Login

वेळेच्या काठावर भाग - ३ (अंतिम भाग)

वेळ थांबवू शकणारी सामायरा आपली शक्ती लोकांच्या भल्यासाठी वापरते. खरी शक्ती म्हणजे जबाबदारी आणि धैर्य.
वेळेच्या काठावर भाग - ३ (अंतिम भाग)


काही आठवडे गेले. तीने वेळ मंदावण्याच्या क्षमतेवर रिसर्च सुरू केला, मेंदूतील निर्णय प्रक्रियेतील अचानक वाढणाऱ्या न्यूरल सिग्नल्सवर, अ‍ॅड्रेनालाईन स्पाइकवर आणि तणाव प्रतिसादावर.

ज्या क्षणी ती स्वतःवर विश्वास ठेवू लागली…त्याच वेळी संस्थेतून एक मोठी घोषणा आली, “२०२६ साठी नॅशनल यंग इनोव्हेटर अवॉर्डसाठी प्रोजेक्ट सबमिट करा.”

हे तिचं आयुष्य बदलू शकतं होतं. तीने विषय निवडला,
“मानवी मेंदूची वेळ-विषयक प्रक्रिया आणि तणावात बदलणारी संवेदना”

हा विषय तिला तिच्या शक्तीची वैज्ञानिक सत्यता शोधायला मदत करणार होता.

प्रोजेक्ट सादर करण्याचा दिवस आला. संपूर्ण देशभरातून विद्यार्थी आले होते. जजेस अनुभवी वैज्ञानिक, मेंदू शास्त्रज्ञ होते

तिच्या आधी रोनितचे सादरीकरण झाले, खूप चांगलं, पण सामान्य.‌ ध्रुवसारखे लोक इथे नव्हते; इथे स्पर्धा खूप वेगळ्या पातळीची होती.

तिचा क्रमांक आला. स्टेजवर उभी राहिल्यानंतर तिला एक क्षण वाटलं, “मी खोटं जगतेय का?”

मी वेळ मंदावते…पण जगासमोर मी वैज्ञानिक शब्दांत बोलते. हे योग्य आहे का?

पण मग तिला आठवलं, मी ही शक्ती दाखवण्यासाठी नाही मिळाली. ती वापरून फरक घडवण्यासाठी मिळाली आहे.

ती आत्मविश्वासाने बोलू लागली. तिने सांगितलं, “आपण वेळ बाहेर शोधतो. पण वेळ आपल्यात आहे. आपल्या मेंदूच्या धारणा वेळेचा वेग ठरवतात. घड्याळ सेकंद दाखवतं…पण मन अनुभव दाखवतं.”

ज्येष्ठ वैज्ञानिक तिच्याकडे बारकाईने पाहत होते.
एवढ्यात अचानक, प्रोजेक्टरचा स्पार्क झाला. धूर उठू लागला. लोक घाबरू लागले. खूप जवळ विद्यार्थी उभे होते.

सामायराच्या मनात भीतीची ठिणगी पुन्हा पेटली.
वेळ मंदावली. ती त्या क्षणात धावली, विद्यार्थ्यांना बाजूला ढकललं, केबल दूर ओढली, धूर कमी होईल अशी व्यवस्था केली.

जेव्हा वेळ सामान्य झाली तेव्हा सगळ्यांनी फक्त हेच पाहिलं, सामायरा काही सेकंदात सगळं कसंबसं ठीक करून परत आपल्या जागी उभी आहे. जजेस थक्क झाले. लोक गोंधळले.

त्यांना तिच्या वेगाचं कारण माहिती नव्हतं. पण तिच्या शांततेत एक वेगळीच क्षमता दिसली.

समारोपाच्या वेळी निकाल जाहीर झाले, सामायराला पहिला क्रमांक मिळाला. पण त्याहून मोठं काय होतं तर,
तिला मेंदू विज्ञान आणि वर्तणूक संशोधनासाठी विशेष शिष्यवृत्ती मिळाली.

रोनित तिच्याकडे आला. “तुझ्यात काहीतरी खूप वेगळं आहे. तू ते सांगू इच्छित नाहीस, ते ठीक आहे. पण तू ते चांगल्या गोष्टींसाठी वापरतेस, तेच महत्त्वाचं.”

सामायराने खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदा कोणाला तरी मान्य केलं, “मी वेळ थांबवते…पण मी ती शक्ती स्वतःसाठी नाही, लोकांसाठी वापरणार.”

रोनित शांतपणे म्हणाला, “ही शक्ती नाही… ही जबाबदारी आहे.”

सामायराला पहिल्यांदाच हे अगदी खरे वाटले. तिने स्वतःला वचन दिलं, “जेव्हा वेळ लोकांवर तुटून पडेल…
तेव्हा मी वेळेला थांबवेन, माणसांसाठी.”

ती चालत निघाली. आकाशात हलकासा प्रकाश होता.
वेळ पुन्हा तिच्याभोवती शांतपणे वाहत होती आणि सामायरा, ती आता वेळेची कैदी नव्हती. ती वेळेची निर्माती बनत होती.