"आई...तुम्ही सांगताय नेहाला की मी सांगू?"
"अगं पण निशा..इतकी टोकाची भुमिका घ्यायची गरज आहे का काही?"
"हो आहे! कारण आता नाही सहन होत मला. ह्या महाराणी स्वतःचं आवरुन ऑफिसला निघून जाणार. मी मात्र घरात राब राब राबायचं."
"अगं पण ती घरात येण्याआधीपासून तू सगळं करतच होती ना? मग आताच काय एवढा त्रास होतोय तुला?"
"घ्या घ्या तिलाच डोक्यावर घ्या. मी आहे म्हणून चाललंय सगळं. तुम्हाला माझे कष्ट नाही दिसणार. पण धाकट्या सुनेचे मात्र भारीच कौतुक असते. कालच घेतला अनुभव. मोठ्या दिमाखात सांगत होतात, सुमन काकूंना..आमची नेहा कशी हुशार आहे ते. सगळं कसं अगदी परफेक्ट असतं तिचं. मग आता तुमच्या नेहाला सांगा.. बाई सकाळी उठून तुझ्या वाटणीची सगळी कामं करून मगच ऑफिसला जात जा. मग तिचा परफेक्टपणा मलाही बघू दे जरा."
"तुला नक्की त्रास कसला होतोय निशा? नेहा ऑफिसला जाते याचा?, मी तिचं कौतुक केलं याचा? की ऑफिस पाहून घरातील कामांना ती वेळ देवू शकत नाही याचा.?"
"आता ना मला सगळ्याच गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय. कारण मी कितीही केलं या घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी तरी शेवटी नेहाइतकी निशा कधीच ग्रेट होणार नाही. कानामागून आली अन् तिखट झाली." तावातावाने निशा बोलत होती. धाकट्या जावेबद्दलचा तिच्या मनातील राग आज अनावर होत होता तिला.
तेवढ्यात नेहा ऑफिसमधून आली. आजही ऑफिसमधून यायला तिला थोडा उशीरच झाला. आज मनाशी पक्के ठरवले होते तिने, काहीही झाले तरी ती आज तरी स्वयंपाकाच्या वेळी घरी पोहोचायचेच. पण नवीन नोकरीच्या ठिकाणी जुळवून घेताना वेळेचे गणित मात्र बिघडत होते.
'आजही निशा ताईंचा रोष ओढवून घ्यावा लागणार.'. याची नेहाला खात्री होतीच. पण ती तरी काय करणार, तिचाही नाईलाज होता. थोडी धाकधूक मनात ठेवूनच तिने घरात पाऊल टाकले. शेवटी निशा ताईंचे काही शब्द ओझरते नेहाच्या कानी पडले आणि तिच्या मनात धस्स झाले.
खाली मान घालून तशीच ती तिच्या रूम मध्ये गेली.
थोडयाच वेळात अजित आणि सुजित देखील ऑफिसमधून घरी आले. घरातील वातावरण थोडे गरम असल्याची जाणीव काहीही न बोलता त्यांना झाली. नेहा आणि सुजितच्या लग्नापासून हे असे जरा जास्तच वाढत चालले होते. काहीही न बोलता दोघेही फ्रेश व्हायला गेले.
आता कुठे नेहा आणि सुजितच्या लग्नाला सहाच महिने झाले होते. पण दोन महिन्यातच घरातील शांतता भंग पावली होती.
"धाकटी जाऊ नोकरी करते आणि मी मात्र घरातील कामे करते," ही सल बोचत होती निशाच्या मनाला. खूप दिवसापासून तिची अजितच्या मागे भुणभुण सुरु होती, आपण वेगळे राहुयात, पण अजित मात्र तिचे काहीही ऐकायला तयारच नव्हता. त्यामुळे निशा मात्र यासाठी नेहालाच जबाबदार धरून तिचा रागराग करत होती. नेहा कशीही वागली तरी तिला ती चुकीचीच वाटत होती.
नेहा फ्रेश होवून दहाव्या मिनिटाला बाहेर आली. सर्वांची नजर चोरत ती किचनमध्ये गेली. जेवणाची ताटे बनवायला घेतली.
माहेरी लाडाकोडात वाढलेली नेहा सासरी मात्र खूपच दबून राहत होती. पण एकाच वेळी नोकरी पाहून घर सांभाळणे सध्या तरी तिला शक्य नव्हते.
सर्वांना जेवायला वाढत असतानाच नेहा कडाडली, "आयते करून ठेवले आता वाढण्याचे तरी कष्ट कशाला घेतेस? राहू दे करते मी माझं," म्हणत नेहाच्या हातातील भाजीची कढई निशाने जवळपास ओढूनच घेतली.
नेहाला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले. डोळ्यांत आसवांची दाटी झाली. पण काय करणार? सासू सासरे दोघांचाही जीव नेहासाठी तुटत होता. कारण निशाने कितीही राग राग केला तरी नेहा मात्र कधीही उलट उत्तर द्यायची नाही. त्यामुळे नकळत का होईना पण तिने सासू सासऱ्यांच्या मनात घर निर्माण केले होते.
उलट 'ताईंची तरी काय चूक आहे यात? माझा स्वयंपाक तसेच घरकामाला हातच लागत नाही मग त्यांनी मला समजून घ्यावे ही अपेक्षा मी करुच शकत नाही.'असा विचार करून नेहा गप्पच बसायची आणि तसंही उलट उत्तर देण्याचा तिचा स्वभावच नव्हता. पण आज निशाच्या कठोर शब्दांनी तिचे हृदय पिळवटून निघाले.
सविता ताईंनी डोळ्यातूनच दिलासा दिला तिला.
' तिचं डोकं गरम झालंय त्यामुळे जास्त वाईट नको वाटून घेवूस.'
' तिचं डोकं गरम झालंय त्यामुळे जास्त वाईट नको वाटून घेवूस.'
पण इकडे निशाचे मात्र मनातल्या मनात वेगळेच प्लॅनिंग सुरु होते.
'इथे माझी कोणाला कदरच नाही. मीही बघते मॅडम उद्या कशा ऑफिसला जातात ते? त्याशिवाय माझी किंमत कोणाला कळणार नाही.'
'इथे माझी कोणाला कदरच नाही. मीही बघते मॅडम उद्या कशा ऑफिसला जातात ते? त्याशिवाय माझी किंमत कोणाला कळणार नाही.'
रात्रीचे जेवण शांततेतच पार पडले. कोणी कोणाशी काहीही बोलेना.
क्रमशः
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा