भाग -२
रियांशला बाबांच्या बोलण्याचा काही संदर्भ लागत नव्हता. सुशिक्षित असलेले आई बाबा या कसल्या अंधश्रद्धा बाळगतात याचे त्याला आश्चर्य वाटले पण डॉक्टरांनी आईची काळजी घ्यायला सांगितले आहे म्हटल्यावर त्याने या सगळ्या गोष्टी मान्य करायचे ठरवले.
आईने रियांश कडून वचन घेतले. तो उद्या वटपौर्णिमा संपेपर्यंत घराच्या बाहेर पडणार नाही म्हणून. रियांशनेही आईला वटपौर्णिमेपर्यंत घराच्या बाहेर पडणार नाही असे वचन दिले.
रियांशच्या मनात लहानपणापासून अनेक प्रश्न थैमान घालत होते. आजवर त्याने कुठल्याच मुलाच्या आई बाबांनी त्यांच्या हातात असे कडे घातलेले पाहिले नव्हते किंवा इतके मोठे झाल्यावरही कुणाचे आई बाबा आपल्या मुलाला इतके जपत असतील हे ही ऐकले नव्हते पण तरीही त्याने आईच्या इच्छेखातर कुठेही न जाण्याचे कबूल केले.
वटपौर्णिमेचा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणेच सकाळपासून चिंतेत असणारे आई-बाबा सायंकाळपर्यंत चिंतेने व्याकुळ झाला होते. गेली एकवीस वर्ष त्यांनी पौर्णिमेच्या रात्रीतून आपल्या मुलाला अगदी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढावे तसे बाहेर काढले होते पण आजची रात्र महाकठीण होती. जन्माच्या दिवसापासून सुरक्षा करणारे ते कडे मात्र आज त्यांच्या लाडक्या लेकाच्या हातात नव्हते. तेंव्हा माझ्या मुलाचे काही बरे वाईट तर होणार नाही ना ? या विचाराने आई-बाबा दोघेही रात्री रियांशच्या खोलीत ठाण मारून बसले.
त्या दोघांना असे तटस्थ बसलेले पाहिल्यावर रियांश आई-बाबांना म्हणाला , “आई बाबा , तुम्ही नका इतके घाबरू. तुम्ही दोघे झोपा बरं. मला काही होणार नाही.”
आईने रियांशसमोर हात जोडले आणि ती म्हणाली , “रियांश ,प्लीज आज आम्हाला तुझ्या खोलीच्या बाहेर पाठवू नकोस. आम्हाला इथेच बसू दे ना.प्लीज!”
“ए आई ,अगं तू हात का जोडतेस ? तुम्हांला इथे थांबण्याचा हक्क आहे पण विनाकारण तुम्ही टेन्शन घेताय. मला काही नाही होणार.” रियांश.
“प्लीज रियांश ,आजवर आम्ही तुझे सगळे हट्ट पुरवले पण आज आमचा हट्ट पुरव. आम्हाला बाहेर नकोस पाठवू. आम्ही आजची रात्र अशीच जागून काढणार.” बाबा.
“बरं मला झोप येतेय. मी झोपतो. गुड नाईट!” रियांश.
“हो तू झोप. गुड नाईट!” बाबा.
रियांश गाढ झोपी गेला.
आई-बाबांना मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. घड्याळामध्ये रात्रीचे बारा वाजले होते. पौर्णिमेच्या चंद्राचा तो लख्ख प्रकाश रेवती आणि रमेश रावांना मात्र काळरात्र वाटत होता. घड्याळात बारा वाजताच रियांश ताड्कन उठून उभा राहिला.
“हो मी आलोय. मी येतोय तुझ्या जवळ. येतोय मी. गेली एकवीस वर्ष तू वाट पाहिलीस ना. खूप वाट पाहिलीस पण आता नाही.” असे म्हणत रियांश गॅलरीतून उडी मारू पाहात होता.
आई-बाबांनी त्याला घट्ट पकडले पण त्याच्यामध्ये दहा हत्तींचे बळ संचारले होते. आईने तो दोरा रियांशच्या समोर पकडला. रियांश खाली कोसळला. त्याला किती लागले असेल या विचाराने आईबाबांना घाम आला.
“कोण आहेस तू ? का माझ्या मुलाला बोलावतोस ?” रियांशचे बाबा हताश होऊन ओरडत होते.
“बोलावतोस नाही , बोलवतेस म्हण. तो माझा नातू आहे. तुझा मुलगा नाही.” एक बाई कर्ण कर्कश आवाजात ओरडत होती. पण तिचा आवाज कोणालाही ऐकू येत नव्हता. तो फक्त रियांश ऐकू शकत होता.
“ओळखलास का रे राजा माझा आवाज की विसरलास तुझ्या आजीला ? मी माझ्या नातवाला घेऊन जायला आली आहे आणि घेऊन जाणारच. तोच न्याय देणार आहे मला आणि माझ्या लेकीला. देशील ना रे सोन्या ?”
“हो मीच न्याय देणार आहे तुम्हा दोघींना. तुम्ही काही काळजी करू नका आता मी आईकडे जाणार तिला मुक्त करणार आणि त्या राक्षसाकडून प्रत्येक गोष्टींचा हिशोब मागणार ज्या माझ्या आईने आजवर भोगलेल्या आहेत.” रियांश झोपेत बडबड करत होता.
रियांशच्या आई बाबांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. रियांश झोपेत कोणाशी बोलतोय ? काय बोलतोय ? हे त्यांना कळत नव्हते.
तितक्यात लक्ष्मी सोबत स्वामी महाराज आत आले.
स्वामी महाराजांना रियांशच्या बाबांकडून रियांशचे कडे हरवले आहे हे ठाऊक झाले होते. कडे हरवले तर रियांशच्या जीवाला धोका आहे हे महाराजांनी रियांशच्या लहानपणीच सांगितले होते. कारण रियांशचा जन्म वटपौर्णिमेचा होता आणि त्या दिवशी त्याची अवस्था फार बिकट होती. ते कडे घातल्यानंतर तो शांतपणे झोपला होता. स्वामी महाराजांना असे वाटले की त्या दिवशी त्याचा कोणीतरी बळी घेऊ पाहतोय. एखादा आत्मा त्याला वशमध्ये करू पाहतोय आणि म्हणूनच स्वामी महाराज आपली सगळी कामे बाजूला ठेवून रेवती ताई व रमेशरावांच्या मदतीला आले होते.
रमेशराव व रेवतीताईंच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. स्वामी महाराजांना पाहिल्याबरोबर रमेश रावांच्या तसेच रेवतीताईंच्या जीवात जीव आला. स्वामी महाराजांनी आल्याबरोबर मोठमोठ्याने मंत्रोच्चार सुरू केले. तसा तो आत्मा वेदनेने अगदी तडफडत होता.
ती स्त्री जोरजोरात काहीतरी सांगू पाहत होती.
“गेली एकवीस वर्ष मी माझ्या नातवाला काहीतरी सांगू पाहतेय पण तुम्ही ते कडे घालून मला त्याच्याशी संवाद साधू दिला नाही. आज नियतीने आपोआप ते कडे काढून टाकले आहे. माझे तुमच्याशी कसलेही वैर नाही. कृपा करून बोलू द्या मला माझ्या नातवाशी. मला न्याय हवाय , माझा नातू मला न्याय देईल , तुम्ही मला का त्रास देतात ? गोरखपूर श्रीधर , फार्म हाऊस आणि मला न्याय हवाय.” या अस्पष्ट वाक्याने घरामध्ये काहूर माजवले होते.
स्वामींनी भस्म सगळ्यांच्या अंगावर टाकले. स्वामींचा मंत्रोच्चार चालूच होता. ते लक्ष्मीला काही साहित्य आणून द्यायला सांगत होते. लक्ष्मी एकेक करून साहित्य स्वामी महाराजांना आणून देत होती.
रियांश झोपेतून जागा झाला होता. स्वामी महाराजांना आपल्या खोलीत पाहिल्यावर त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आपल्या सोबत हे काय घडतेय ? स्वामी महाराजांनी या वस्तू कशासाठी गोळा केल्या आहेत ? असे अनेक निरुत्तरित प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होते.
तो गॅलरीत कसा आला ? हा त्याला पडलेला यक्षप्रश्न होता. आई-बाबांचे चेहरे घामाने भिजले होते.
मिळतील का रियांशला त्याच्या प्रश्नांची उत्तरे ?
कोण असेल ती स्त्री ? त्या स्त्रीचा आवाज सर्वजण ऐकू शकतील का ?
क्रमशः
©® सौ. प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा