्रागैतिहासिक सापाचे अवशेष आढळले आहेत. याआधी आफ्रिकेमध्ये एका सापाचे अवशेष सापडले होते आणि त्याला 'किंग ऑफ स्नेक्स' ही उपाधी दिली गेली होती पण आता जेव्हापासून वासुकी इंडिकसचा शोध लागलाय तेव्हापासून ती उपाधी 'वासुकी इंडिकस'ला लाभण्याची खात्री उत्तरोत्तर वाढत चालली आहे.

उत्खननात जे अवशेष आढळले त्या सापाविषयीची माहिती गुलदस्त्यात असली तरी 'वासुकी इंडिकस' हे शास्त्रीय नाव त्याला दिले गेले आहे कारण महादेवाच्या गळ्याभोवती असणारा वासुकी जगातील सर्वात मोठा साप असल्याची मान्यता आपल्या सनातन हिंदू धर्मात आहे; त्यामुळेच हे नाव तज्ज्ञांना सुचले असावे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच शास्त्रीयदृष्ट्या माहिती द्यायची झाल्यास या सापाचे जीवाश्म साधारण ४७ दशलक्ष वर्षे जुने असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला आहे, जर हा अंदाज खरा असेल तर भारतातील प्राचीन परिसंस्था आणि प्रागैतिहासिक जैवविविधतेवर निश्चितच प्रकाश पडेल.

जीवाश्मांचे निरीक्षण केले असता किनाऱ्याजवळील दलदलीच्या प्रदेशात राहणाऱ्या, संथ गतीने सरपटून हल्ला करणाऱ्या शिकारी प्रजातीतील व सध्या विलुप्त झालेल्या मॅडत्सोईडे(Madtsoiidae) प्रजातीपैकी एक साप वासुकी इंडिकस असल्याचे भाकीत मांडले गेले आहे. अवशेषांवरून असेही आढळते की वासुकी इंडिकसचे शरीर हे रूंद आणि दंडगोलाकार होते, जे आधुनिक काळातील अजगर व ॲनाकोंडासारखे मजबूत आणि शक्तीशाली शरीररचना असल्याचे दर्शवते.

आधी नमूद केल्याप्रमाणे हा शोध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूरकी या संस्थेने हा महत्त्वपूर्ण सापाचा शोध घेतला असून आपली भारतभूमी नाग भूमी असल्याचा सनातनींचा विश्वास आणखीच दृढ केला आहे परंतु वासुकी इंडिकसच्या शोधाने जीवाश्मशास्त्रज्ञ तसेच उत्साही व जिज्ञासू लोकांमध्ये स्वारस्य आणि वादविवादालाही सुरुवात झालेली आहे. या शोधाविषयी इतिहासतज्ञांना बऱ्याच अपेक्षा आहेत कारण काही इतिहासतज्ञ या शोधाला प्राचीन भारतीय ग्रंथांची (रामायण व महाभारत) पुष्टी असल्याचे मानतात.

मुळात वासुकी इंडिकसचे जीवाश्म प्रागैतिहासिक काळातील अर्थात ४७ दशलक्ष वर्ष जूने असूनही कमीत कमी २७ जीवाश्म आजही संरक्षित अन् अबाधित स्वरुपात आहेत. शिवाय आकार आणि निवासस्थानाच्या बाबतीत वासुकी इंडिकसच्या तुलनेत आधुनिक सापांची कोणतीही प्रजाती नाही त्यामुळे वासुकी इंडिकसचा शोध आकर्षक, अभूतपूर्व आणि गूढ मानला जातोय. हा शोध भारतात झाल्याने प्राचीन जगाच्या रहस्यांचा उलगडा करण्याची एक निराळी संधी भारताला लाभली आहे. मनुष्यप्राणी पृथ्वीबाहेरचे रहस्य जाणून घेण्यासाठी एवढा उतावीळ आहे की पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या रहस्यांकडे सर्रास कानाडोळा करतो कदाचित म्हणूनच अशा एखाद्या गूढ शोधाद्वारे पृथ्वी मनुष्याला टोला मारत असावी, कधीकधी असे वाटून जाते. बरोबर ना!

©®
सेजल पुंजे.