Login

वेळीच आलेलं शहाणपण (भाग:3)

Social Media Reality.
वेळीच आलेले शहाणपण ( भाग ३ )
जलद लेखन
म्हण : दुरून  डोंगर साजरे


आपल्या जवळच्या मैत्रिणींना भेटून मेघाला फारच छान वाटले. मुख्य म्हणजे त्यांच्या एकूण चर्चेनंतर तिला चांगलेच समजले की,दुरून डोंगर साजरे.... कोणतीही गोष्ट दुरून जितकी आकर्षक आणि चांगली दिसते,तितकी प्रत्यक्षात जवळून पाहिल्यावर चांगली असतेच असे नाही.त्यातील अनेक कमतरता आणि त्रास समोर येतात.
यातूनच मेघाने आयुष्यातील मुख्य धडा घेतला. सोशल मीडिया म्हणजे आभासी जग, त्यापेक्षा वास्तव फार वेगळे असते.

त्यानंतर मेघा मध्ये झालेला बदल सुखावह होता. तिच्या मनाची आणि परिणामतः तिच्या घराची विस्कटलेली घडी हळूहळू पूर्ववत होत होती.कोणतेही काम यंत्रवत न करता अगदी उत्साहाने करत होती. त्यामुळे कामही चांगले होत होते आणि त्यामुळे तिचा आनंदही द्विगुणीत होत होता.आता सोशल मीडियाचा वापर योग्य रीतीने केल्यामुळे तिला स्वतःच्या व्यायामासाठी आणि छंद जोपासण्यासाठी भरपूर वेळ मिळत होता.

तिच्यामधला हा सुखावह बदल टिपत अमोलने एक दिवस तिला विचारलेच.
"काय ग मेघा, मैत्रिणींना भेटल्यापासून तू भलतीच आनंदी झाली आहेस. म्हणजे तुला माझा आणि अनयचा इतका कंटाळा आला होता की काय?
अमोलने तिची फिरकी घेतच विचारले.

"काहीतरीच तुमचे. माझे जग तुमच्या दोघां भोवतीच असताना मला तुमचा कंटाळा का म्हणून येईल ना?", मेघा मनापासून उत्तर देत म्हणाली.

"तेही आहेच पण मला इतके आनंदी होण्याचं कारण तर सांगशील?", अमोल ने त्याचा मुद्दा तसाच ठेवत विचारले.

"हो सांगते.तुम्हाला कधीपासून मला सांगायचे होतेच. खरंतर मध्यंतरी माझी चुक झाली. सोशल मीडियाचा अतिवापर. त्यातल्या त्यात त्यावर मैत्रीणींचे फोटो, व्हिडीओ  पाहून मी माझी तुलना नकळत त्यांच्याशी करू लागले होते. स्वतःला त्यांच्याच नजरेने पाहत होते. नकळतच बरं असं ठरवून नाही. पण आतल्या आत कुढत होते. माझ्याकडे हे नाही किंवा माझ्याकडे ते नाही. मी अशीच आणि मी तशीच असे अनेक विचार करत माझे मन सतत चिंता करत होते.
इतके शिक्षण घेऊन मी घरात बसलेले आहे, लाचार, अयशस्वी मी असेच स्वतःला समजत होते. पण,मी स्वतः आपल्या बाळासाठीच घरी राहण्याचा निर्णय घेतलाय हेच विसरून गेले. पण तुम्हाला सांगते, त्या दिवशी मैत्रिणींना भेटल्यावर जाणवलं. सोशल मीडियावर अनेकजण जे आयुष्य दाखवतात, ते अगदी वरवरचे असते. त्यामागील  वास्तव कोणी का टाकेल ना?

मी काही वर्षांनी नोकरी करू शकेलही, पण आपल्या बाळाचे बालपण पुन्हा येणार नाही. याची मला जाणीव झाली आहे आता.
तुमच्यासारखा  समजूतदार  नवरा, माझा लाडोबा अनय आणि आपल्या दोघांच्याही कुटुंबाची साथ असतांना, शरीर निरोगी असतांना मी नको त्या काल्पनिक मृगजळामागे धावत होते. पण माझ्या मनावरचं मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. स्वतःची तुलना इतरांशी न करता मी प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहणार आहे.
मेघा अगदी उत्साहाने अमोलला सांगत होती आणि एकीकडे अनयसोबत चित्रही रंगवत होती.

"चला... बरं झाले तुझे तुलाच समजले. नाहीतर तुला उदास पाहून मलाच अपराधी वाटत होते ".अमोल कौतुकाने सांगू लागला.
" सोशल मीडिया जितके चांगले तितके वाईट आहे. म्हणून मोबाईलचा वापर योग्य ठिकाणी आणि गरजेपुरताच करता आला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता असे वाटते की, नक्की आपल्यासाठी मोबाईल आहे की मोबाईल साठी आपण?" अमोल तिला समजावत पुढे म्हणाला.

"खरंयना मेघा, इतरांशी तुलना न करता आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला ना तर आपली सुखाची ओंजळ कधीही  रिकामी होणार नाही. कारण बऱ्याचदा आपल्याकडे जे असतं ते दुसऱ्यांकडेही नसतं. जे आहे त्यासाठी आभार मानूया...

भरभरून जगूया प्रत्येक क्षण,
पेरत जाऊ आनंदाचे कण,
मग बघ आयुष्यच कसं येईल,
प्रेमाच्या अंकुरांनी बहरून..."

अमोलची सुंदर चारोळी ऐकून मेघाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि योग्यवेळी शहाणपण आल्यामुळे तिने मनापासून  देवाचे आभार मानले.

***********
समाप्त.
©️®️प्राजक्ता कुलथे

** मैत्रिणींनो बऱ्याचदा आपलेही असे होते का? सोशल मीडिया हाताळताना, ते एक आभासी जग आहे हे लक्षात ठेवूया. त्यापेक्षा वास्तव फार वेगळे असते. आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी सोशल मीडियाचा वापर गरजेपुरता आणि थोडासा जपूनच करूया.


0

🎭 Series Post

View all