वाट पाहते पुनवेची.. भाग -४
रात्रीच्या या सगळ्या प्रकारानंतर सकाळी मात्र सगळ्यांचे चेहरे उदास दिसत होते. स्वामी महाराजांना तो आत्मा जे बोलत होता ते खरे आहे याची खात्री पटली होती पण या सगळ्यात रियांश आणि त्याच्या फॅमिलीची भूमिका महत्त्वाची होती. ते जो निर्णय घेतील तोच स्वामी मान्य करणार होते. घरामध्ये निरव शांतता पसरली होती. तितक्यात रियांशला मित्राचा कॉल आला आणि त्यांनी सांगितले , “रियांश तुझे कडे दिप्तीकडे आहे आणि ती तिच्या गावी गेली असल्यामुळे तुला दोन दिवसानंतर तुझे कडे मिळेल.”
रियांशच्या डोळ्यासमोर दीप्ती आणि त्याचा झालेल्या संवाद आला. दीप्ती गोरखपूरची राहणारी असून तिच्या घरी वटपौर्णिमेदिवशी कसली तरी पूजा करायचे ठरवले आहे हे तिने सांगितले होते. आणि दीप्तीचे नाव दीप्ती श्रीधर सरपोदार.
“हाऊ डॅमेज !” असे म्हणून रियांशने आपला हात जोरात आदळला..
“काय झालं रियांश ? कोणाचा फोन होता ?” आई-बाबा एकदाच उद्गारले.
“आई ,मला गोरखपुरला जायचेय. खरच माझा जन्म त्या माऊलीला न्याय मिळवून द्यायला झाला आहे. तो आत्मा अगदी खरं बोलतोय. तुला आठवते गेल्यावर्षी मला युनिक राखी कोणी बांधली होती ? स्वतःच्या हाताने बनवलेली. जी मी आजही जपून ठेवलीय.” रियांश
“हो दीप्तीने. मला आठवते पण तिचे काय आता ?” रेवतीताई.
“आई ती दीप्ती त्या नराधामाची मुलगी आहे ज्याच्याविषयी तो आत्मा काल बोलत होता श्रीधर सरपोतदार.” रियांश.
“काय !” रमेशराव.
“हो बाबा , आता मला काहीही करून गोरखपूरला जायचेय. त्या माऊलीला मुक्त करायला.” रियांश.
“आपण सगळे मिळून जाऊया का ? तुझ्याशिवाय आम्हाला घरात चैन पडणार नाही.” बाबा.
“हो रियांश , मी ही तुमच्या सोबत येईन. त्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जे जे करता येईल ते मी ही करेन. आपल्याला लगेच निघायला हवं.” स्वामी महाराज.
सर्वजण गाडीत बसले. रियांशला त्या गावाची ओढ त्या दिवसापासून होती ज्या दिवशी त्याची दीप्तीशी भेट झाली होती पण त्या ओढीचे कारण त्याला आज कळाले होते. त्याचे डोळे आपोआप पाणावले होते.
रियांशने दीप्तीला कॉल केला तो तिच्या गावी आलाय हे तिला सांगितले. दीप्तीसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. ज्याला आपण दादा म्हणतो तो रियांश दादा आज तिच्या गावी येणार होता. पण रियांश आल्यानंतर तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरील मुखवटा उतरला जाणार होता. दीप्ती रियांशच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की नाही हा ही प्रश्न होताच. गाडी सरपोतदारांच्या हवेलीसमोर येऊन उभी राहिली. दीप्ती दारातच उभी होती. तिने रियांशच्या स्वागताची तयारी केली होती. पण रियांश नेहमी असतो तितका खुश दिसत नव्हता. दीप्तीने वेलकम म्हणून रियांशच्या हातात ते कडे घातले. दीप्तीचे आईबाबा रियांशच्या आईबाबांना चहापाण्यासाठी आत घेऊन गेले.
रियांशने दीप्तीला त्याला फार्म हाऊसवर जायचेय असे सांगितले.
आल्या आल्या रियांश असे का बोलतोय हा प्रश्न दीप्तीला पडला होता.
ती म्हणाली , "तुला कॉलेजमधून कळाले ना आमच्या घरी फार्म हाऊसवर पूजा असते ते. तिथेच जायचेय आपल्याला. आता थोडा वेळ वाट पहा. पण फार्म हाऊसच्या मध्ये जाण्याची कुणालाही परवानगी नाही."
"का ?" रियांश म्हणाला.
“तिथे एक भूत राहते. जे खूप डेंजर आहे. तुला माहितीये मला ही अंधश्रद्धा वाटत होती म्हणून पाचवी किंवा सहावीत असताना मी एकटीच फार्म हाऊसवर गेले होते. कोणालाही न सांगता. तेंव्हा त्या भूताने मला पकडले होते. तुला माहितीये मी तब्बल एक महिना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. खूप विचित्र आहे ती हडळ. सतत माझं बाळ , माझं बाळ म्हणून ओरडत असते. तेंव्हापासून कानाला खडा लावलाय. तिकडे मी ही जाणार नाही आणि कोणाला जाऊ ही देणार नाही.” दिप्ती.
रियांशच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याला प्रचंड संताप आला होता. एका अबला स्त्रीला भूत बनवून , तिच्याच हक्काच्या घरी कोंडून ठेवून ,स्वतः सुखाने राहणाऱ्या दीप्तीच्या आईबाबांचा त्याला भयंकर राग आला होता. पण दिप्तीचा निरागसपणा त्याला माहीत होता. या सगळ्यात तिची काहीच चूक नाही हे ही त्याला ठाऊक होते त्यामुळे स्वतःच्या रागाला त्याने आवर घातला.
तो दीप्तीला म्हणाला , “प्लीज दीप्ती , दादा म्हणतेस ना मला. मग मला घेऊन चल त्या फार्म हाऊसवर. मी तुला शब्द देतो , तुला काहीही होणार नाही.”
“अरे माझा तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे. ज्या दिवशी तू मला त्या गुंडांपासून वाचवलस त्या दिवशीच तू माझा भाऊराया बनलास. पण बाबा आणि आई नाही जाऊ देणार.” दीप्ती.
रियांशला नाराज झालेला पाहिल्यावर दीप्तीने आई-बाबांना वेगळेच कारण सांगून त्यांच्या आधी फार्म हाऊसवर पोहोचायचे ठरवले. स्वामी महाराज , रियांशचे आई बाबा , रियांश आणि दीप्ती पोहोचले.
कोळ्यांच्या घराने ,पक्षांच्या घरट्याने वेढलेला फार्म हाऊस बाहेरून खूपच भीतीदायक दिसत होता. या फार्म हाऊसवर कोणी राहत असेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसते जर त्या आत्म्याने रश्मी विषयी सांगितले नसते तर कोणालाच काही ठाऊक झाले नसते.
दरवाज्याजवळ जाताच “माझं बाळ , माझं बाळ” म्हणून कोणाच्यातरी किंचाळण्याचा आवाज येत होता.
दीप्तीने घाबरून पाय मागे घेतला पण रियांशने त्या आवाजाच्या दिशेने घरात धाव घेतली. त्याला त्या फार्म हाऊसमध्ये मायेची उब जाणवत होती. प्रत्येक भिंत काहीतरी सांगू पाहत होती. जणू काही या भिंतींनी गेली कित्येक वर्षे याच पुनवेची वाट पाहिली होती. तो त्या आवाजाच्या अगदी जवळ गेला. त्या फार्म हाऊसमध्ये एका कोपऱ्यात एका स्त्रीच्या हातापायांना जाड दोरखंडाने बांधून ठेवलेले दिसत होते. तिचा तो चेहरा पाहिल्यावर दीप्तीला लहानपणीची हडळ आठवली. ती म्हणाली , “रियांश दादा , मागे हो हीच ती हडळ. जीव घेईल रे ती तुझा.”
रश्मीने रियांश हे नाव ऐकताच तिला तिच्या तान्ह्या यशची आठवण झाली.
“यश ,माझं बाळ. ये ,माझ्याजवळ ये. कुठे आहेस तू?” रश्मी म्हणाली.
रियांशचे डोळे पुन्हा ओले झाले. ती आर्त हाक ,तो मधुर आवाज त्याच्यासाठी अनोळखी नव्हताच. तो दीप्तीला म्हणाला , “पाहिलंस दीप्ती आता ही तुला हडळ वाटते का ? आई आहे ती माझी. दुसऱ्यांच्या मदतीला वेळेवर पोहोचणारा तिचा मुलगा जन्मदात्रीच्या मदतीला मात्र खूप उशिरा धावून आलाय.” दीप्तीला रियांश काय बोलतोय याचा काही संदर्भ लागत नव्हता.
रियांशने त्या स्त्रीचे हात पाय सोडले.
तितक्यात त्याच्यावर कोणीतरी वार केला. दीप्तीने पळत जाऊन तो वार स्वतःवर घेतला.
तितक्यात त्याच्यावर कोणीतरी वार केला. दीप्तीने पळत जाऊन तो वार स्वतःवर घेतला.
“दीप्ती ताई तुम्ही ?” तो व्यक्ती म्हणाला.
“सदू काका तुम्ही ? काय चाललय इथे ? अहो तुम्हीच मला सांगायचात ना इथे हडळ राहते म्हणून आणि मग तुम्ही इथे काय करताय ?” दीप्ती.
“ही त्या नराधमाची मुलगी आहे तर. थांब आधी मी हिचाच जीव घेते. हिच्या आईच्या प्रेमात आंधळा होऊनच माझ्या रश्मीला म्हणजे तुझ्या आईला मारण्याचा त्या श्रीधरने कट रचला होता.”
आत्मा दीप्तीवर हल्ला करणार तोच रियांश हात जोडून दीप्तीच्या बाजूने गोल फिरत म्हणाला , “आजी मी दीप्तीचा भाऊ आहे , तिचा पाठीराखा. आज तिच्यामुळेच मला माझ्या आईपर्यंत पोहोचता आले आहे. प्लीज तिला काही करू नका. यात तिची काही चूक नाही. निष्पाप लोकांना आत्मा त्रास पोहोचवत नाही असं म्हणाला होतात ना तुम्ही काल ?” रियांश.
दीप्तीला यातले काहीच समजत नव्हते हे सगळे काय घडत होते तितक्यात स्वामी महाराजांनी सर्व साहित्यानिशी पूजा सुरू केली. तेंव्हा त्या पूजेतून जो धूर बाहेर आला. त्या धुरात श्रीधर आणि रश्मी यांच्या जीवनातील सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. त्यातच श्रीधरने रश्मीला गोळ्या घालण्यासाठी उचललेली बंदूक , तिच्या बाळाचा मृत्यू आणि रश्मीची स्थिती स्पष्ट दिसत होती. रियांशने या सगळ्यांची व्हिडिओ क्लिप बनवली. स्वतः एल. एल. बी. चे शिक्षण घेत असल्यामुळे त्याच्या ही गोष्ट लगेच लक्षात आली. न सांगताच दीप्तीला आपल्या आई-वडिलांचा सर्व भूतकाळ समजला. तिच्याही डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. हे सगळे पाहताना रश्मी चक्कर येऊन पडली आणि अचानकच तिची गेलेली स्मृती परत आली.
तिला तिचा भूतकाळ स्पष्ट आठवला. रियांशने आणि रियांशच्या आईबाबांनी रश्मीला सगळे काही सांगितले. रश्मीने रियांशला आपल्याजवळ घेतले मोठ्याने हंबरडा फोडला. ती स्वामी महाराजांना म्हणाली , “महाराज मला माझ्या आईला एकदा पाहायचे आहे.”
महाराजांनी मंत्रोच्चार सुरू केले. आईलाही लेकीची इच्छा पूर्ण करायचीच होती. आईचा आत्मा तृप्त झाला होता. आता फक्त आईला श्रीधरचा जीव घ्यायचा होता. तितक्यात तिथे श्रीधर आला. अचानक हॉलमधील झुंबर श्रीधरच्या डोक्यावर पडले. श्रीधर पूर्णतः जखमी झाला होता.
दीप्ती धावत जाऊन वडिलांना म्हणाली , “बाबा डोळे उघडा , माझ्याशी बोला ना.”
“नाही बाळा आता माझ्याकडे खूप थोडा वेळ आहे. रश्मी मला माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय.” एवढे म्हणून श्रीधरने डोळे मिटले.
“अहो हे काय झालं ? पाप तुम्ही एकट्यानेच केले नव्हते ना ? मी ही तितकीच दोषी आहे. मी ही रश्मीताईंची खूप मोठी गुन्हेगार आहे. (मोठमोठ्याने टाहो फोडत दीप्तीची आई बोलत होती.) कायद्याने जी शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे.” दीप्तीची आई म्हणाली.
अशाप्रकारे पापी लोकांना त्यांच्या पापांची शिक्षा देऊन आणि निष्पाप रश्मीची सुटका करून रश्मीच्या आईचा आत्मा आनंतात विलीन झाला.
©® सौ. प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा