Login

वेळेच्या काठावर भाग - १

वेळ थांबवू शकणारी सामायरा आपली शक्ती लोकांच्या भल्यासाठी वापरते. खरी शक्ती म्हणजे जबाबदारी आणि धैर्य.
वेळेच्या काठावर भाग - १


आरवाडी नावाचं छोटंसं गाव. टेकड्या, वाऱ्याचा मंद स्पर्श, आणि सतत धावणारा वेळ. या गावात राहायची सामायरा, १६ वर्षांची, शांत, पण मनाने खूप खोल.

सामायराकडे एक विचित्र देणगी होती, ती वेळेला काही क्षणांसाठी हळू करू शकायची. कोणालाच हे माहित नव्हतं, अगदी तिच्या आई-वडिलांनाही नाही आणि सामायरालाही हे कधी एक वरदान वाटायचं, तर कधी ओझं.

एके दिवशी शाळेतून परतताना वादळ उठलं. झाडं हेलकावत होती आणि तिच्यासमोर एक लहान मुलगा सायकलसकट घसरत होता. तिचं हृदय धडधडलं आणि त्या क्षणी…तिच्या आजूबाजूचा आवाज मंद झाला. पावसाचे थेंब हवेतच थबकले. वेळ मंदावली होती.

ती मुलाला बाजूला खेचते आणि वेळ पुन्हा नेहमीसारखी चालू होते. मुलगा घाबरून पाहतो, “ताई… तू इतक्या पटकन कशी धावलीस?”

सामायरा हसते, काही न सांगता चालू लागते.‌ पण तिच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न उभा राहिला, जर हे खऱ्या अर्थाने माझं वरदान असेल, तर मी याचा उपयोग कशासाठी करणार?

सामायराचं एक स्वप्न होतं, शास्त्रज्ञ होण्याचं, आणि वेळ, स्मृती, आणि मानवी मेंदू यावर संशोधन करण्याचं.

पण गावातील लोक काय म्हणायचे? “मुलींना एवढं काय विज्ञान-विज्ञान? शिकतेय ना, पुरे!” “विज्ञानात एवढं काही नाही, नर्सिंग कर, ते सोपं.”

तिचं हसू दाबलं जात असे. पण स्वप्न मात्र दाबलं जात नव्हतं. रात्री ती झोपण्याआधी स्वतःशी म्हणायची,
“वेळ माझा शत्रू नाही…माझ्याकडे तर वेळ थांबवण्याची ताकद आहे.”

तिच्या शाळेत मोठ्या प्रमाणात विज्ञान प्रदर्शन होतं आणि विजेत्याला मुंबईतल्या संशोधन संस्थेत दाखल होण्याची संधी होती. सामायराचं मन पेटलं.

पण स्पर्धेचा विषय कठीण होता, “मानवी मेंदूतील वेळेची समज” बरेच विद्यार्थी सोपे प्रकल्प करायला गेले.
पण सामायराकडे वेगळं होतं, तिच्या अनुभवाचा आधार.

तिने एक मॉडेल तयार केलं, ज्यात दाखवलं होतं की ताण, भीती किंवा अतिउत्साहाच्या क्षणी मेंदू “टाइम परसेप्शन” बदलतो. म्हणजे आपल्याला वेळ जास्त जलद किंवा जास्त हळू गेल्यासारखा वाटतो.

लोक थक्क झाले. पण तिच्या वर्गात एक मुलगा होता, ध्रुव. ध्रुव हुशार होता, पण ईर्ष्येखोर.

“ही असा मोठा विषय कसा करणार? तिला काय मेंदूचा सखोल अभ्यास माहिती आहे?”‌ तो टोमणे मारायचा.

सामायरा फक्त हसायची. ती जाणून होती, तिच्या आतली शक्ती कोणालाच माहिती नव्हती.

स्पर्धेच्या एक दिवस आधी… तिचं मॉडेल कसं तरी तुटलेलं आढळलं. तारी कापलेल्या, सेन्सर्स मोडलेले. हे कोणी केलं होतं ते स्पष्ट नव्हतं.

ती बसून रडणार होती… पण त्या वेळी तिला आईचं वाक्य आठवलं, “काहीही झालं तरी हार मानायची नाही"

तिने मॉडेल पुन्हा तयार करण्याचं ठरवलं. पण तिच्याकडे वेळ अगदी कमी होता, फक्त दोन तास.

हात थरथरत होते…त्वरेची गरज होती आणि तेव्हा तिने स्वतःशी हळूच म्हटलं, “वेळ… मला थोडी जागा दे.”

क्षणात आवाज मंद झाला. वेळ पुन्हा हळू झाली.
या वेळेस तिने नेमकं काय करायचं ते समजून घेतलं.
दोन तासांचं काम तिने एक तासात पूर्ण केलं.

स्पर्धेच्या आधी तिने वेळ परत सामान्य केली. कोणालाच काही कळलं नाही.

सामायरा स्टेजवर उभी राहिली. तिच्या मॉडेलमध्ये काही कमतरता होत्या, घाईमध्ये परत बनवलं होतं ना!
पण तिच्या स्पष्टीकरणात प्रचंड आत्मविश्वास होता.

“वेळ हा आपण विचार करतो तितका सरळ नसतो.
आपल्या मेंदूमध्ये वेळेबद्दल वेगवेगळे सिग्नल्स जातात.
जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा प्रत्येक सेकंद लंबा वाटतो आणि आनंदात वेळ उडून जातो. म्हणून वेळ ही घड्याळ ठरवत नाही… आपला मेंदू ठरवतो.”

जजेसना तिचं बोलणं स्पष्ट आणि परिपक्व वाटलं.
ध्रुव चिडून कोपऱ्यात पाहत राहिला.

विजेत्यांचं नाव जाहीर झालं, तिसरा पुरस्कार…दुसरा पुरस्कार…तिचं नाव नाही.

आणि मग, “पहिला क्रमांक, सामायरा कुलकर्णी”

संपूर्ण हॉल टाळ्यांनी भरून गेला. ध्रुवचा चेहरा पडला.
पण सामायराला यश एवढं महत्त्वाचं वाटलं नाही जितकं तिच्या डोळ्यात चमकणाऱ्या स्वप्नांचं वास्तव.

ती मुंबईतील प्रॉमिनंट विज्ञान संस्थेत दाखल होणार होती.
मुंबईला जाणं म्हणजे गाव, आई-वडील, मित्र…सगळ्यांना मागे सोडणं आणि तिला अजून एक गोष्ट समजली नव्हती, तिची ‘वेळ मंदावण्याची’ क्षमता वाढत चालली होती.

कधी कधी वेळ काही क्षणांसाठी थांबेल असं भासत होतं, जरी ती प्रयत्न करत नसली तरी…हे वरदान आहे का?
की एखादी अदृश्य जबाबदारी?