वाटणी
भाग -३
भाग -३
"अरे तुम्ही गावाकडची लोकं अशीच इमोशनल ब्लॅकमेल करता ! तुम्हाला बिझनेस मधले काय कळणार ? सतत शेतात अमाप खर्च करायचा आणि मालाला भाव मिळाला नाही म्हणून तोच माल रस्त्यावर फेकायचा , जाळून टाकायचा नाही तर उपोषण करायचे एवढच. वर तू मला शिकवतोय मी काय करायला हवे होते ते. आता मी चुकीचा असेन पण एक दिवस तुम्ही माझ्या बुद्धी चातुर्याची प्रशंसा करणार लक्षात ठेवा. काय बोललो रे मी असे अण्णांना? सांग ना , सांग तू." रमेश पुढे म्हणाला.
"ऐक.आमचा गावात पाण्याची टाकी उभारून सर्वांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यायचे हा विषय फिक्स झाला. तेवढ्यात तुझा तू गावी येणार आहेस म्हणून फोन आला. फोन आला आणि अण्णांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तू आलास की लगेच कामाला सुरुवात करु असे म्हणून आण्णा तुझी वाट बघत दिवसभर चावडीवर बसून होते आणि तू आला ते जमिनीचे कागद समोर पकडून. तू अण्णांना सही मागितली आणि शहरात काय करणार आहे तो तुझा प्लॅन सांगितला. अण्णांना खूप मोठा धक्का बसला.त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चेहऱ्यावरचा रंग उडाला. तुला काहीही न बोलता आण्णा शेतात निघून गेले ते पुन्हा कधीही न येण्यासाठीच." असे म्हणून संजयने काढता पाय घेतला आणि तो निघून गेला.
" जा संजय जा. मलाही काही गरज नाहीये तुझी. आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे काम करतोस तू . मला तुझे तोंडही पाहायचे नाही यापुढे ." रमेश जोरजोरात म्हणाला.
" आणि हो तुम्हालाही मी स्पष्टपणे सांगतोय. मागितली मी सही . त्यात काय चुकले माझे ? मीच आहे ना त्यांचा वारसदार मग ?" रमेश निर्लज्जपणे म्हणाला.
"अरे रमेश ,आई मानत होते रे तुझे आण्णा त्या जमिनीला. त्यांची आईच तू त्यांच्यापासून दूर करायला निघालेलास का रे? तरी मला सतत वाटायचे हे असे काही करणार नाहीत. दुःख त्यांनी अगदी जन्मापासून भोगले. प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड दिलेय पण आता खरे सुख उपभोगायचे सोडून यांनी मलाच का सोडले ? खूप चुकीचे वागलास तू रमेश. खूप चुकीचे. स्वाभिमान दुखावलास तू अण्णांचा." आई हुंदके देत म्हणाली.
"आई तू तरी मला समजून घे प्लीज ! जशी अण्णांना गावात प्रतिष्ठा आहे तशीच मला शहरात आहे. मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ही फॅक्टरी बनवतोय आणि त्यासाठी मोठी रक्कम लागतेय. स्व कष्टाने मी जमीन विकत घेतलीय. आता फॅक्टरीच्या बांधकामासाठी गावाकडची माझ्या हक्काची जमीन विकायची ठरवली तर अण्णांनी एवढे मोठे पाऊल उचलायची काही गरज नव्हती असे मला वाटते. आणि सतत माझ्या शिक्षणासाठी तुम्ही फार कष्ट घेतले असे तुम्हाला वाटत असेल तर नाण्याची एकच बाजू तुम्हाला माहित आहे. तुम्ही होस्टेलची फीस कधीच वेळेवर पाठवली नसल्यामुळे दोन दोन दिवस मीही उपाशी राहून कसा अभ्यास केलाय ते माझे मलाच ठाऊक आहे.मी ही गरिबीचे चटके खूप सोसले आहेत. म्हणूनच माझ्या मुलांना मला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही.मला उद्या सह्या हव्या आहेत." असे म्हणून रमेश बाहेर गेला.
वातावरणात निरव शांतता पसरली होती. कसेबसे दोन घास खाऊन सगळेजण झोपायला गेले. उमा अजूनही तिच्याच विचारचक्रात हरवली होती.
"काय गं उमा कसला विचार करतेस ?" आई म्हणाली. रात्रभर उमा आणि आई दोघींच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता.
"उद्या सह्या देऊन टाकू दादाला. काय हवे ते करू दे त्याला. या सगळ्यात देवासारखे माझे आण्णा मात्र मला सोडून गेले. आता उद्या वहिनीची भेट घेतली की निघतो आम्ही. " उमाने दीर्घ श्वास घेतला.
" खरं आहे तू म्हणतेस ते.आता आपलेच दात नी आपलेच ओठ. त्याला जे हवे ते करू दे. मी ही आता थोड्याच दिवसांची सोबती आहे." आई म्हणाली.
"आई ,असे नको ना ग बोलू . आधीच अण्णांच्या जाण्याची पोकळी भरून निघाली नाही अन् तुझ्या अश्या बोलण्याने आमच्या मनाला किती वेदना होतेय." रमा आईच्या कुशीत शिरत म्हणाली.
कसा असेल उद्याचा दिवस ?
रमा आणि उमाच्या सह्या घेऊन रमेश कायमचे शहरात निघून जाईल का ?
अण्णांचे स्वप्न अर्धवटच राहणार का?
रमा आणि उमाच्या सह्या घेऊन रमेश कायमचे शहरात निघून जाईल का ?
अण्णांचे स्वप्न अर्धवटच राहणार का?
जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा क्रमशः
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा