Login

वाट पाहते पुनवेची.. भाग -३

मनुष्य खोटे वागतो त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आत्म्याचे नाही. दुसऱ्यांवर अन्याय करतो तो मनुष्य आणि मेल्यावरही न्याय मिळावा म्हणून धडपडतो तो आत्मा
वाट पाहते पुनवेची..भाग -३


भाग -३


रियांश आई-बाबांना प्रश्न विचारणार तोच त्या आत्माने पुन्हा रियांशला बोलण्याचा प्रयत्न केला.


“बाळा मी इथे कोणालाही मारायला आलेली नाहीये. या लोकांना समजून सांग. तुझ्या आईला न्याय हवाय. येशील ना तू गोरखपूरला. मी वाट पाहतेय तुझी. पोर्णिमा उद्या पाच वाजेपर्यंत आहे. तू आलास तर माझा भटकणारा आत्माही शांत होईल. नाहीतर पुढच्या वर्षीच्या पुनवेची मला पुन्हा वाट पाहावी लागेल.” आत्मा.


कोणालाही न दिसणारा न ऐकू येणारा आत्मा फक्त रियांशला दिसत होता. ऐकू येत होता.

रियांश मोठ्याने म्हणाला , “हो मी येईल. माझ्या आईला न्याय देईल आणि तुमच्या आत्मालाही नक्की शांती मिळेल.” आज रियांश कोणाचातरी बदला घ्यायचा आहे या हेतूने आवाज चढवून बोलत होता. आजवर त्याचा इतका चढलेला आवाज कोणीही ऐकला नव्हता किंवा तापलेला चेहराही पाहिला नव्हता.

स्वामी महाराजांचे आत्म्याला थोपवून ठेवण्याचे अथक प्रयत्न चालू होते.


आई-बाबांना रियांशची खूप काळजी वाटत होती.


तितक्यात रेवती ताई हात जोडून त्या आत्म्याला म्हणाल्या , “प्लीज तुम्ही कोणीही असाल. आमच्याशी तुमची काहीही दुश्मनी असेल तर त्याची शिक्षा तुम्ही आम्हाला द्या. पण प्लीज आमच्या मुलाला सोडा.त्याला काही करू नका.” रेवतीताईंनी हंबरडा फोडला.


त्या आत्म्याने रेवती ताईंना जोराच्या वाऱ्याने वेगात ढकलून दिले.


“काय म्हणालीस माझा मुलगा ? मूर्ख स्त्री. हजार वेळा बजावते आहे मी की , तो तुझा मुलगा नाहीये. तो माझा नातू आहे. तर का पुन्हा पुन्हा माझा मुलगा ,माझा मुलगा हा दिंडोरा पिटवतेस. का मध्ये येतेस आमच्या ?” आत्मा.


आत्मा जे बोलत होता ते रेवती ताईंना ऐकू येत नव्हते. पण महाराजांच्या प्रयत्नांना यश आले. आता आत्मा सगळ्यांना दिसत होता. त्याचा आवाज ऐकू येत होता.


आत्म्याला नेमका कोणाचा जीव घ्यायचा आहे ? स्वामींना काहीच माहित नसल्यामुळे त्यांनी सगळ्यांना एका गोल रिंगणामध्ये उभे केले आणि ते रियांशला कसे सुरक्षित ठेवता येईल ते पाहू लागले.


तेवढ्यात आत्मा बोलू लागला.

“माझे तुमच्या कोणाशीही वैर नाही पण तुम्ही माझे ऐकून घेत नाहीत म्हणून मी तुम्हाला त्रास देतेय. हा माझा नातू आहे. माझी मुलगी गोरखपूरच्या फार्म हाऊसवर त्या श्रीधरने कोंडून ठेवलीय. तिला न्याय द्या आणि तिला न्याय देण्यासाठीच माझ्या नातवाचा पुनर्जन्म घेतला आहे.” आत्मा मोठमोठ्याने आक्रोश करत होता. रमेशरावही हे ऐकून खूप घाबरले होते. रेवतीताईला गहिवरून येत होते.


लक्ष्मीलाही या सगळ्यांच्या जीवाची रियांशची काळजी वाटत होती.

“आम्ही का विश्वास ठेवावा तुझ्यावर ?” स्वामी महाराज म्हणाले.



“विश्वास ठेवा कारण मी आत्मा आहे मनुष्य नाही. मनुष्य खोटे वागतो त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आत्म्याचे नाही. दुसऱ्यांवर अन्याय करतो तो मनुष्य आणि मेल्यावरही न्याय मिळावा म्हणून धडपडतो तो आत्मा.”

आत्मा जे बोलत होती ते अगदी खरे होते.


स्वामी त्या आत्म्याला दूर करण्यासाठी मोठमोठ्याने मंत्रोच्चार करू लागले. भस्म टाकू लागले.

तितक्यात रेवतीताई म्हणाल्या , “ स्वामी महाराज थांबा. मला वाटते या जे बोलतायेत त्यावर विश्वास ठेवावा आपण. एकदा का यांच्या आत्म्यास शांती मिळाली की आपला रियांश सुखाने जगू शकेल.”


“बरोबर बोललात तुम्ही. सांगा या स्वामींना हे सगळे थांबवा म्हणून.” आत्मा.


तरीही स्वामींनी ज्या ज्या वस्तू सांगितल्या त्या त्या लक्ष्मीने एक एक करून आणून दिल्या. आत्म्याला घाबरत ,पडत ,पुन्हा उठत ,खरचटलेल्या हातापायांच्या जखमांकडे डोळेझाक करत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी जीवाची बाजी लावून लक्ष्मीने त्या वस्तू स्वामींजवळ आणून दिल्या.


स्वामींनी लाल रंगाचा रक्षा धागा , त्या काळ्या बाहूल्या , कोहळा , ती चंदनाची लाकडे आणि सोबतच मंत्रोच्चार करत रियांशच्या शरीराभोवती लाल रंगाच्या रक्षा धाग्याने काळ्या बाहूल्या कोहळा , चंदनाच्या काठ्यांनी गुंडाळत बाजूने रियांश आणि त्याच्या आई-बाबांनाही सुरक्षित केले. कामगिरी फत्ते केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसांडून वाहत होता. सर्वजण सुरक्षित झाले होते.


आत्मा मात्र हे सर्व पाहून हसत होता.


अखेरीस आत्मा बोलू लागला.

“मी कमलाबाई जहागिरदार. माझ्या एकुलत्या एक मुलीला गोरखपूरच्या सरपोदारांच्या घरी दिले. थाटाने लग्न लावले पण त्या नराधमाने तिला फक्त छळले. तो श्रीधर माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून होता. हे कळायला मात्र मला खूप उशीर लागला. माझ्या लेकीने त्याच्यासाठी वटपौर्णिमेला शृंगार केला ,आपल्या तीन महिन्याच्या बाळाला घेऊन त्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या घातल्या.पण तिला कुठे ठाऊक होते ,ज्याच्या दीर्घायुष्यासाठी ती प्रार्थना करत होती तो मात्र तिच्या आणि तिच्या मुलाच्या जीवावर उठला होता.
तिचे फेरे पूर्ण होताच तो नराधम तिच्यावर गोळ्या झाडू लागला. मी मध्ये जाऊन माझ्या लेकीला वाचवले पण तिच्या पोटच्या गोळ्याला नाही वाचवू शकले. ती पुत्र शोकात वेडी झालीय. माझी लाडकी लेक वेडी झालीय हो वेडी. सगळे त्याच्या मनासारखे झाले.” आत्मा आक्रोश करत होता.


सगळ्यांचे डोळे पाणावले होते.

कमलाबाईंच्या आत्म्याला शांती मिळेल का ?
काय असेल रियांशच्या घरच्यांचा निर्णय ?

क्रमशः
©®प्राजक्ता पाटील