भाग ३
"आमच्या म्हाताऱ्या माणसांचे विचार तुम्हाला जुने वाटतात, पटणार नाही तुम्हाला. तुमच्यापेक्षा उन्हाळे पावसाळे आम्ही जास्ती बघितले म्हणजे अनुभव तुमच्यापेक्षा थोडा जास्तीच आहे नाही का!"
"बघ बेटा, सगळी सोंग घेता येतात पण पैशाच सोंग काही घेता येत नाही. तुमच्या मागे तरी काय कमी व्याप आहेत का? नोकरी तर नोकरी घरी राहणाऱ्या गृहिणी म्हणून घर सांभाळणाऱ्यांना तरी किती काय काय दिव्ये पाळावी लागतात."
"आम्ही काटकसर करून संसार केला. हिशोब लिहून ठेवण्यात आमचं आयुष्य गेलं. हिशोबाच तुम्हाला आम्ही काय सांगणार? financial बजेट चा तगडा अभ्यास आहे तुमचा. इकॉनोमीक्स शिकला आहात. आमच्या पेक्षा चार वर्ग जास्ती शिकलात तेही खरं."
" तेरी भी चूप मेरी भी चूप." म्हणायचं आणि बघत गप्प बसायचं." निर्मलाताई बोलता बोलता थांबल्या.
"आई अगं, मी ऐकते म्हणून मलाच शिकवतात सगळे." दोन दिवस यावरून ह्यांनी डोकं खाललं आणि आता तू. तूझ्या सुनेकडे बघितलंस का? किती खरेदी करते ती."
"सतत काही ना काही घेत असते. कपडे, बूट, चप्पल, इमिटेशन ज्वेलरी तिच्या ड्रेसिंग टेबल वरच्या नेल पैंट आणि लिपस्टिक च्या शेडस् वर नजर टाक कधी?" सीमा चिडून बोलली.
"तिचं तर मला तू सांगूच नको. तिला मी काय बोलणार?" तिला काही सांगायचं म्हणजे, गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ होता कसा!" असं आहे बघ. जो ऐकेल त्याला च सांगणार ना! निर्मला ताईंनी ठसक्यात सांगितलं.
"आमच्या घरी, जेवढं कमावतात तेवढं गमावतात. पगार आला की दहा वाटा, त्यातली एक वाट, थेट मोठमोठ्या शोरुमच्या दिशेने धावते. मग काय मोठमोठ्या शोरुमच्या घशात जातो ह्यांचा मेहनतीचा पैसा." महिना सरतो तसा खात्यात नील बट्ट्या सन्नाटा."
" वेळकाळ सांगून येते नाही? तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असतो. काही झालं तर मेडिकल इन्शुरन्स असतो. खिशात पैसे घेऊन फिरायचा, जमानाच नाही राहिला. एटीएम कार्ड गेले आणि आता खिशात क्रेडिट कार्डसची गर्दी झाली. केलं स्वाईप की झाली खरेदी."
"जीवाचा आटापिटा करून आठ आठ दहा दहा तास र्या लॅपटॉप मध्ये मुंडक घालून बसायचं. एकसारखं बसून कंबरडं मोडेस्तोर काम करायचं. कामाच्या व्यापात खाण्यापिण्याचं ही भान नसतं तुम्हाला. मग असा मेहनतीचा पैसा, असा कसा उडवून होतो तुमच्या कडून मला न सुटलेलं कोड आहे बघ."
"पॅकेज गर्वाने सांगता, इन्कम टॅक्स कटतो म्हणून सरकारच्या नावे बोंबा ठोकता. एवढ्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या तरी तुमचा खिसा रिकामाच."
"अंथरूण पाहून पाय पसरावे." म्हणतात पण आता, या क्रेडिट कार्ड वरची खरेदी म्हणजे, उधार आणून सण साजरा करण्यासारखं वाटत मला."
"आपल्या मिळकतीतून एक ठराविक रक्कम खर्च करण्यापूर्वी बाजूला ठेवून इन्वेस्ट केल्या गेली पाहिजे. नाहीतर, पैसा आला आणि गेला.. खिसा माझा रिकामा." असं व्हायला वेळ लागत नाही.
"आम्ही गावातून शहरात आलो. चार भांडी आणि अंगावर दोन कपडे होते फक्त. पगार कमी होता. काटकसरीने संसार करून शून्यातून विश्व निर्माण केलं."
" तुटपुंजा मिळकतीत, आपल्या लेकराबाळांच्या डोक्यावर हक्काच छत दिलं. आता आमची नातवंड, त्याच छायेत मोठी होतायत. हे समाधान, बोलून सांगता येत नाही."
"पण तुमची पिढी काय करतेय?"
"आमदनी आठ्ठन्नी खर्चा रुपय्या...!"
"तुमच्या म्हातारपणाची सोय, तुमच्या मुलांसाठी, मागे नातवंडांसाठी. हक्काचं म्हणून काही उरेल. करताय का काही तरतुद?" करत असाल तर चांगलंच पण करत नसाल तर, ह्या ऑनलाईन शॉपिंग पायी बरबाद होण्याआधी, वेळीच सावध व्हा."
निर्मलाताई बोलता बोलता गप्प झाल्या.
निर्मलाताई बोलता बोलता गप्प झाल्या.
"पैसा जमवून करायचंय काय? वर घेऊन जायचीय का ती प्रॉपर्टी.. आज एक दिवस एकाच्या हातचा नाही. आयुष्याचा भरवसा नाही. मग आयुष्य मनासारखं जगायचं नाही तर.. मग त्या जमवलेल्या पैशाचा काय फायदा?" सीमा पुटपुटली.
"अगं पण आज मध्ये जगताना उद्याचा विचार करणं म्हणजेच प्रपंच.. आणि एक सांग, "खरेदी, उधळपट्टी म्हणजेच मनासारखं जगणं असतं का? त्यापेक्षा, आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासा, स्वतःला गुंतवून ठेवा. मित्र मंडळी, नातेवाईकांना वेळ द्या. त्यांना भेटा, कुटुंबाला वेळ द्या. बिनधास्त होऊन जगा, मनाला पटेल ते अगदी बिनधास्त करा. पण आवड म्हणून आवश्यक असलेली खरेदी ठीक पण उगाच त्या ऑफर असलेल्या शॉपिंग ला बळी पडू नका."
"दोन पिढीच अंतर आहे आपल्या विचारांमध्ये. विचार पटतीलच असं नाही.... पण विचार कर. माझ्या बोलण्याचा उद्देश तुला कळला की मग..... त्यावर चालायचा प्रयत्न कर." निर्मलाताई एवढं बोलून शांत झाल्या.
चल मी, निघते म्हणत.. निर्मलाताई घरी निघून गेल्या.
"आई, अहो काय जादू केलीत तुम्ही. अगदी आवश्यक खरेदी करून पैसे वाचवले तुमच्या मुलीने यावेळी. घरच्या लक्ष्मीने नवीन साडी घालूनच पूजा करायची, आजवरचा शिरस्ता मात्र अचूक पाळला तिने." अभय हसत हसत सांगत होता.
"आई खरंच गरज होती तिला या समुपदेशनाची. काय ना, की एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं तसं व्यसन हल्ली आमच्या पिढीला शॉपिंगच व्यसन लागलंय. सीमाच्या हातून ही बराच खर्च होऊ लागला होता., ह्या सगळ्याला सीमा बळी पडू नये म्हणून तुमची मदत घ्यावी लागली मला. अखेर प्रयत्न आज सफल झाला." अभय कृतकृत्य होऊन बोलत होता.
'आपल्या घरी कधी प्रकाश पडणार?" विचार निर्मला ताईंच्या डोक्यात डोकावला. 'पाच हजाराची SIP.. माझ्या लाडक्या बायकोसाठी....' अभयने मनात विचार पक्का केला. आता फक्त अंमलात आणून सीमाला दिवाळीचं छान अनोखं गिफ्ट अभय सीमाला देणार होता.
धन्यवाद.
शुभांगी मस्के...
धन्यवाद.
शुभांगी मस्के...