यावर सीमाने आता एक उपाय शोधला होता. जवळच शालेय मुलांचे क्लासेस होते. तिने तिथे जावून चौकशी केली. आणि
"आपणही मुलांना क्लास लावूयात." असे सुरेशला सुचवले.
"आपणही मुलांना क्लास लावूयात." असे सुरेशला सुचवले.
एका मुलाची फी महिन्याला हजार रुपये. म्हणजे दोन्ही मुलांचा मिळून दोन हजार रु. महिन्याचा खर्च वाढणार. तेवढ्यात घर चालते महिनाभर.
नुसत्या विचारानेच सुरेश काळजीत पडला. कारण उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण आता कैकपटीने वाढत चालले होते.
सहा महिन्यातच सीमाला घरची, सासू सासऱ्यांची आणि जावांची आठवण येवू लागली. हातातील काम सोडून जेव्हा छोट छोट्या गोष्टींसाठी तिला उठावे लागत असे, तेव्हा मात्र तिला आपसूकच वाटायचे, आता जर आई असत्या तर असे दोन दोन मिनिटाला उठावे लागले नसते. हातात घेतलेले काम तर पूर्ण झाले असते.
सुरेशला तर सीमाचे ऐकून आता पश्र्चाताप होत होता. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिचे ऐकले.
आधी वेगळे व्हायचे म्हणून वाद व्हायचे दोघांच्यात. आता वेगळे झाल्यामुळे वाद होवू लागले होते.
"वेगळं राहायचं भारीच सुख" हे तर आता सीमाला चांगलेच समजले होते. एकत्र कुटुंबात असताना "मीच का एकटीने सगळं काम करायचं?" हा तिचा गैरसमज होता आणि तो आता पूर्णपणे दूर झाला होता.
\"घरात ती एकटीच जास्त काम करते\" असे तिला स्वतःला नेहमी वाटायचे. पण फक्त मुख्य काम आणि त्याची जबाबदारी खांद्यावर होती बाकी सगळे मिळूनच सगळी कामे करत होते.
बऱ्याच दिवसातून सीमा आणि सुरेश मुलांना घेवून घरी गेले. आजी आजी करत मुले आजीला जावून बिलगली.
घरी सगळ्याच गोष्टी बदलल्या सारख्या तिला वाटल्या. किचन मध्ये सर्व सेटिंग चेंज झाली होती. काही नव्या वस्तूंची भर पडली होती. घरात मोठ्या दिरांनी आता सोफा देखील घेतला होता.
काही दिवसांपूर्वी शेतमालाला चांगला भाव मिळाला त्यामुळे हे सर्व शक्य झाले. आता सीमाला कळून चुकले होते, "माझाच नवरा जास्त खर्च करत असतो घरात. बाकीचे भाऊ हातचे राखून ठेवतात." हा तिचा गैरसमज आता दूर झाला होता.
दोन्ही जावांनी आणि सासूने मिळून घराचे घरपण टिकवून ठेवले होते.
सासुलाही आता सीमाकडे पाहून तिच्या मनाची घालमेल समजत होती. पण वेगळं राहायचं हा सर्वस्वी तिच्या एकटीचा निर्णय होता. आताच्या मुलींना माणसं नकोशी वाटतात. एकत्र कुटुंबात जास्त काम करावे लागते. त्यामुळे हौसमौज राहून जाते. असा समज असतो त्यांचा. पण एकमेकांना धरुन राहिले तर अडीनडीला आपलीच माणसे धावून येतात मदतीला. असा पळ काढून काहीही साध्य होत नाही. उलट एक ना एक दिवस या गोष्टीचा पश्र्चाताप होणार यात वादच नाही.
काहीही न बोलता सासूने सीमाचे मन वाचले होते जणू.
"काय ग सीमा बरं चाललंय ना सगळं?"
"हो आई. ठीक आहे सगळं. तुम्ही कशा आहात.?"
"मी पण बरीये. पोरांची आठवण येते नेहमी. रोज तुझी घरात असण्याची, तुझ्या बडबडीची सवय जी झाली होती. आता ह्या दोघी पाहतात सगळं. तुझ्या माघारी त्याही शिकल्यात आता घर चालवायला. मला म्हातारीला आणखी काय हवं.? मुलं, सूना, नातवंडं सुखी यातच माझं सुख."
सासूने जणू सीमाला अचूक टोला लगावला होता.
एकदा तरी आई म्हणतील, "बस झालं आता..या घरी परत." असं मनोमन सीमाला वाटत होतं. पण तसे काहीही झाले नाही.
उलट जाताना भाजीपाला आणि पोरांना खायला पण घेवून जा; असं आवर्जून सांगितलं सासूने.
तेही काही कमी नव्हतं म्हणा आजच्या घडीला. एवढं सगळं होवून पण सासूने सीमाची विचारपूस केली हेच खूप होते सीमासाठी.
जाताना मात्र सीमाचा पायच निघेना घरातून. नाही काही निदान "उद्या सुट्टी आहे मुलांना आणि सुरेशला, त्यामुळे राहा आजची रात्र." निदान असे तरी म्हणेल कोणीतरी. पण इथेही अपेक्षा भंगच झाला सीमाचा.
जाता जाता सासूबाई म्हणाल्या, "पोरांना राहू दे आजच्या दिवस इकडे. उद्या त्यांच्या काकाला पाठवते त्यांना घेवून."
आता सीमा तरी नाही म्हणून कोणाला सांगणार होती.
क्रमशः
आता सीमाने वेगळं राहायचा घेतलेला निर्णय ती बदलेल का पुढे जावून? जाणून घ्या पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा