Login

वेगळं राहायचं भारीच सुख!!(भाग १)

वेगळं राहिल्याशिवाय एकत्र कुटुंबाचे महत्त्व कळत नाही.


"अहो मी आताच सांगतिये तुम्हाला, उद्या सकाळी मी सगळ्यांचा स्वयंपाक करणार नाही. मी फक्त तुमचा आणि मुलांचा डबा बनवून देईल. बाकीच्यांनी ज्याचं त्याचं पाहावं."

"अगं सीमा पण आपण एकत्र कुटुंबात राहतो ग. असं करून कसं चालेल? घरात सगळेच जण काम करत असतात. वहिनी आणि आरती दोघीही सकाळीच शेतात जातात. आईपण तिच्या परीने जमेल तशी मदत करतेच की. अलका वहिनी तुला सकाळी मदत करते की स्वयंपाकात आणि रात्री आरती करते मदत. मग आता काय प्रॉब्लेम आहे?"

सुरेश आपल्या बायकोची समजूत घालत होता.

"अहो पण मी मात्र दोन्ही वेळेस कॉमन आहे ना. मी किचनमध्ये गेल्याशिवाय ह्या दोघीही सुरुवात करत नाहीत. रोज उठून काय भाजी करायची ते मी एकटीने ठरवायचं. मुलांच्या, तुमच्या डब्याचे पाहायचे पुन्हा सगळ्यांचा स्वयंपाक वेगळा. ह्यांनी आयते यायचे आणि सकाळी अलका ताईंनी येवून चपात्या तेवढ्या लाटायच्या आणि रात्री आरतीने येवून भाकरी थापायच्या. मग तेवढं तरी कशाला करायचं ना? म्हणजे म्हणायला होतं सगळ्यांना ह्या शेतात काम करुन घरात पण मदत करतात. वैताग आलाय नुसता. तुम्हा पुरुषांना नाही कळणार बाई माणसाचे दुखणे. त्यामुळे तुम्ही तर आता बोलूच नका."

"हे बघ तुझं हे असं असतं. बोललो तर म्हणते बोलू नको आणि नाही बोललं तरी म्हणते मुद्दाम असं करता. आता तूच सांग मी करु तर नेमकं काय करु?"

"काही नका करु. तसंही तुमच्यापुढे बोलून तरी काही उपयोग आहे का?"

"अगं पण सीमा त्या दोघी शेतातही जातात आणि घरातही मदत करतातच की तुला. त्या कुठे काय तक्रार करतात?"

"त्या करतीलच कशा तक्रार? त्यांना बाकी कुठे डोकं लावायचं असतं म्हणा. घरात मी माझं डोकं खर्ची करते आणि बाहेरच्या व्यवहारात तुम्ही?"

"अगं पण रोज उठून चिडचिड करून काही उपयोग होणार आहे का? तुलाच त्रास होईल पुन्हा."

"मला खरंच कंटाळा आलाय आता या एकत्र कुटुंब पद्धतीचा. नाही सहन होत आता. तुम्हाला मी आता शेवटचं सांगतीये, तुम्ही राहा सगळ्यांचं पुढं पुढं करत. माझे पेशन्स संपलेत आता. मी नाही राहू शकत आता एकत्र सगळ्यांबरोबर."

"आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, हे तूही ध्यानात ठेव."

रागातच आपला निर्णय सीमाला सूनावून सुरेश खोलीच्या बाहेर पडला. थोडं मोकळ्या हवेत गेल्यावर बरं वाटेल म्हणून तो बाहेर अंगणात जावून बसला.

आईच्या कानावर मात्र दोघा नवरा बायकोचे सुरू असलेले सर्व संभाषण पडले. लेकाच्या काळजीपोटी तीही त्याच्या पाठोपाठ बाहेर आली.

"अरे सुरेश, सकाळी उठायचे नाही का तुला? कशाला उगीच जागरण करत बसतोस. जा जावून झोप."

"अगं आत खूपच गरम होत होतं म्हणून थोडावेळ बाहेर बसावं वाटलं. हे काय जाणारच आहे आता झोपायला."

"सुरेश एक सांगू, रागावणार तर नाही ना.?"

"अगं बोल ना आई, एवढा कसला विचार करतेस.?"

"तू ऐक सीमाचं. कारखान्याच्या जवळच एखादी रूम पाहा भाड्याने आणि तिथेच राहा. मुलांनाही टाक तिथेच इंग्लिश मिडीयमच्या शाळेत."

" अगं आई तू हे काय बोलतीयेस?"

"बरोबरच बोलतिये. काळजी वाटते रे तुझी बाकी काही नाही. रोज उठून बायकोची तुला बोलणी खावी लागतात. त्यापेक्षा थोडंफार तिच्याही मनाखाली घे."

"आई अगं बाहेर राहणं वाटतं तितकं सोपं नाही ग. खर्च परवडणार नाही एवढा आणि माझ्या एवढ्याशा पगारात नाही भागणार काहीच. दोन्ही मुलांची फी, कसं शक्य आहे आई."

"थोडे दिवस जावून तर बघ. तिच्याही मनाचे समाधान होईल. आणि नाही शक्य इंग्लिश मिडीयममध्ये तर मराठी शाळेत घाल मुलांना. पण रोज रोज होणारे तुमच्यातील वाद तर थांबतील ना. शेवटी आम्ही आहोतच की. या घराचे दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडेच असतील. काळजी करू नकोस."

आता या क्षणी अशा आधाराची खरंच गरज होती सुरेशला.

क्रमशः

आता काय असेल सुरेशचा निर्णय? जाणून घ्या पुढील भागात.