Login

वचनपूर्ती

Vchn
वचनपूर्ती

ती सगळ्यांच्या नंतर जेवत असत..तशी पहिल्याच दिवशी जेव्हा सासरी पाच परतनिवरून आली तेव्हा घरातील पाहुणे निघून गेले होते , घरात आता फक्त सासू सासरे दिर आणि नवरा इतकेच होते...

तिला आता खऱ्या अर्थाने सासरी आल्या सारखे वाटत होते... सगळे सहज बोलत होते...रोजच्या सारखे त्यांचे जीवन चालू झाले...लगीन घाई ओसरली होती..

गप्पा चालू होत्या त्या चौघांच्या, सासूबाई म्हणत होती तुम्ही खालच्या मळ्यात जा तिकडे आज राखण करायची आहे संत्र्यांची.. फळ काढणीला आली आहेत ,लोकांना माहीत झाले आहे...की लगीन घरी आता घाई असेल ,मग संत्रे चोरायला जायची ही योग्य वेळ आहे...तसे ही चोर येऊन बराच माल घेऊन गेले असणार..

"आई मग काय आता ,हे नुकसान भारी अंगावर पडणार ग..."

"विजय तू आणि दादू जा त्या मळ्यात मी आणि तुझा बाप जातो त्या भुईमुगाच्या वावरत जरा तण जास्त झालं आहे तर ते काढून ,उपटून टाकू..." सासूबाई सगळे नियोजन करत होत्या ,सगळे त्यांच्या हो ला हो करत होते..कोणी आड काठी केली नाही...म्हणजे किती एकोप्याने राहतात हे लोक , किती एकी आहे..आईला किती मान आहे...खुद्द नवरा ही ऐकतो बायकोच..

"बोलायचं होत ग आई थोडं ,बोलू का..? ही कुठे कोणत्या रानात येणार...नाही म्हणजे ..".( नवीन आहे ती तर तिला लगेच कसे शेतात घेऊन जायचे ) असे विचारायचे होते पण त्याने हिम्मत केली नाही...आणि गप्प बसला...

सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी शेतात काम करायचे आहे ,घरातील कोणी असो मग सून असली म्हणजे तिने यायचं नाही का आपल्याच वावरत...मी नव्हते का मोठ्या घरची.. मला कुठे येत होतं शेतातलं काम ,पाहून घेत गेले आणि अंगावर पडले ते करत जावं लागलं.. "

"राहू दे तिला आमच्या सोबत घेऊन जातो...तिला सगळं नवीन हाय ना तसं पाहिलं तर...मग लावतो हळूहळू तिला सवय शेत काम करायची..." तो दबकत म्हणाला मान खाली घालुन तिला ही त्याच्या मागे यायला सांगितले..

गीता तशी नाजूक ,गोरीपान ,सडपातळ, आणि शिकलेली होती...तिने कधीच काम केले नव्हते.. शेतात जाऊन भाजी घेऊन येणे वेगळे होते आणि खुद्द शेतात काम करणं ह्यात फरक होता...आज जेव्हा सासू म्हणाली मी पण मोठ्या घरातून आले होते...पण अंगावर पडलेलं सगळं काम मी केलं...मग तिला काय हरकत आहे..

हे ऐकल्यावर आता शेतीत काम करण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता...

खरे तर लग्न ठरत नव्हते निखिल चे पण जेव्हा ह्यांनी कबूल करून घेतले की आमच्या मुलीने शेतात काम केलेले नाही आणि ती शेतात काम करणार नाही तर मग लग्न मान्य आहे...मंजूर असेल तर हो म्हणून सुपारी फोडा आजच..

तेव्हा गडी माणूस कोणी पुढे आले नाही पण सासू पुढे येऊन म्हणाली होती, "मान्य आहे ,मान्य आहे...तुम्ही फक्त लेक द्या...तिची काळजी आम्ही घेऊ...तिला शेतीत काम करायला लावणारी मी सासू नाही..."

"मग काय फोडा सुपारी ,आता ताई जाणार सासरी.." मामा म्हणाला...आणि सगळे ह्याच भरवश्यावर होते की आपली मुलगी शेतीत राबणार नाही...मोठ्या अक्काने सांगितले म्हणजे त्या शब्दाच्या पक्क्या आहेत म्हणत सुपारी फुटली...लग्न ठरलं...

तसा गीताला सुपारी फोडल्याचा दिवस आठवला आणि सासूबाईने तिच्या मामांना दिलेले वचन ही आठवले...अजून मेहंदी निघाली नाही ,चुडा काढला नाही..काकन काढले नाही..तोच शेतीत काम करायचे...? ह्यांना कसे सांगायचे की तुम्ही तुमचे वचन विसरलात ,पण ते चांगले नाही वाटणार... त्यापेक्षा नवऱ्या सोबत जाईल आणि करेन काम जमेल ते..

तिची मानसिकता मन मारून तयार झाली...नवऱ्याला ही वाईट वाटत होते तिला बघून त्याला आईने वचन दिलेले आठवले..पण आता लग्न करून बसलो आहोत..मग कसे आईला सांगितले पाहिजे..

ती म्हणाली, "तुम्ही काही बोलू नका ,त्यांना राग येईल.."

"तुझ्या बाबांना फोन लावून सांगायची इच्छा होते की मुलीला घेऊन जा ,आमच्याकडुन वचन पाळले जाणार नाही...पण हे अगदी मूर्खासारखे वागणे वाटेल..."

"नाही नको,मला माझे वडील चांगलेच माहीत आहेत..ते उलट म्हणतील काय मालकीण बाई..!! तुमचं शेत आहे...त्यात तुम्ही काम नाही करणार तर कोण करेन...त्यामुळे इथे विषय वाढवू नका...मला जिथे थकवा वाटेल तिथे मी थांबून जाईल..." तिने एकदम समजदारीने वेळ मारून नेली

तिचे हे बोलणे सासूबाई बाहेर उभे राहून ऐकत होत्या ,त्यांना ही तिचे उत्तर आवडले ,त्यांनी फक्त तिची परीक्षा घेतली होती आणि त्यात ती एक संस्कारी घरातील मुलगी असल्याचे तिने सिद्ध केले होते... ती पास झाली ह्याचा आंनद तर होताच पण माझी निवड चुकली नाही चुकणार नाही याबाबत खात्री होती ती सार्थकी ठरली होती...

त्या तश्या आत आल्या आणि म्हणाल्या, "अरे मुलांनो तुम्ही मला म्हतारीला आठवत नाही काही ठीक आहे पण तुम्हाला ही आठवले नाही का काही..."

दोघे एकमेकांकडे बघतच होते ,त्या काय विसरून गेल्या की काय घरी म्हणून परत आल्या असाव्यात असे त्यांना वाटले...

"काय विसरलात आई तुम्ही ,काही घ्यायचे होते का तुम्हाला... गोळ्या राहिल्या का आबांच्या घरी...फोन विसरलात का ?? काय का आलात तुम्ही परत अश्याच, यांना सांगायचं होत काही राहिलं असेल तर यांनी आणून दिले असते लगेच गाडीवर येऊन..."

सासूबाईने लगेच तिचा दुसरा चांगुलपणा अनुभवला होता ,गुणाची ग पोरगी किती ,तिला किती कुठे काय बोलावे हे कळते तर...

"ग मी माझे वचन विसरले होते ग ते जे सुपारी फोडण्याचा कार्यक्रमात तुझ्या मामाला दिले होते...की तुमची मुलगी शेतात काम करणार नाही हे वचन...आणि आज ते माझ्या कडून चुकून मोडणार होते बघ...तुम्ही तरी आठवण करून द्यायची होती...किती मोठे पाप झाले असते माझ्या कडून..." सासूबाई म्हणाल्या

तशी गीता ही म्हणाली ,"आई मला ही नव्हते आठवले कसले वचन खरे तर मीच विसरले होते...पण ते वचन तुम्ही त्यांच्या मुली करिता दिले होते ना...आता मी तुमची मुलगी ,ह्या घरची सून आणि ह्यांची बायको आहे... तुम्ही सगळे मिळून जी मेहनत कराल ती मी केली तर हरकत नाही ना.." ती

"हरकत नाही पण माझी हरकत असेल आहे ,शिकलेली आहेस तू ,कधी काम केले नाही शेतात पण एक कर गावातील शाळेत शिक्षिकेची खूपच गरज आहे...तुझा तो प्रांत आहे...तू तिथेच काम कर...ती ही एकप्रकारे शेतीच आहे की...मुलं मोठे करणं...त्यातून पीक घेणे...विद्या दान करणे ते छान जमेल तुला...बाकी कधीं कधीं शेती बघायला ये...नवऱ्याला भाकर घेऊन ये...हेच खूप आहे...काय दादू बरोबर ना ,आता तर खुश आहेस ना" सासूबाई म्हणाल्या

"आई अगदी माझ्या मनातले ओळ्खलेत तुम्ही.."

दोघी ही खुश होत्या ,कोणी कोणाचे मन मोडले नाही..ही कला संस्कारातून येते...

©®अनुराधा आंधळे पालवे