वाटणी ..भाग- १
आज अण्णांनी असे पाऊल का उचलले ? अत्यंत बिकट परिस्थितीतही अगदी नेटाने आणि हिमतीने आपल्या संसाराचा हा पसारा अण्णांनी मोठ्या कष्टाने सावरला होता. गावातील प्रतिष्ठित आणि वयस्कर असलेले आण्णा प्रत्येकाच्या हाकेला आणि गरजेला धावून जात होते. अण्णांचा गावातील रुबाब हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून होता. आज अण्णांना जगाचा निरोप घेऊन दहा दिवस झाले होते.
"हे काय आहे दादा ?" कागद समोर पकडून उभ्या असलेल्या रमेशला उमा म्हणाली.
"हे जमिनीचे कागद आहेत. आता अण्णांच्या नावची सर्व जमीन मी माझ्या नावावर करणार आहे. त्यावर तुमची काही हरकत नाही म्हणून सह्या हव्या आहेत." रमेश आवाज चढवून म्हणाला.
"रमेश अरे वडीलांना जाऊन दहा दिवस झाले नाहीत आणि तू तुझ्या बहिणींना सह्या मागतोयस? इतकी कसली घाई झाली रे तुला ? सर्वजण दु:खात आहेत याची तरी जाणीव ठेव.आमच्या नंतर सगळे तुझेच तर आहे." आईचा कंठ दाटून आला होता.
अण्णांना दोन मुली व एक मुलगा आणि प्रत्येक सुख दुःखात सोबत असलेली त्यांची बायको एवढेच काय ते अण्णांचे जिवाभावाचे सगे सोयरे होते कारण लहान असतानाच आईच्या प्रेमाला मुकलेले आण्णा चुलते आणि चुलती यांच्या धाकापोटी स्वतःच्याच घरात अगदी मजूरासारखी चाकरी करत होते.
मुलावर असलेल्या प्रेमाखातर दुसऱ्या लग्नाचा विचारही न करणारे अण्णांचे वडील मात्र या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. चार गावचा मुलुख सांभाळणारे सरपोतदार चोवीस तास नशेमध्ये धुंद असायचे यावेळी अण्णा मात्र घरची तसेच शेतातील कामे अगदी चोख पार पाडत. अण्णा थोडे मोठे झाले आणि नियतीने आपले रौद्ररूप धारण करत अण्णांच्या आबांनाही त्यांच्यापासून दूर केले. अण्णांच्या कष्टात तर आता आणखीनच भर पडली. आबांनी स्वतःच्या हिमतीवर जी काही जमीन मिळवली होती त्या सगळ्यांवर आता अण्णांच्या काका काकूंनी स्वतः चे नाव अण्णांच्या नकळत लावले. अण्णा मात्र फक्त कष्टाचेच धनी उरले.
जी काही थोडीफार जमीन अण्णांनी स्वकष्टाने मिळवली होती त्यात घामाचे मोती पेरत आण्णा मोत्याचा घास पिकवू लागले. पुढे त्यांचे लग्न शामल ताईंशी झाले. आता तरी वनवास संपलाय कारण दररोज प्रेमाच्या भाजीभाकरीचा घास वेळेवर मिळू लागलाय असे वाटत होते.
पण... एखाद्याच्या आयुष्यात सुख केवळ मृगजळासारखे भासते पण प्रत्यक्षात दुःख पाठलाग सोडत नाही त्याप्रमाणे लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी घरी पाळणा हालत नव्हता. म्हणून परत सुरू झाले ते उपास तापास , वृत्तवैकल्ये आणि नवस सायास.. आणि अखेर आनंदाची बातमी मिळाली. अण्णांना पुत्ररत्न प्राप्त झाले.परिस्थिती नसतानाही अगदी थाटात बारसे झाले होते.एवढेच नव्हे तर आपल्या या काळजाच्या तुकड्याला अगदी आरामात जीवन जगता यावे म्हणून आई वडीलांनी माध्यमिक शिक्षणासाठी रमेशला जिल्ह्याच्या नावाजलेल्या शाळेत घातले. पण स्वतः ला मात्र कष्टाच्या सागरात बुडवून घेतले ते कधीही बाहेर न पडण्यासाठी.
"बरोबर बोलतेय दादा आई .अरे आजवर तू अधिकारी व्हावास म्हणून काय काय भोगले आहे आण्णा आणि आईने. आम्ही दोघी हुशार असताना त्यांनी आम्हाला शिकवले नाही की मोठे स्थळही पाहिले नाही. आमची लग्न अगदी कमी खर्चात केली कारण तू त्यांची म्हातारपणाची काठी होतास म्हणून आणि आज त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्याऐवजी तू त्यांच्या प्रॉपर्टीची वाटणी करण्याचा विचार करतोयस?" पाणावलेल्या पापण्या पुसत उमा म्हणाली.
"अगं प्रत्येक आईवडील हेच करतात आपल्या मुलांसाठी. यांनी काय वेगळे केले माझ्यासाठी ?" रमेश आईच्या काळजावर घाव घालत बोलला.
"ताई तुला सही करायची असेल तर खुशाल कर पण मी सही करणार नाही. आजवर माहेरहून रिकाम्या हाताने परत आली म्हणून सासूने छळले. आता चोवीस तास नशेमध्ये असणारा नवरा आणि लग्नाला आलेली मुलगी ह्या संकटांना सामोरे जाताना वडीलांच्या संपत्तीत वाटा मिळाला तर काय हरकत आहे?" लहानपणापासून स्पष्ट बोलणारी रमा आजही स्पष्ट बोलली.
"रमा काय बोललेस तू हे ?" उमा आवंढा गिळत म्हणाली.
"जे खरे आहे तेच बोलतेय मी.आजवर कधीच हट्ट केला नाही पण दादाच्या मुलीला जेव्हा मुलासोबत हक्क दिला जातो ना तेव्हा ते सगळे दिवस आठवतात मला.आपला शाळेतला पेपर न देता आपण दादाला पैसे पाठवायचे म्हणून आई अण्णांना कितीतरी वेळा शेतात धान्य काढण्यासाठी मदत केलीय. आणि आता तो..." हुंदका देत रमा म्हणाली.
"ठीक आहे तू सही करणार नसशील तर उद्या मी ही तेच करेन जे अण्णांनी केलेय." रमेश असे बोलून तावातावाने निघून गेला.
काय केले असेल अण्णांनी ?
रमेश खरेच बोललाय ते करेल काय?
काय असेल रमाचा निर्णय?
रमेश खरेच बोललाय ते करेल काय?
काय असेल रमाचा निर्णय?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील
*********
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा