Login

वेळ निघून गेल्यावर समजतं..(भाग ३ अंतिम)

एकत्र आहोत तोवर आनंदाने जगायला हवं.
सकाळीच किचन मधून आवाज सुरू झाला होता.

"बाबा अहो काय सुरू आहे हे. कंटाळा आलाय आता मला. हे जर माझ्या बायको मुळे होत असेल तर आम्हीच शिफ्ट होतो इथून." सुजित बोलला.

"काहीही काय बोलतोस सुजित?" असं काही करणार नाहीस तू.

"काय करणार नाहीस?" तेवढ्यात अजित तेथे आला आणि त्याच्या कानावर अर्धवट काहीतरी पडले.

"काही नाही रे. चल आवर. मीही आवरतो." सुजित म्हणाला आणि आवरण्यासाठी जायला निघाला.

"थांब सुजित मला बोलायचं आहे तुझ्याशी."

" हा बोल की मग."

"तू तुझ्या वहिनीला आज नाही ओळखत. तुझं लग्न झाल्यापासून ती असं वागते. याची कारणं कधी शोधाविशी नाही वाटली?" रागातच अजित बोलला.

"दादा अरे काय बोलतोस तू हे?"

"हो... खरं तेच बोलतोय मी. नेहा ऑफिसला जाते. रात्री यायलाही तिला उशीर होतो. घरातील सगळी कामं त्यामुळे निशावर एकटीवर पडतात. जे योग्य आहे का?"

"अजित अरे हे असं कसं बोलतोस तू? शामल असते ना पण तिच्या मदतीला. तू हे असं बोलशील असं वाटलं नव्हतं मला." सदाशिवराव म्हणाले.

"बाबा, आतापर्यंत आई उघडपणे ह्या दोघांना सपोर्ट करत होती आता तुम्ही सुद्धा. एकदा तरी निशाचा विचार करा ना."

आपल्यामुळे हे सर्व असे काही होईल याचा सुजितने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता.

"ठीक आहे दादा, मी बघतो काय करायचं ते. हवंतर घरातील कामं करण्यासाठी मी माझ्या शिकलेल्या बायकोला घरात बसवतो. पण एक सांगतो, आमच्या दोघांकडून तुम्हा कोणालाही यापुढे कोणताही त्रास होणार नाही याची मी खात्री देतो." असे म्हणून तो आत निघून गेला.

एव्हाना ही सर्व चर्चा निशा आणि शामल ताईंच्या कानावर पडली होती. आज पहिल्यांदा नवरा आपल्या बाजूने बोलला यासाठी निशाला खूपच आनंद झाला.

शामल ताई आणि सदाशिवराव मात्र भरल्या नजरेतूनच एकमेकांशी बोलत होते.

'देवा ह्यांना सद्बुद्धी दे रे बाबा. निदान आमच्या ह्या वयात तरी लेका सुनांचा संसार फुलताना फळताना बघू दे. हे असे दिवस इतक्यात तरी नको दाखवू.' सदाशिव रावांनी देवाला विनवणी केली.

घाईतच आवरुन सुजित घराबाहेर जायला निघाला.

"अरे नाश्ता तरी करुन जा."

"नको आई. पोट भरलंय माझं."

"अरे सुजित तो डबा तरी घेऊन जा ना मग." धावतच डबा घेऊन शामल ताई लेकाच्या पाठोपाठ गेल्या.

"नको आई इतरांच्या जिवावर नाही मला खायचं काही."

"अरे तुझ्या बायकोनेच केलाय हा डबा. तिनेच भरुन ठेवला आहे. असं नको करू."

" तरी नको आई. आज इच्छा नाही कसलीच."

भावाच्या वागण्याने सुजित खूपच दुखावला होता.

असे वागून आपण देखील चूक केली हे अजितला समजले,पण 'जाऊ दे कधी ना कधी हे होणारच होतं ते आज झालं.'अजित मनातच बोलला.

पण निशा मात्र मनातून खूपच आनंदी होती. तिला नवऱ्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले होते.

"अहो चला नाश्ता करून घ्या." निशा बोलली.

'आता भाऊ उपाशी बाहेर पडला मग आपण तरी कसं खायचं?' असा विचार अजितच्या मनात आला.

"अहो खा की. आज कधी नव्हे तो एकदम बरोबर वागलात तुम्ही. एक लक्षात ठेवा, जो सगळ्यांचा विचार करतो ना तो  आयुष्यात नेहमी मागेच राहतो. आणि बाकीचे त्यांच्या जिवावर आपला स्वार्थ साधून स्वतःची प्रगती करत त्यालाच मागे टाकून पुढे निघून जातात. इतकं सोप्पं गणित आहे हे. पण तुम्हाला ते लवकर समजलं हे एका अर्थी बरंच झालं." सासू सासाऱ्यांना ऐकू जाईल ह्या आवाजात निशा बोलली.

एकाच घरात राहून निशा असा काही विचार करत असेल हे शामल ताई आणि सदाशिव रावांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. सुनेचे हे बोलणे दोघांच्याही मनाला खूपच लागले. दोन लेकांमध्ये पडत असलेली फूट घराच्या प्रगतीसाठी घातक आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. पण ह्यांना कोण समजावणार हे.

निशाच्या आग्रहास्तव अजित नाश्ता करून आणि डबा घेऊन ऑफिसला गेला. आज निशा मात्र खूपच आनंदात होती. सासू सासरे मात्र शांत बसून हे सारे पाहत होते.

निशा खूपच चुकीचं करत आहेस तू हे." भरल्या डोळ्यांनी शामल ताई बोलल्या.

"असू द्या. पण चांगलं वागून तरी तुम्ही कुठे मोठा पुरस्कार देणार आहात आम्हाला. कितीही केलं तरी धाकटा लेक आणि सुनच तुमचे लाडके राहणार आयुष्यभर. त्यात दोघेही कमावते मग तुम्हाला त्यांचा पुळका येणारच ना."

काय बोलावे यावर आता शामल ताईंना देखील समजेना.

"जाऊ दे शामल तू नको त्रास करून घेऊ." सदाशिव रावांनी बायकोला धीर दिला.

उरलेली कामं आवरुन  निशा सासूच्या जवळ येत म्हणाली, "बरं आई, मी जरा आईकडे जाऊन येते. संध्याकाळपर्यंत येते पुन्हा." म्हणत सासूच्या उत्तराची वाट न बघता ती घराबाहेर पडली.

रात्री घरातील वातावरण खूपच बिघडले होते.

"आई बाबा उद्या मी शिफ्ट होतोय इकडून." सुजित बोलला. नेहाला तर काहीच समजेना.

"अहो तुम्ही नका शिफ्ट होऊ भाऊजी आम्हीच होतोय शिफ्ट." निशा बोलली.

"असं कसं तुम्हाला आमचा त्रास आहे ना की आम्हाला तुमचा."

"तुम्हाला त्रास होईलच कसा? सगळं व्यवस्थित सुरू आहे ना तुमचं."

"वहिनी...काहीही काय बोलतेस तू." सुजित बोलला.

शब्दाने शब्द वाढत होता. आजूबाजूचे लोक भिंतीला कान देवून ऐकत होते. बाहेर कुजबुज सुरू होती लोकांची.

" अरे जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा रे. शांत व्हा. ज्याला राहायचे आहे माझ्या घरात त्याने राहा आणि ज्याला जायचे त्याने जा. सगळ्यांना आपापले स्वातंत्र्य आहे." रागातच सदाशिवराव बोलले.

"आम्हाला आमचा हिस्सा द्या आम्ही उद्याच निघतो इथून."अजित बोलला.

मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही मिळणार नाही कोणाला हे ध्यानात ठेवा.

बोलता बोलता सदाशिवरावांच्या छातीत जोरात कळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.

"झालं ना मनासारखं? घ्या हे घरदार, पैसा अडका सारं काही घ्या. आता माझाही त्रास नाही होणार तुम्हाला." बोलता बोलता त्यांना धाप लागली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. नवऱ्याच्या मृत्यचा धक्का त्या पचवू शकल्या नाहीत. दवाखान्यातच त्यांनी देखील शेवटचा श्वास घेतला.

सुजितने एकच टाहो फोडला. अजित मात्र स्वतःच्या चुकिवर पश्र्चाताप करत अश्रू ढाळत कोपऱ्यात तसाच उभा होता. क्षणात होत्याचे नव्हते झाले होते.

सर्वांना सर्वांच्या चुका लक्षात आल्या होत्या. पण आता वेळ निघून गेली होती. आता आयुष्यभर फक्त पश्र्चाताप करत दोघेही भाऊ एकाच घरात दोन चुली मांडून संसार करत आई बापाच्या आठवणीत दिवस ढकलत होते.

जाता येता दोघेही नजर चोरत जणू एकमेकांशी रोज ते बोलत होते...
'जे झालं ते खूप वाईट झालं आणि ते आपल्यामुळेच झालंय. देव आपल्याला कधीही माफ करणार नाही.'

समाप्त

ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. फक्त एकत्र आहेत तोवर आनंदाने जगायला हवं. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीही अर्थ नाही. हे कथेचे सार आपल्याला आयुष्याची शिकवण देवून जाते.