दुसऱ्या दिवशी निशा मुद्दाम उशिरा उठली. ऐनवेळी हे समजल्या नंतर नेहाची कशी तारांबळ उडते? हे पाहण्यासाठी ती आतूर झाली होती.
घाईतच ती किचनमध्ये आली, तेव्हा समोरचे चित्र पाहून ती थक्कच झाली.
सकाळी लवकर उठून नेहाने अर्धा अधिक स्वयंपाक रेडी केला होता. नेहाने आदल्या रात्रीच ठरवले होते.
'उद्या लवकर उठायचे. लवकर उठून शक्य तेवढी कामे आवरुन मगच ऑफिसला जायचे.'
'उद्या लवकर उठायचे. लवकर उठून शक्य तेवढी कामे आवरुन मगच ऑफिसला जायचे.'
झालेही अगदी तसेच... घाईत आवरुन डबा, पाणी बॉटल पर्स मध्ये टाकत 'आई येते मी म्हणत' पायात चप्पल चढवत घाईतच ती घराबाहेर पडली. धावतच बस स्टॉप पर्यंत जायला निघाली. आज मनातून ती खूपच हलके फील करत होती. आज कोणाच्याही उपकारात नसल्याची भावना तिच्या मनाला वेगळाच आनंद देवून गेली. पण घरची कामे आवरण्याच्या नादात तिची बस मात्र नेमकी काही मिनिटांनी हुकली.
आता मात्र काय करावे तिला काहीही सुचत नव्हते. डोळ्यांत आसवांची दाटी नि मनात ऑफिसमधील त्या खडूस आणि रागीट बॉसचा विचार आला.
'आता माझे काही खरे नाही. देवा तूच मार्ग दाखव आता.'
तितक्यात नेहाच्या समोर एक बाईक येऊन थांबली.
"नेहा... अगं तू आणि इथे?"
" थँक्य गॉड नीरज, देवासारखा धावून आलास बघ."
"अगं हो हो. शांत हो आधी. इतकं काय झालंय..? आणि इतका घाम का फुटलाय तुला?"
"ऐक ना, मला थोडी हेल्प करशील?"
" बस का! तू बोल फक्त."
"मला ना माझ्या ऑफिस पर्यंत सोडशिल?"
" हा काय प्रश्न आहे का नेहा? चल बस. योगायोगाने मीही तुझ्या ऑफिसच्या बाजूलाच राहत आहे."
नीरज, नेहाचा कॉलेज मित्र. कॉलेजच्या सुरुवातीला जास्त बोलत नव्हते दोघेही पण एकमेकांबद्दल दोघांनाही खात्री पटली आणि कॉलेज संपत आल्यावर मग एकमेकाशी ते बोलू लागले होते. पुढे नोकरीच्या काळात अधूनमधून भेटीगाठी व्हायच्या दोघांच्या पण जास्त बोलणं नाही व्हायचं. त्यातच पुढे काही दिवसातच नेहाचे लग्न झाले आणि मग पुन्हा बोलण्याचा काही प्रश्नच आला नाही. आता सहा महिन्यानंतर दोघेही असे अचानक समोर आले.
आज नीरज मुळे नेहा वाचली होती पण उद्या कसं करणार होती ती. ते देवालाच माहिती."
इकडे निशा मात्र आणखीच चिडली होती.
'हे असं नेहमी माझ्या बरोबरच का होतं? विचार केला होता आज तरी तिला अद्दल घडेल. पण ही तर माझ्याही पुढची निघाली.' निशा मनातच विचार करत होती.
"काय गं एव्हढा कसला विचार करतेस? आता झालं ना तुझ्या मनासारखं?"
" काही नाही झालं. हे एवढ्या चपात्या करायच्या ठेवल्यात की माझ्या वाटणीच्या."
"अगं निशा, तू मोठी आहेस. नेहा तुझ्या लहान बहिणी सारखी आहे मग तू तिला नाही समजून घेणार मग कोण घेणार गं? आणि मी आहेच की तुझ्या मदतीला. ती नाही आली लवकर तर मी करेल तिच्या वाटणीचं काम. एकमेकींना समजून घेतलं तरच घरात शांतता नांदेल बघ. आम्हाला तरी दुसरं काय हवंय गं?"
"हो का. पण तुम्ही का करायचं काम आम्ही दोघी दोघी सूना असताना. ती यायच्या आधी मी तुम्हाला काम करू दिलं नाही मग तीही सूनच आहे या घरची. तिने नको करायला? आणि तुम्हाला इतकीच हौस असेल कामाची तर उद्यापासून मीही करते एखादी छोटी मोठी नोकरी. मग पुरवा दोन्ही सूनांचे लाड."
जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. लाट त्या चपात्या नाहीतर करते मी हो बाजूला. त्या दोघांनाही जायचंय पुन्हा ऑफिसला. नेहाने सुजितचा डबा भरुन ठेवलाय. आता तू तुझ्या नवऱ्याचा भर. भाजी बनवली आहे नेहाने."
"बापरे! हो का? आज तर खूपच कामं केली हो तुमच्या लाडक्या सुनेने. आज बरं उरकलं सगळं. याचा अर्थ रोज मुद्दाम अंग काढून घेते. असं जर रोज मला मदत करू लागली असती तर मी कशाला काय बोलले असते नाही का?"
"अगं पण ती नवीन आहे. तिलाही तिचा वेळ द्यायला नको का निशा?"
"दिला की...आता सहा महिने दिले. इथून पुढे नाही देवू शकत."
म्हणजे हे असंच सुरू राहणार तर."
"कदाचित? जोपर्यंत एकाच घरात आहोत तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आणि का राहू नये? तुम्ही जर दोन सुनांमधे असा भेदभाव करणार असाल तर हे असेच राहणार ना."
"जाऊ दे चुकलं बाई माझं सोड आता विषय आणि गप्प बस." शामल ताई बोलल्या.
"आता विषय निघालाच आहे म्हणून सांगते. तिला जर माझ्या जीवावर नोकरी करायची असेल तर एकतर ते ह्या घरात राहतील नाहीतर मी."
" अगं काय बोलतेस तू हे?"
क्रमशः
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा