व्हेज सँडविच
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे सँडविच. एका सँडविचने सुद्धा लवकर पोट भरते. आज त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे.
साहित्य : सँडविच ब्रेड किंवा मग ब्राऊन ब्रेड, बटाटे, एक काकडी, एक लाल टोमॅटो, एक बीट, एक कांदा, स्वीट कॉर्न, चाट मसाला, चीझ, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, कोथिंबीर, बटर, चवीनुसार मीठ आणि तेल.
कृती : १) बटाटे उकळून त्याची सालं काढून घेणे.
२) आता एका कढईमध्ये तेल घालून जीरे मोहरी हिंग कढीपत्ता हळद हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ घालून त्या फोडणीत उकडलेले बटाटे घालून त्याची भाजी बनवून घ्यायची.
३) आता कांदा, काकडी, टोमॅटो बारीक चिरून घेणे आणि बीट किसून घ्यायचं. तुम्ही हे सगळं एकत्र केले तरी चालेल.
४) आता ब्रेडला बटाट्याची भाजी लावून घेणे आणि मग त्यावर कांदा काकडी टोमॅटो आणि किसलेले बीट घालायचे.
५) आता त्यावर थोडासा चाट मसाला टाकायचा, टोमॅटो सॉस घालायचा आणि वरतून चीझ किसून घालायचे. आवडत असेल तर मेयोनिज घातले तरी सुद्धा चालेल.
६) दुसऱ्या ब्रेडला बटर लावायचे आणि त्यावर ठेवायचा, वरतून पुन्हा बटर लावून घ्यायचं. आवडत असेल तर आतमध्ये हिरवी चटणी सुद्धा लावायची.
७) तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्याला पण खाली बटर लावून घ्यायचं आणि त्यावर आपण तयार केलेले सँडविच ठेवायचे.
८)जर सँडविच मेकर नसेल तर तव्यावर बटर लावून तयार केलेले सँडविच त्यावर ठेवायचे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचे.
९) तयार सँडविच प्लेट मध्ये काढून बाजूला हिरवी चटणी आणि सॉसने डेकोरेट करायचे.
१०) आवडत असल्यास त्यावर चीझ किसून घालायचे किंवा मग वरतून बटर लावायचे.
किचन तुमचे आणि रेसिपी माझी. रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा