Login

वेगळं राहायचं भारीच सुख!!(भाग २)

वेगळं राहिल्याशिवाय एकत्र कुटुंबाचे महत्त्व कळत नाही.


सुरेश जवळच्याच साखर कारखान्यात कामाला होता. घरापासून कारखाना दहा बारा किमी अंतरावर होता.

तीन भावांचे एकत्र कुटुंब होते. पोटापुरती शेती होती. सुरेशचा थोरला आणि धाकटा दोन्ही भाऊ शेती पाहत होते. त्यांच्या बायकाही त्यांच्या सोबत शेतात राबायच्या. आई वडील घरात मुलांना सांभाळून जमेल तशी मदत सीमालाही करायचे.

मोठ्या भावाचा मुलगा तो यंदा दहावीत होता. त्यांची मुलगी आठवीत होती.सुरेशची दोन्ही मुलं अनुक्रमे पाचवीत आणि आणि तिसरीत शिकत होती.
धाकट्या भावाचा मुलगाही लहानच होता. त्याला सांभाळण्यातच त्याच्या आजीचा वेळ सरत असे.

बाकी घराची सर्व जबाबदारी सीमाकडे होती. इतर दोघींच्या तुलनेत सीमा थोडी जास्त शिकलेली होती. त्यामुळे घरातील व्यवहार, किराणा, स्वयंपाक या साऱ्याची जबाबदारी तिच्यावर होती. पण त्यामुळे तिला शेतात जायची गरज पडायची नाही.

आणि तसेही नियमानुसार सुरेश शेतात जात नव्हता त्यामुळे सीमालाही जाण्याची कधी गरजच पडली नाही. घरातील कामातच दिवस कसा सरायचा तेच तिला कळायचे नाही. सगळे काम आवरल्यानंतर सीमा छंद म्हणून ब्लाऊज शिलाईचे काम करायची. आता तिचाही चांगलाच हात बसला होता त्यामध्ये. त्यामुळे बायकाही आवर्जून आणि विश्वासाने तिच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायच्या.

पण आता इतक्यात "आपण वेगळं राहू" असा तगादा सीमाने सुरेशकडे लावला होता. या गोष्टीवरून दोघांमध्ये होणारे वाद आता थोडे जास्तच वाढत चालले होते.

आईला मात्र सुरेशची होत असलेली कोंडी समजत होती. त्यामुळे तिनेच लेकाला वेगळे राहण्याचा सल्ला दिला. सुरेशला आधी तो पटला नाही पण बायकोच्या समाधानासाठी मग तोही तयार झाला. रोजच्या कटकटीपेक्षा ते परवडलं. असा विचार करुन त्याने सीमाच्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले.

"रुममध्ये आल्यावर सीमाने पुन्हा त्याला प्रश्न केला,
"काय ठरलं आहे तुमचं? मला फायनली तुमचा निर्णय सांगा. नाहीतर उद्या सकाळी मी घरातील इतर कोणाचाच स्वयंपाक करणार नाही."

"होईल सगळं तुझ्या मनासारखं. पण थोडा वेळ तर देशील का मला? उठलं की लगेच वेगळं झालं, असं नाही ना करता येत लगेच. झोप आता शांत आणि मलाही झोपू दे आता."

मनातून तर सीमा खूपच आनंदली होती. इतक्या दिवसाचे तिचे स्वप्न आता सत्यात जे उतरणार होते.

"वेगळं राहायचं भारीच सुख" आता तिलाही अनुभवायला मिळणार होतं. कधी एकदा तो आनंदाचा क्षण येतो, असे झाले होते तिला.

दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर सुरेशने दुपारी कारखान्याच्याच जवळ असलेल्या एका बिल्डिंगमध्ये पाच हजार रु. भाड्याने एक फ्लॅट पाहिला.

जवळच असलेल्या एका खाजगी मराठी शाळेत मुलांच्या ॲडमिशनची चौकशीदेखील केली.

हे सगळे करत असताना खर्चाचा आकडाही मनात तो जुळवत होता. कारण कितीही नाही म्हटले तरी बाहेर राहायचे म्हणजे खर्च तर वाढणारच होता.

पुढच्या दोनच दिवसांत सुरेश सीमाला आणि मुलांना घेवून तिकडे शिफ्ट झाला. 

नवीन घर पाहून सीमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला तर आता पिंजऱ्यातून बाहेर पडल्याचा फील येत होता. तिने अगदी तिला हवे होते तसे घर सजवले. घरुन गरजेच्या सर्वच वस्तू आणि भांडी आणली होती. मुलेही नवीन घर पाहून आनंदली.

पुढच्या दोनच दिवसांत तिने तिच्या मनाप्रमाणे घर लावले. इतक्या वर्षाचे तिचे वेगळे राहायचे स्वप्न आता कुठे पूर्ण झाले होते जणू.

मुलांचेही लगेचच ॲडमिशन झाले आणि त्यांची रेग्युलर शाळा सुरू झाली. सुरेशलाही आता कारखाना जवळच असल्याने जास्त धावपळ करावी लागत नव्हती.

सीमाच्या स्वप्नातील राजा राणीचा संसार आता कुठे सुरु झाला होता. गरज नसतानाही सीमाने फक्त हौसेखातर काही वस्तू घरात आणल्या. भिंतीवर लावायचे पोस्टर,शो पिस, सजावटीच्या वस्तू अशा अनेक गोष्टींची त्यात भर पडली होती. त्यामुळे सहाजिकच अनावश्यक खर्चाने आता हळूहळू तोंड वर काढायला सुरुवात केली होती.

क्रमशः

नुकताच सुरू झालेला हा राजा राणीचा संसार खरच टिकेल का? जाणून घ्या पुढील भागात.