वाटणी भाग -५
"सरपोतदार घराण्याचं रक्त आहे ते. मी समजावून सांगितले की लगेच थोडीच ऐकणार. " रेवा म्हणाली.
"मग का थांबवलेस मला ?" रमेशला स्वतःला सावरत म्हणाला.
"वास्तविक जग पाहण्यासाठी!" रेवा म्हणाली.
"म्हणजे काय?" रमेश म्हणाला.
"अहो ज्या आईवडिलांनी तुम्हाला आजवर कधीही मदत मागितली की , आपण आपल्या मुलासाठी काय केले हे एका शब्दानेही बोलून दाखवले नाही त्यांना जेंव्हा समजते की तो मुलगा फक्त त्याच्या मुलांचा विचार करतोय आणि वृद्ध आईवडिलांचे काय? त्यांना कोणी आधार द्यायचा ? हे त्याच्या लक्षातही नाही. तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. तुम्हाला आता किती वेदना होताहेत त्याहून कैक पटीने जास्त अण्णांना झाल्या असतील कारण मुलांनी केवळ घरच्यांसमोर तुम्हाला दुखावले तुम्ही तर अण्णांना संपूर्ण गावासमोर हतबल केलेत. आता तरी स्वतःची चूक मान्य करा." रेवाचा कंठ दाटून आला होता.
रमेशला ही आपण चुकलो यांची जाणीव झाली. तो आईच्या मिठीत जाऊन आईची माफी मागू लागला.
"आई मला माफ कर गं .मी चुकलो. माझ्यामुळे माझे आण्णा हे जग सोडून गेले." आई आणि रमेश दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तितक्यात ऋत्विक म्हणाला ," नाही बाबा , आजोबांनी तुमच्यामुळे विषारी औषध नाही घेतले."
"काय ? खरं सांगतेस ना ऋत्विक तू ?" रमेश साशंक नजरेने म्हणाला.
"हो बाबा. अगदी खरं. ज्योतीराम तुम्हीच सांगा. त्यादिवशी काय झाले ते." ऋत्विक म्हणाला.
ज्योतीराम म्हणाला ," त्या दिवशी तुम्ही शेत विकायचे ठरवले हे ऐकून अण्णा उदास झाले होते. ते शेतात आले. शेतात पाणी नसल्यामुळे ते दररोज घरच्या फवारण्याच्या ड्रममध्ये पाणी घेऊन यायचे. आणि त्यादिवशी ते घाईने पाणी घेऊन आलेच नाहीत. पण टेन्शनमध्ये दारू पिऊन आले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे पाणी समजून ते फवारण्याच्या ड्रम मधील औषध प्याले.मी नुकताच तेथे आलो होतो. तेव्हा मलाही म्हणाले , "पाण्याचा वास घाण येतोय."
मी थोडे जवळ जाऊन पाहिल्यानंतर मला ही वास येऊ लागला.मी खूप घाबरलो होतो.मलाही काही सुचत नव्हते.
तेव्हा अण्णा म्हणाले ,"अरे आज मी घरून पाण्याचा ड्रम आणलाच नव्हता. इथल्या ड्रममध्ये फवारायचे औषध होते आणि तेच ड्रम मधील औषध मी पिले आहे. मला दवाखान्यात घेऊन चल.माझ्या रमेशला फोन कर." आणि लगेच मी तुम्हाला फोन केला. तरीही आपण आण्णा सारख्या देव माणसाला वाचवू शकलो नाहीत." हंबरडा फोडत ज्योतीराम रडू लागला.
रमेशला ही रडू कोसळले. आज सत्य कळल्यावर जी सल रमेशच्या मनात आयुष्यभरासाठी राहिली असती ती दूर झाल्याचे समाधानही वाटले. मुलांनी बाबांना मिठी मारली.
"खूप दुष्ट आहे ना तुमचा बाबा. म्हणून तुम्हीही त्याच्याशी असे वागताय." रमेश म्हणाला.
"नाही बाबा तुम्ही खूप चांगले आहात. पण मुलांच्या भविष्याच्या चिंतेत तुम्ही जे वागलात ते चुकीचे आहे. त्यात तुम्ही कोणाचे ऐकतही नव्हतात म्हणून आम्ही हे नाटक केले." ऋत्विक म्हणाला.
"नाटक , कसले नाटक ?" रमेश म्हणाला.
"सर्व काही आमच्या नावावर हवे आहे हे नाटक." ऋत्विक म्हणाला.
"हो बाबा , आजवर तुम्ही आम्हाला खूप काही दिले. पण आज आम्ही जे मागतोय ते तुम्ही आम्हाला दिले तर आयुष्यभर आम्ही समाधानी जीवन जगू ." ऋचा म्हणाली.
रमेश मुलांना म्हणाला ," हे सगळे तुमचेच तर आहे. अजून काय हवेय तुम्हाला?"
"आमच्या बाबांचा हा हात आशीर्वाद देण्यासाठी सदैव आमच्या डोक्यावर हवाय कारण आजोबांची गावात पाण्याची सोय करण्याची इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि हो बाबा ती शहरातील जागा नकोय मला. तिथे तुम्ही रमा आत्यासाठी एखादा बिझनेस सुरू करुन दिलात तर त्यांच्या उत्पन्नाची आणि मुलांच्या शिक्षणाची सोय होईल. " ऋत्विक म्हणाला.
"आणि हो बाबा , ही जमीन तुम्ही अजिबात विकायची नाहीत. मी आणि गौरव (उमा आत्याचा मुलगा ) लग्नानंतर इथेच राहणार आहोत आजीसोबत.गौरव बोल ना तू पण." ऋचा म्हणाली.
"हो मामा माझे आणि ऋचाचे एकमेकांवर प्रेम आहे.आम्ही दोघे मिळून लवकरच येथे एक प्रोजेक्ट लॉन्च करतोय." गौरव म्हणाला.
हे ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता.
प्रत्येक घरात वाटणी होताना भावनांना ठेच पोहोचतेच पण या मुलांनी सगळ्यांची मने जोडण्याचे काम करत ही अनोखी वाटणी केली.
शामलताई , रमेश आणि उपस्थित सर्वांना मुलांचे कौतुक वाटले.
समाप्त..
प्रत्येक घरात वाटणी होताना भावनांना ठेच पोहोचतेच पण या मुलांनी सगळ्यांची मने जोडण्याचे काम करत ही अनोखी वाटणी केली.
शामलताई , रमेश आणि उपस्थित सर्वांना मुलांचे कौतुक वाटले.
समाप्त..
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील