Login

वाटणी भाग -४

मने जोडण्याचे काम करणारी ही अनोखी वाटणी.
वाटणी भाग -४


आई ही लेकीला प्रेमाने कुरवाळत झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला होता. सर्वांनी प्रात: विधी उरकला. चहा झाला. दादाने पुन्हा सहीसाठी पेपर समोर पकडले. दोन्ही बहिणींनी पटापट सह्या केल्या. आईनेही सही केली. शेजारील भावकितील एक जण स्वयंपाक करायला आल्या आणि त्यांनी स्वयंपाक केलाही. वहिनीचे (रमेशच्या बायकोचे)वडील अगदी चार दिवसांचे सोबती होते. ते आजारी असल्याने रमेशची बायको ऋत्विक आणि ऋचाला घेऊन तिच्या माहेरी गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास ती घरी आली.

आल्या बरोबर ऋत्विकने वडीलांना आवाज दिला.

" बाबा ,बाबा , कुठे आहात तुम्ही ? माझे एक महत्वाचे काम आहे तुमच्याकडे."

"आय एम कमिंग माय डियर सन. बोल काय काम आहे ?"

"तुम्ही शहरात जी जमीन घेतली आहे ना फॅक्टरीसाठी ती माझ्या नावे करा. मला हॉस्पिटल सुरु करायचे आहे." ऋत्विक अगदी वेगळ्याच स्वरात आज वडिलांशी बोलत होता.

"हे काय बोलतोस तू ऋत्विक ? जस्ट जोक ! हो ना !" बाबा लेकाला लडिवाळपणे विचारत होता.

"जोक ! माझे आयुष्य तुमच्यासाठी जोक आहे. माझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही." ऋत्विक रागात म्हणाला.

"अरे बेटा , तसे नाही रे .तू इतके दिवस प्रॅक्टीस करून स्वकष्टाने हॉस्पिटल उभारणार असे म्हणत होतास म्हणून सहज.." रमेश प्रेमाने समजावत होता. पण पुढे ऋत्विक जे बोलला त्याने रमेशच्या काळजावर घाव घातला.

ऋत्विक म्हणाला ,"तुमच्या नंतर हे सगळे माझेच आहे ना ? मग तुम्ही मला काहीच विचारायचे नाही. आणि हो तुम्हाला वाटेल मी इतके शिकवले एम. बी. बी. एस. केले पण रात्र रात्र जागरण मी केले , मार्क मी मिळवले हे लक्षात ठेवा."

अचानक आपल्या लेकात इतका बदल झाला आणि तो घरातील लोकांसमोर आपला अपमान करतोय हे सगळे रमेशच्या जरा जास्तच जिव्हारी लागले. आपोआप त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

रमेशच्या आईला आणि दोन्ही बहिणींना मात्र रमेशसाठी वाईट वाटत होते. पण बापलेकांच्यामध्ये आपण काय बोलायचे ? म्हणून त्या तिघी गप्प होत्या.

" ये बेटा , असे नको ना बोलू . हे सगळे मी तुझ्या आणि दिदीच्या उज्वल भविष्यासाठीच करतोय." रमेश मुलाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

ऋत्विकने तो हात बाजूला केला.

तेवढ्यात मुलगी म्हणाली ,"बाबा ! " रमेशच्या जीवात जीव आला. त्याला अशी जाणीव झाली की ,नक्कीच ऋचाला दादाचे हे बोलणे आवडले नाही आणि म्हणूनच मला आधार देण्यासाठी ती मला आवाज देतेय.

"बोल ऋचा , तुला दादाचे बोलणे आवडले नाही ना आणि म्हणूनच तू त्याला समजावण्यासाठी मला गप्प राहायला सांगतेस हो ना?" मुलीजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून रमेश म्हणाला.

"असे काही नाही बाबा. बघू ते जमिनीचे कागद इकडे. सगळे मला माझ्या नावाने हवेत. परत दादा बदलला तर मी काय करणार ना ? लहानपापासूनच तुम्ही सगळे सेम दिलेत ना आम्हाला. मग आताही तेच करा. त्याशिवाय मी अन्नाचा एक घासही घेणार नाही." ऋचाही हट्टाने म्हणाली.

'ऋचाही आज किती वेगळी वागते आहे.' मनात विचार करून रमेशने अश्रू पुसले.

तरीही लेकीला प्रेमाने समजावत तो तिच्या जवळ जात म्हणाला , "ये चिमणाबाई ,अग तू तर नेहमी म्हणते ना ? मला काही नको बाबा तुम्हीच माझे गॉड गिफ्ट आहात म्हणून. मग आज हे असे का बोलतेस ?"

"चुकीचे तर नाही ना बोलत मी. मग झाले तर! तुम्ही जोपर्यंत ही सगळी शेती माझ्या नावावर करणार नाहीत तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही." ऋचाही दादाचीच सख्खी बहीण हट्टाला पेटल्यासारखी म्हणाली.

"नाही पिल्लू ,असे नको बोलू. हे बघ मी दोन तासात सगळी जमीन तुझ्या नावाने करतो. आत्ताच जाऊन वकिलांना घेऊन येतो. पण आज मला खूप वाईट वाटले आयुष्यभर मी मुलांना मोठे करण्याचा विचार केला पण काय माहित तिच मुले माझ्याशी अशी वागतील.मला आता समजले ,माझ्या असण्याने किंवा नसण्याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्या आयुष्यात माझी काहीच किंमत नाही. " रमेश डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंना थांबवू शकला नाही.

"अहो निघालात कुठे ? थांबा जरा." रमेशची पत्नी रेवा म्हणाली.

"मला पूर्ण खात्री होती की तू आपल्या मुलांना समजून सांगशील ते." रमेश पत्नीला मिठीत घेत म्हणाला.

का थांबवले असेल रेवाने रमेशला ?
मुले ऐकतील का आई वडिलांचे ?
काय घडेल पुढे ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील