Login

वेगळं राहायचं भारीच सुख!!( भाग ३)

वेगळं राहिल्याशिवाय एकत्र कुटुंबाचे महत्त्व कळत नाही.


अजून वेगळे होवून महिनाही झाला नव्हता तोच सुरेशचे बजेट मात्र डळमळले होते. ह्या महिन्यातील अनावश्यक खर्च जरा जास्तच झाला होता.

बाहेर राहायचे म्हणजे, भाजीपाल्यापासून तर दुधापर्यंतचा खर्च सर्वच अचानक वाढला होता. आधी या दोन्ही गोष्टींवर शून्य खर्च होत होता सुरेशचा. पण आता त्याशिवाय पर्यायच नव्हता.

सीमा मात्र आता वरचेवर सुरेशकडे पैसे मागू लागली. घरदार स्वच्छ ठेवण्यातच तिचा खूप वेळ जायचा. त्यामुळे मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हटले तर तेव्हा ती थकलेली असायची. कारण आता छोट्या छोट्या गोष्टीही तिला एकटीलाच कराव्या लागत होत्या.

याआधी मात्र सासू , दोन्ही जावा जमेल तशी तिला मदत करायच्या. स्वयंपाक झाल्यावर किचन आवरणे, जेवण झाल्यावर भांडी घासणे, कपडे धुवून झाल्यावर ती वाळत घालणे यांसारखी सगळी कामे मिळून सगळ्याजणी करत होत्या. कपडे सुकल्यावर सासूबाई नित्यनेमाने रोज कपड्यांच्या घड्या घालून जागच्या जागी ठेवायच्या.

आता मात्र सगळंच बदललं होतं. सकाळी जे सीमाची धावपळ सुरू व्हायची ते डायरेक्ट दुपारपर्यंत सुरूच असायची. दुपारी आवरुन थोडा वेळ पडावे म्हटले तर सुरेश आणि मुले घरी जेवायला यायचे. कारण शाळा आणि कारखाना जवळच असल्याने कोणीच डबा नेत नव्हते.

दुपारी मिळून सर्वांचे जेवण व्हायचे. मुले आणि सुरेश निघून गेल्यावर मात्र पुन्हा भांडी घासण्यात जास्तीचा वेळ जायचा. काम आवरता आवरता दुपारचे चार कसे व्हायचे तेच समजायचे नाही सीमाला. थोडा वेळ कुठे टेकते ना टेकते तोच पाच वाजता मुले यायची शाळेतून. पुन्हा मग त्यांच्या खाण्या पिण्याचे पहावे लागत असे.

आधी मात्र मुले शाळेतून आली की सासूबाई नातवंडांना काही ना काही खायला द्यायच्या. मग शेतातील केळी, पपई, पेरू, सीताफळे अशी मेजवानी रोजच ठरलेली असायची. आजीच्या अवतीभोवती मुले घोळका करून बसणार हे चित्र रोजच दिसायचे. आणि नसेलच नाही तर घरात भेळ ही असायचीच. मुलांचे मोठे काका मार्केटला शेतमाल घेवून गेले की येताना खूप सारा खावू आणयचे. त्यामुळे मुलांची मात्र चंगळ असायची.

आता मात्र सगळेच चित्र बदलले होते. रोज रोज मुलांना शाळेतून आल्यावर काय खायला द्यायचे हा प्रश्न पडायचा सीमाला. आणि नेहमी नेहमी सर्व विकत आणणे जमायचे नाही. त्यामुळे सीमाची हल्ली खूपच चिडचिड वाढली होती. मुलांनाही घरची, आजीची आजोबांची, काका काकूंची, इतर भावंडांची रोजच आठवण यायची.

मनातून सीमालाही आता "वेगळं राहायचं भारीच सुख" काय असतं ते कळून चुकलं होतं. पण आता काही बोलण्याचीही सोय नव्हती.

आवरुन थोडा वेळ मशीनवर बसायचे म्हटले तर आता पहिल्यासारखा वेळच पुरायचा नाही तिला. त्यामुळे ब्लाऊज शिलाईचे खूप सारे काम तिचे तसेच पडून होते. आधीच्या बायकांची देखील आता तक्रार सुरू झाली होती त्यामुळे.

"शिवून झाले की, मी हे जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे पाठवून देईल तुमचे ब्लाऊज." असे घरुन निघताना तिने शेजारच्या बायकांना सांगितले होते. पण दोन तीन महिने झाले तरी अजून शिलाई मशिनला काही तिचा हातच लागत नव्हता.

त्यामुळे आता बायकांकडून तिला फुकटचा रोष पत्करावा लागत होता."बघ बाई तुला जर जमणार नसेल वेळेत ब्लाऊज द्यायला तर तसे स्पष्ट सांग. नाहीतर आम्ही दुसरीकडे टाकतो शिवायला."

असे करता करता तिचे अनेक कस्टमर कमी झाले. त्यामुळे सीमाचे खूप मोठे नुकसान झाले.

आधी मशीनवर बसल्यावर एक दीड तासात म्हटले तरी ती एक ब्लाऊज शिवून मोकळी व्हायची. हातात घेतलेले काम मधेच सोडावे तरी लागत नव्हते. कारण मधेच जरी मुले आली शाळेतून तरी आजी असायची त्यांना पाहायला. त्यामुळे सीमाचा खूप सारा वेळ कारणी लागत होता. आणि दुपारी थोडा वेळ का होईना पण आराम देखील मिळायचा तिला. आता स्वतःचा एक ब्लाऊज शिवायचे म्हटले तरी ती इतर कामानेच आधीच थकलेली असायची. त्यात हे काम आता तिला नकोस वाटत होते.

क्रमशः

हे असे आता आणखी सुरूच राहणार की बदलणार? जाणून घ्या पुढील भागात.