वाटणी
भाग -२
भाग -२
आई आणि उमा यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. भूतकाळातील घटनांचा साक्षीदार असलेल्या त्या देवाकडे एकटक पाहत आई म्हणाली, "देवा , हे सर्व पाहण्यासाठी तू मला जिवंत ठेवलेस का रे ? का नाही मला यांच्या आधी तुझ्याकडे बोलावलेस ? मुलगा अधिकारी आहे हे सांगताना आम्हाला आपण आज पोटाला चिमटा काढून झोपतोय याची जाणीवही होत नव्हती पण आज तोच मुलगा असे काही बोलतोय जे ऐकल्यानंतर तप्त शिसे कानात ओतले की काय ? असे वाटतेय."
"आई तू नको वाईट वाटून घेऊस. होईल सगळं ठीक." उमा आईला धीर देत म्हणाली. पण दादा आणि रमा दोघेही दोघेही खूप हट्टी आहेत हे तिलाही ठाऊक होते.
रमाला आई आणि ताई दोघींच्याही वेदना जाणवत होत्या. तिलाही अण्णांच्या आठवणीने भरून येत होते. 'अण्णांनी आपल्याला आवडतो म्हणून आठवणीने आणलेला रविवारच्या बाजारातील तो जिलेबीचा पुडा आणि स्वतः च्या हातांनी भरवलेली ती जिलेबी. तिची चव दुसऱ्या कशातही तिला माहेर सोडून सासरी आल्यापासून सापडली नव्हती. शेंडेफळ म्हणून अण्णांचा सगळ्यात जास्त जीव रमावरच तर होता. रमा धायमोकलून रडू लागली. तिला आठवले आज आण्णा जिवंत असते तर स्वतः ला कितीही त्रास झालेला त्यांनी हसत हसत सहन केला असता पण माझ्यामुळे दादाने जीवाचे काही बरेवाईट केले असते तर अण्णांनी मला कधीच माफ केले नसते.' हा मनात विचार करून रमा म्हणाली ,
"अण्णा माझं चुकलं. मी दादाच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागायला नको होता.आई मला माफ कर गं. स्वार्थी झाले होते मी. दादाच्या जिवावर उठले. ज्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करायचे त्याला मी हे जग सोडून जायला कशी प्रवृत्त करू शकते." रमाने रडून मन मोकळे केले. आईने साश्रुनयनांनी रमाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"आई दादा कुठे असेल ? त्याला पाहायला पाठव ना कोणीतरी. मला माझा भाऊ हवाय." रमा घाबरून म्हणाली.
तितक्यात रमेशला घेऊन त्याचा चुलत भाऊ संजय तिथे आला आणि म्हणाला, "खरंच शिकून शहापण येत हे ऐकलं होतं पण असलं शहाणपण येत असेल तर आमच्या सारखं अडाणी असलेलं बरं."
"काय झालं संजय? असा का रे कोड्यात बोलतोस?" शामल ताई चेहऱ्यावरचे अश्रू पुसत म्हणाल्या.
"अहो काकी , हा शिकलेला तुमचा लेक बहिणींना स्वतः च्या वडीलांच्या दहाव्या दिवशी सह्या मागतोय. का ? तर ही काळी आई विकून त्याला शहरात स्वतः ची फॅक्टरी सुरू करायची आहे. व्वा! आणि बहिणीने सही दिली नाही तर आण्णा सारखं विष पिऊन आत्महत्या करणार आहे म्हणे. अरे आण्णा अशिक्षित असल्याने त्यांनी तसले पाऊल उचलले आणि त्यालाही सर्वस्वी तूच जबाबदार आहेस इतके दिवस गप्प होतो कारण मला खरे सांगून कोणालाही दुखवायचे नव्हते कारण अण्णा आपल्याला सोडून गेलेत हे ऐकल्यावर तरी तुझा निर्णय बदलेल असे मला वाटले होते. तेव्हा आपल्या बोलण्याने नात्यात वितुष्ट नको आणि आता बोलून तरी काय फायदा असे वाटले होते पण हे तुझे अति होतेय. म्हणून स्पष्ट सांगतोय. त्यासाठी तुझे माझे नाते कायमचे संपले तरी चालेल." संजय धायमोकलून रडू लागला.
"काय झाले संजय ? प्लीज! सांगशील का ?" उमा हात जोडून म्हणाली.
"हो काही झाले तरी मी आज सांगणार आहे. त्याशिवाय अण्णांच्या आत्म्यास शांती नाही लाभणार. अगं आपल्या गावात सतत दुष्काळजन्य परिस्थिती असते हे काही नवीन नाही. पावसाच्या पाण्यावर शेती करताना शेतकऱ्यांना काय दमछाक करावी लागते ते आम्हालाच माहीत होते. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेजारच्या तळ्यातून पाईपलाईन करत सर्वांच्या शेतात कायमची पाण्याची सोय करायची असे ठरवले होते. नेहमी प्रमाणे अण्णांनी पुढाकार घेतला आणि जास्तीची मदत आण्णा स्वतः करतील असा गावकऱ्यांना शब्दही दिला कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की , त्यांचा हा कलेक्टर लेक त्यांना मदत करताना नाही म्हणणार नाही." संजयला अश्रू अनावर झाले होते. आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून डोळे पुसत संजय खाली बसला.
रमा चटकन पाणी घेऊन आली. "नकोय रमा मला पाणी. अग लहानणापासून मी स्वतःला तुमच्यापैकी एक समजत होतो. आणि याचा तर सगळ्या गावकऱ्यांना किती अभिमान होता. हा येणार म्हणून कळताच प्रत्येक वाड्यात दररोज याच्या आवडीचा एक एक पदार्थ तयार असायचा. गावाकडची माणसं आम्ही थोडीच उपकार करत होतो याच्यावर असे याला वाटेल पण अरे तुझ्याकडं पाहून आमच्या मुलांनाही शहाणपण यावं. त्यांनीही तुझ्यासारख व्हावं म्हणून तुझे पाय आपल्या घराला लागावे अशी प्रत्येकाची इच्छा असायची पण आज तू आम्हा सगळ्यांची निराशा केली आहेस.अशा पुत्रापेक्षा निपूत्रीक असलेले बरे असे वाटायला लागले आहे."
संजय बोलतोय ते सर्व खरे असेल का ?
खरंच रमेशमुळेच अण्णांनी आत्महत्या केली असेल काय ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
©️®️ सौ.प्राजक्ता पाटील