Login

वेड शॉपिंगचं भाग २

Online Shopping Mhanje Ved Ch
"दोन दिवस झाले, सीमाची धुसपुस सुरू होती. अभयने तिच्यासोबत शॉपिंग ला यावं त्यासाठी हट्ट धरून बसली त्यावरून आदळआपट सुरू होती, चेहऱ्यावर तर बारा वाजलेले होते."

"हे बघ, त्या तूझ्या खरेदीमध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. कार्ड दिलंय, जा आणि घे. सना सूदीच्या दिवसात उगाच तोंड पाडून बसू नकोस. अभयने सीमाला दटावलं.

" तुम्ही नाहीच येणार का?" सीमाने विचारल्यावर अभयने स्पष्ट च नाही म्हणून सांगितलं."

"खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात हत्तीचे तसं झालंय बहुतेक तुमचं. कार्ड दिलं पण मनातून इच्छा नाहीच. ऐकू जाईल एवढ्या उंच स्वरात सीमा बडबडली"

"काय समजायचं ते समज पण मी येणार नाही.  मुलांचे कपडे घेताना रेगुलर वापरता येतील अशा टी शर्ट वगैरे घे. मागच्या दिवाळीचे शर्ट चुकून एकदाही घातले गेले नाही. कुर्ते  जॅकेट भरमसाठ आहेत घरी पडलेले.  अभयने निक्षून सांगितलं.

"मुलं शाळेतून आले की, आज सीमा त्यांना घेऊन खरेदीला जाणार होती. मुलं शाळेत आणि अभय ऑफिसला गेलेला होता.

सीमाने काम उरकले आणि आता ती वेगवेगळ्या शॉपिंग साईटवर कुठल्या चांगल्या ऑफर मिळतायत का हे बघण्यात व्यस्त होती. तेवढ्यात दरवाजावर बेल वाजली. 


"आई, तू अशी अचानक." दारात निर्मलाताईंना बघून सीमाला आश्चर्यचा धक्काच बसला होता.  


"हो अगं, इकडे आलेच होते." म्हटल तुला भेटून जावं. निर्मलाताईंनी सांगितलं. 


सीमाने आईसाठी पाणी आणलं. आणि लगोलग चहाचं आंधन ठेवलं.


"झाली का दिवाळीची साफसफाई. निर्मलाताईंनी सीमाला सहज विचारलं.


"कुठे ग ठिकाणा नाहीये अजून. सगळंच राहिलयं. यावर्षी तर खरेदी सुद्धा झालेली नाहीये. बघते आज दुपारी घेऊन जाते मुलांना." सीमाने सांगितलं. 


"तुझी झाली का दिवाळीची तयारी."  सीमाने विचारलं.


"आमची दिवाळी म्हणजे, घर झाडझुड करून साफ करायचं, धुण धुवायच, साफसफाई, घरातली पसाऱ्याची आवराआवर आणि फराळपाणी बास्स!" बाकी दिवाळीत तुमच्यासारखी ढीगभर खरेदी आम्ही केली नाही कधीच."

"आई तुला बाबांनी दिवाळीला कधीच नवीन साडी घेतली नाही. तुला वाईट नाही वाटलं का ग कधीच." कुठली हौस नाही की मौज नाही. नेहमी जुनी साडी नेसूनच पूजा करत गेलीस तू मुकाट्याने. कशाच मुळी कौतुक च नव्हतं बाबांना. इच्छा आकांक्षा मारून जगात आलीस एवढी वर्ष." सीमा पुटपुटली.


"नवीन साडी घ्यावी कधी वाटलंच नाही. प्रत्येक दिवाळीला मी माझ्या लग्नातला शालू  मोठ्या हौसेने नेसायची. त्या निमीत्ताने शालूची घडी मोडल्या जात होती. तो आनंद मोठा होता माझ्यासाठी. वीस पंचवीस वर्ष तरी शालू नेसूनच दिवाळी साजरी केली. तुमची लग्न झाली आणि लग्नात आहेरात ढीगभर साड्या आल्या. कालांतराने नियमात बदल होत गेला. पण साडी मिळाली नाही म्हणून मन दुखावलं असं काही नव्हतं बर."

"पुर्वी कुठे होत एवढं खरेदीच फॅड?"
" दोन चार साड्या बाहेर नेसायच्या आणि नेमक्या दोन साड्या घरी नेसायला असायच्या. खऱ्या अर्थाने, समाधानी होतो आम्ही." बोलताना निर्मलाताईच्या चेहऱ्यावर समाधानच तेज झळकलं.

"छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधून घेण्यात आनंद असतो. तो आम्ही मनापासून मिळवला. याउलट, सगळं असून ही अतृप्त असलेली तुमची आजची पिढी. समाधानी नाहीच. निर्मलाताईंनी खेद व्यक्त केला.

" तुमच्या सारखे तुम्हीच. त्याच त्याच साड्या नेसून कंटाळा नाही तुमच्या पिढीला. पण आई अगं, आता जग बदललंय, बदलत्या जगाबरोबर बदलावं लागतं. सोबतीने चालावं लागतं. पूर्वीसारखे आता तेच ते कपडे किंवा साड्या नेसल्या तर बापरे.. किती नावं  ठेवतील लोक?" विचार ही करवत नाही बघ.

"आजकाल बारीक लक्ष असतं लोकांचं." सीमा सांगत होती.


"पगार कमी, खटल्याच घर. पै पाहुणा, आल्या गेलेल्यांच्या राबता असायचा, त्यांचा पाहुणचार. सासू सासऱ्यांची आजारपण, तुमचं पालनपोषण, शिक्षण, हाताशी पैसा नेहमी लागायचा. जबाबदाऱ्या पाठीशी घट्ट चिटकून होत्या. कर्तव्य निभावताना, स्वतःसाठी म्हणून कधी काही घ्यावं वाटलंच नाही कधी. सणसमारंभ साधेपणाने तरी तेवढ्याच उत्साहाने साजरे करत होतो आम्ही. ना हेवेदावे, ना चढाओढ ना देखादेखी करण्यात आम्हाला कधी रस वाटला." निर्मलाताई बोलत होत्या.

"उलट, कधीकाळी एखादी नवीन साडी विकत घेतलीच तर स्वतः नेसण्याऐवजी, घडी मोडायला कुणाला तरी नेसायला द्यायचो. तुला आठवतं, तुझी आत्या माहेरी आली की माझ्याच साड्या आवर्जून नेसायची. त्यात ही आनंद मिळायचा तिला ही आणि मला ही. निर्मलाताई कौतुकाने सांगत बोलल्या.


"खरं सांगू का आई, तेव्हा खर्च करायला पुरेसा पैसा ही नसायचा ग तुमच्याजवळ. कदाचित असता तर तुम्ही ही उडवला असताच की."

"आता पैसा आहे आणि आवड ही आहे आम्हाला. हाताहाताशी लोळण घालत सुख सुविधा ही आहेत. बघ घरबसल्या ऑनलाईन वस्तू मागवता येतात." टेबलवरच्या सुंदर फ्लॉवर पॉटकडे बोट दाखवत सीमा उत्तरली. 

"आजकाल, लोक आपल्याला जज करतात अगं." तेव्हा.... काळाची गरज म्हणून.. काही गोष्टी कराव्या लागतात. सीमा आईला पटवून देण्याचा प्रयत्न करत बोलली.


"जज करतात म्हणजे? अगं लोकांचं काय घेणं देणं. चार तोंड चार दिशेने बघतील, बोलतील नाहीतर वाकडं करतील. त्यांच बोलणं आपण मनावर नसतं घ्यायचं. तुझ्याच तोंडून ऐकलंय कधीतरी, आवडलं होत म्हणून लक्षात राहिलं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग" की काय ते!' बोलताना निर्मलाताई समाधानकारक हसल्या.


"तुमची पिढी, गरज नसताना उगाच शौक म्हणून बऱ्याच गोष्टी करते. त्यात ही खरेदी सुद्धा. मुबलक पैसा हाताशी असतो, कमवता तसे खर्च करता."


"पण... एक आई म्हणून, जीव तुटतो माझा. मेहनतीचा पैसा असा पाण्यासारखा उडवता तेव्हा वाईट वाटतं."

"गरज आहे तिथे करा खर्च, नाही म्हणणं च नाहीये माझं. आवश्यक आहे तर, आणि कंफर्टेबल असतात म्हणून, ब्रँडच्या कपड्यावर सुद्धा करा खर्च पण विनाकारण होणाऱ्या खर्चावर आपलं नियंत्रण असायलाच हवं. गरज ओळखून शॉपिंग व्हायला हवी. उगाच आहे ऑफर कर खरेदी हे टाळता यायला हवं."

चार वस्तू घ्यायला मोठ्या मार्ट मध्ये जाता आणि ऑफर मिळतेय म्हणुन उगाच मोठमोठ्या वस्तू घेऊन येता. पार्सल तर काय आणि किती? रोज काय ग एवढ्या वस्तूंची गरज असते तुम्हाला."

" वस्तू खरेदी करून घरी आणल्यावर, खरंच गरज होती का? फक्त एकदा निक्षून मनाला विचारा. आणि जे उत्तर मिळेल.. त्याच्याशी प्रामाणिक राहा. बघा दुसऱ्या खेपेला नक्कीच सुधारणा होईल. एवढं सोप्प गणित आहे बघ, विनाकारण होणारी खरेदी टाळण्याच."

"उमगेल का सीमा ला आईच म्हणणं पटेल का सीमा ला"