Login

वयाचा व्हिक्टिम कार्ड

It's About The Experience That We Get On Daily Basis. Some Old People Who Take Advantage Of Their Age And How The Journey Experience Turns Into Nightmare.
वयाचा व्हिक्टिम कार्ड
© पूजा आडेप.


आलिया भटचा फ्लाइट सीन आज बघून पुन्हा एकदा रेल्वे प्रवासातला तो प्रसंग ताजा झाला. बहुतांश जणांनी पाहिले असेल की आलिया विमानात येते आणि पाहिले तर काय—एक वयस्कर गृहस्थ तिच्या सीटवर बसले असतात. विनम्रपणे जागेची मागणी करताच ते गृहस्थ सांगतात की त्यांना त्यांच्या मुलासोबत बसायचे आहे आणि समोरच्या सीटकडे बोट दाखवून तिकडे जायलासांगतात. तिथे दोन पुरुष बसले होते, मधली सीट रिकामी होती. आलियाने अस्वस्थ बसण्यापेक्षा आपल्या जागेवरच बसायचा निर्णय घेते. वृद्ध गृहस्थ "आजकालची पिढी अ‍ॅडजस्ट करत नाही, सन्मान करत नाही" असा टोमणा मारतात, त्यावर आलियाने ठामपणे उत्तर देते —"ही माझी आधीच बुक केलेली सीट होती, तुम्हाला नियोजन करायला हवे होते, आणि आदर दोन्ही बाजूंनी असतो!"


मला आणि माझ्या बहिणीला असाच काहीसा अनुभव आला.
ह्या गोष्टीला वर्ष पूर्ण होईल पण तो प्रसंग काही डोक्यातून जात नाही. कारण आम्ही सज्जन, सुशिक्षित, (अति)सुसंस्कृत आणि निवृत्त झालेले सोऽऽ काॅल्ड सूक्ष्मजीवी लोकांनी मांडलेला उच्छाद. प्रसंग पुढे...

मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात आलेला अनुभव. आमचे कुटुंब बहिणीच्या लग्नासाठी गावी जात होतो. साधारणपणे हा प्रवास सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत होता. गावी जाणे म्हणजे रेल्वे प्रवास आलाच. मामा असूनही 'मामाच्या गावाला जाऊया' लागु होत नाही, असो.

3-4 महिन्याआधी केलेले रिझर्वेशन. मी आणि माझी बहिण वगळता बाकी सारे स्लीपर कोच. तर आम्ही दोघी होतो 3 टायर ए.सी. कोच मध्ये. आमच्या जागांवर आलो तर लोक आधीच ठाण मांडून बसलेले. त्यांना त्यांचे बुड थोडे त्यांच्या असलेल्या ठिकाणी हलवा सांगून आम्ही आमच्या विंडो सीट वर स्थानापन्न झालो.

आमच्या शेजारी बसलेले लोक साधारण निवृत्त झालेले आणि 40-50 जणांचा स्त्री-पुरुषांचा ग्रुप सोबत प्रवास करणारा आणि आम्ही म्हणजे किती भारी आहोत असेच काहीसे दाखविणारा होता. आता हद्द तेव्हा झाली जेव्हा साधारणपणे प्रवास सुरू होऊन 10-15 मिनिटातच त्यांचे आपापसात चाललेले संभाषण कानावर आले.

' मला तर बाई गुडघे दुखतात. ह्या मुली करतील ना अ‍ॅडजेस्ट.'

' हो ना. ह्या दोघींना पाठवू वर आपल्या सीट वर.'

वॉव... परस्पर ह्या लोकांनी गृहीत धरून ठरवून देखील टाकले.

तिकडून टुणकन् बहिणीचा मेसेज,
' काहीही झाले तरी सीट द्यायची नाही. ह्या लोकांनी असे कसे गृहीत धरले आपल्याला? विचारायची पद्धत असते. तू काहीही बोलू नको, मीच बघते.'

मी नंदीबैल सारखी मान हलवली.

अधेमधे आई- वडील ये-जा करून होते. जेवणे होण्याच्या आधी ह्या शेजारी बसलेल्यांना झोपायची हुक्की आली.

बहिणीने सरळ शब्दात सांगितले की, 'आमच्या भावाने आमच्या सोयीनुसार लोअर सीट 3-4 महिने आधी बूक केलीय आणि मला तसेही कंबर दुखते म्हणून नाही देऊ शकत.'

ह्या गोष्टीचा प्रचंड ऊहापोहा ह्या पुणेरी (अति) सुसंस्कृत आणि सुशिक्षित म्हणणार्‍या निवृत्त लोकांमध्ये झाला.
'किती उद्धट ह्या मुली. वयस्कर म्हणून सुद्धा पाहत नाहीत.' इति बायका.

आम्ही दिसत असून जवान वैगेरे पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही शारीरिक त्रास नसतील. आम्हाला शारीरिक दुखणी असली तरी आम्ही ते जगाला सांगून बोभाटा करून सिम्पथी मिळवायच्या मागे पडत नाही. बर बायका तर बायका इथे पुरुष तर बायकांच्या वरचे होते. माझ्या एका कलीगच्या भाषेत सांगायचे झाले तर ' कमीनी पुरूष.' बस्स बांगड्या घातल्या असत्या तर बायकांपेक्षा जास्त शोभून दिसल्या असत्या.

बहिणीचा अजून एक मेसेज,
' त्यांचा अनादर मी केला नाहिये. एवढाच आरोग्याचा त्रास असेल तर घरी बसावे किंवा विमानाने जावे. नाहीतर सोयीनुसार सीट रिझर्व्ह करून ठेवावी. ही कसली सिम्पथी मिळवायचा प्रकार? '

मीही उत्तर दिले,
' आता तर अजिबातच द्यायची नाही आपली सीट. एकतर गृहीत पकडले. हा बाजूचा बाईल्या माणूस मुद्दाम त्रास द्यायला 3 लोकांची सीट असताना सुद्धा चौथ्याला ओढून आणून बसवतोय.'

दुपारच्या जेवणानंतर झोपायचे ह्यावरून बहिणीची आणि 3 बायका आणि त्यात एक बायकांच्याही अति असलेला एक पुरुष मध्ये चांगलीच शाब्दिक हद्दीत राहून वादविवाद झाली. बहिणीला शांत केले. आम्ही शांत बसलो. मेसेज मधूनच बोलत होतो. पण सो काॅल्ड सुशिक्षित लोक टोमण्यांवर येऊन त्यांच्यावर कशा प्रकारे संस्कार झालेत हे दाखवून देत होते. हो ह्या लोकांचे संस्कार काढलेत. कारण हेच जर युवा पिढीने केले असते तर लगेच इतिहास काढून परिवारातील लोकांवर यथेच्छ बोट ठेवून मोकळे झाले असते.

'दुपारी कोण झोपते का? '
'तरुण पिढी कशी काय दुपारी झोपते?'
'दुपारी झोपणे आरोग्याला चांगले नाही. '

आम्ही सीट दिली नाही म्हणून इतके टोमणे? आम्हीही ऐकून घेतले. कारण आता आमचाही निर्धार झाला होता की सीट द्यायचीच नाही. कारण त्यांचा बाणा हाच की झोपणार नाही झोपू देणार नाही.
आता माझा बहिणीला मेसेज होता..
' हे तेच लोक आहेत जे रोज दुपारी 1 ते 4 झोपा काढतात. तुझ्या शेजारी बसलेली बाई पेंगुळलेल्या स्थितीत आहे पण ठेका हा की मोडेल पण वाकणार नाही. '

बहिणीने तिचा निर्णय प्रचंड स्थिर ठेवला होता. नाही देणार सीट. काय करायचे ते करा.
माझ्या शेजारी असलेल्या 3 पैकी 2 दुसरीकडे जाऊन पांगले. मी कशीबशी अर्ध्या जागेत पहुडले.

बहिणीच्या शेजारी असलेल्या बायका दुसरीकडे जाऊन पांगल्या तसे बहिण पहुडली. मीही अर्ध्या जागेत कशीबशी पहुडले. साधारण तासाभराने बहीण दुसर्‍या डब्यात बाकीच्या कुटुंबीयांना भेटून येताना तिच्या नजरेस हे सगळे कुठल्या ना कुठल्या सीट वर अगदी व्यवस्थित पहुडलेले दिसले तेव्हा तिच्या डोक्यात एकच तिडीक जाणे सहाजिकच होते.

' तुला माहिती अख्ख्या कोच मधील लोक झोपलेत पण ह्या लोकांची नाटकी का तर आपण त्यांना सीट नाही दिली. का द्यायची? ह्या लोकांनी आपला मान राखला का? नाही ना.' इति बहीण.

साधारण 4 च्या सुमारास ठरवून सगळे आले आणि आम्हाला उठवून बोल लावू लागले तशी बहीण भडकली. भांडण करायचे असेल तर कराच. मीही शांत नाही बसणार. जे लोक भांडण करायला उत्सुक होते सरळ बहिणीने बोलून दाखवले की, ' दुसरीकडे जाऊन झोपा काढून आलात ना? कशाला उगीच नसती नाटकी? '

मी बहिणीला 'शांत हो' सांगून मेसेज केला.

' काय तर म्हणे देवदर्शनाला चाललेत. दुसर्‍यांना त्रास देऊन ह्या लोकांना कुठलेच पुण्य कधीच मिळणार नाही. मग अगदी कैलाश पर्वत असो किंवा गंगेचा घाट. ती बाई जी गुडघे दुखी कंबर दुखी बोलत होती ती बाजूच्या वरील सीटवर कशी पहुडलीय बघ.'

माझ्या शेजारी बसलेला पुरुष मोठ्या आवाजात बातम्या ऐकून लागला. मीही मोठ्या आवाजात गेम मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात केली. ' जशास तसे'
जेवढा वेळ ऐकेल तेवढा वेळ आवाज चालूच ठेवला.

ट्रेन मधेच कुठेतरी एकेठिकाणी थांबली तसे सुरू झाला पत्त्यांचा डाव?!... सोबत बाकीच्या मंडळी सोबत श्लोक आणि अभंग. म्हणजे सिरियसली? मला जनरल डब्यात बसल्याचा फील आला.
बाकी मला म्हणावेसे वाटले की, ' सुट्टे नाहीत. आगे जाओ.' पण मी माझे शब्द जीभ आवरले. बहिणीला मेसेज केला की,'सांग त्यांना सुट्टे नाहीत, आगे जाओ.' आणि तिच्या रागाने फुललेल्या चेहर्‍यावर आलेले हसू.

असो आमचे स्टेशन आले आम्ही उतरलो. आमच्या इथले सीट्स सोडून बाकी पूर्ण कोच झोपेच्या आधीन झालेला होता. निघताना परत ऐकू आले...' कोणी आले तर त्यांना सांगू हेल्थ प्रॉब्लेम आहे.'

हा प्रवास सुखदायक अजिबात नव्हता. अभंग श्लोक हळू आवाजात नक्कीच छान होते. कारण रेल्वे कोच सार्वजनिक आहे.

फक्त सीट दिली नाही म्हणून, तरुणाईला सुद्धा लाजवेल अश्या प्रकारची हुल्लडबाजी सुरू केली होती. हो... ही हुल्लडबाजीच एक प्रकारची. ती पाहून आम्हालाच लाज वाटत होती. वृद्ध आहेत म्हणून कोणी काही बोलणार नाही, हेल्थ प्रॉब्लेम मुळे सिम्पथी मिळेलच, किंबहुना ती ओरबाडून घ्यायचीच आणि वयाने मोठे आहोत म्हणून आपल्यापेक्षा लहान असलेल्यांनचा अनादर करून गृहीत पकडणे.

आजूबाजूच्या लोकांचे भान ठेवून, आपल्यापासून कमीत कमी त्रास व्हावा किंवा होऊ नये ह्याची काळजी घेऊन वागले तर नक्कीच कौतुकास्पद आहे. शेवटी काय...

''वय म्हणजे अनुभवाचा सन्मान करायला हवा, पण काही लोक त्याचा फायदा घेतात."


असो. तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? नक्की कमेन्ट करा.