Login

वेळीच आलेलं शहाणपण (भाग:२)

Social Media Reality
वेळीच आलेलं शहाणपण (भाग :2)
जलद लेखन
म्हण : दुरून डोंगर साजरे


सहसा अमोल मेघाला रागवत नसे, त्यामुळे मेघालाही आपल्या वागण्याचे गांभीर्य समजत होते. तीनेही स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याचे ठरवले.
घर कामात, मुलासोबत खेळण्यात, त्याचा अभ्यास घेण्यात  व्यस्त असली तरीही मोबाईलचा वापर काही प्रमाणातच कमी झाला होता.

एकदा अचानक व्हाट्सअपला कॉलेजच्या ग्रुपवर सर्व मैत्रिणींचे भेटण्याचे ठरले. ग्रुपवर दिवसभर मैत्रिणींचा चिवचिवाट चालूच होता. मेघाला सर्व मैत्रिणींमध्ये जाण्यासाठी थोडे दडपण आले होते. कारण नकळत ती स्वतःला आपल्या मैत्रिणींपेक्षा जरा कमी लेखायला लागली होती. पण तिलादेखील मानसिक बदल पाहिजेच होता. त्यामुळे शेवटी हो नाही करत तिने होकार दिला.

त्याच संध्याकाळी मेघा अमोलला म्हणाली, "अहो,आमच्या मैत्रिणींचे येत्या रविवारी भेटण्याचे ठरत आहे. सर्वजणी फार आग्रह करत आहे. मीदेखील होकार दिला आहे."

अमोल हसतच म्हणाला,
"अरे वा.!छानच की तुलाही बदल मिळेल. तू नक्की जा. ते म्हणतात ना जुनं ते सोनं. तुला हे जुन्या मैत्रिणींमध्ये गेल्यावर नक्कीच प्रसन्न वाटेल. मलाही सुट्टी आहे तर मी आनयला सांभाळेल. "

"हो मी देखील तोच विचार केला आणि लगेच होकार दिला.", मेघाही सहमत होत म्हणाली.

अशाप्रकारे मेघा रविवारी छान तयार होऊन आपल्या मैत्रिणींना भेटायला ठरलेल्या ठिकाणी पोहोचली.अनु, तनवी आणि मेघा अशा तीनच मैत्रिणी.
सर्वजणी आपले सुखदुःख भरभरून सांगत होत्या.

मेघा अनुला म्हणाली," तुझी मजा आहे  स्टेटसला तुझे फोटो बघत बसावे.इतक्या वर्षांनीही सुंदर दिसतेस."

यावर अनु उदास हसत म्हणाली, "अगं ते वरवरचे आयुष्य झाले. प्रेम विवाह केला आणि काही महिन्यातच नवऱ्याने नोकरी सोडली. प्रत्येक नोकरीमध्ये काहीतरी चूक शोधतात आणि घरी बसतात. घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना खूप दमछाक होते.
माहेरीही काही सांगू शकत नाही. आई-बाबांच्या समाधानासाठी असेच काही निवडक आणि आनंदी फोटो ठेवावेच लागतात स्टेटसला. नाहीतर उगीचच ताण घेतील."

"हो,बाई सोशल मीडिया म्हणजे खरे आयुष्य नाहीच ग, आता साक्षीचेच बघ ना.. स्टेटसला पाहून वाटते की, किती लांब लांब फिरते ही. पण अगं अपत्यप्राप्तीसाठी वणवण करत  डॉक्टरवाऱ्या करत असते. त्या दिवशी फोन केला तर खूप रडून सांगत होती बिचारी." तन्वीदेखील अनुला दुजोरा देत साक्षीबद्दल सांगू लागली.

त्यातल्या त्यात अनेक मैत्रिणींचे विषय निघाले. कोणी कौटुंबिक हिंसाराचे बळी ठरत होते, एखादीचा नवराच व्यसनी होता, तर एखादीचा जोडीदार संशयी होता. तर काहींना सासुरवास सहन करावा लागत होता. सर्व मैत्रिणी शिक्षित असल्याकारणाने अतिशय बिकट परिस्थितीमधून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहत होत्या. पण सोशल मीडियावर असे जळजळीत वास्तव का म्हणून टाकतील?

हे सर्व ऐकून मेघा अगदीच स्तब्ध झाली होती,चक्रावली होती. कारण स्वतःला कमी लेखत असताना मेघाने मैत्रिणी सोबतचे संभाषण अगदीच कमी केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या वरवरच्या जगाला ती खरे मानत होती.कदाचित तीच तिची फार मोठी चूक ठरली होती. कारण त्यामुळे ती स्वतःकडे काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत नव्हती. त्यामुळे आहे त्यात समाधानी आणि आनंदी न राहता ती सतत छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा चिंता करू लागली होती.