विभा-केदार: अ बॉंड बियॉंड डार्कनेस (अंतिम भाग) (भाग-पाच)

प्रेमकथा निराळी... प्रेमाचा उलगडा करणारी.
वर्तमान-

भूतकाळ सांगून झाल्यावर विभा सखीकडे पाहायला लागली. दरम्यान सखी पाणावलेल्या डोळ्यांनी विभाचे गालगुच्चे घेत म्हणाली, " आई गं! आजी, किती गोड आणि भारी होतीस तू! तुझा हा प्रेमप्रवास मला जाम आवडला. चित्रपटात फक्त नायकच नायिकेच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो पण आजी तू खऱ्या आयुष्यात जगावेगळे काहीतरी केलेस ते सुद्धा त्या काळात. आधी प्रेम केलंस मग आजोबांचं मन जिंकलं आणि जेव्हा त्यांना जास्त गरज होती तेव्हा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलीस नि एवढी वर्षे सुखाचा संसारही केलास. खरंच प्रेम करावं तर तुझ्यासारखं. "

तिचे शब्द ऐकून घसा खाकरत केदार म्हणाले, " अहंम! प्रेम फक्त तुझ्या आजीनेच नव्हे तर मी ही केलं होतं. प्रेमाची परीक्षा तिनेच नव्हे तर मीही दिली होती. आमच्या प्रेमकहाणीची केवळ तुझी आजीच नायिका नसून मीही खराखुरा नायक आहे. मीही मन जिंकलं विभाचं म्हणून फक्त तिचंच कौतुक न करता थोडं माझ्याविषयीही बोल. "

" तुम्ही काय केलं? या पूर्ण प्रेमकहाणीत सर्वाधिक एफर्ट्स तर आजीनेच घेतले ना. " सखी लगेच बोलली.

" हो कारण तुझ्या आजीने फक्त तिच्या दृष्टीने आमची प्रेमकहाणी सांगितली. " केदार म्हणाले.

" म्हणजे? तुम्हीही आजीसारखे अफलातून प्रयत्न केले होते? " सखीने अविश्वासाने विचारले.

" मग काय तर? वक्तृत्व स्पर्धेत ज्या आत्मविश्वासाने तुझ्या आजीने भाषण दिले होते ते पाहून माझ्या अंगावर काटा आला होता आणि मी अक्षरशः साडी नेसून दोन वेण्या घालून असणाऱ्या त्या साध्या, सोज्वळ मुलीवर भाळलो होतो. तुझी आजीच माझ्याकडे एकटक पाहत नसायची तर मीही संधी साधून तिच्याही नकळत तिच्याकडे पाहत राहायचो. तुझी आजी माझा पाठलाग करत असल्याचे मला ठाऊक होते म्हणून मीही मुद्दाम तिला पाठलाग करू द्यायचो आणि महाविद्यालय सुटल्यावर थोडा उशीराच घरी जायचो.

ती आमची पहिली नजरानजर आणि त्यानंतरचा संवाद सहज घडला नव्हता. मी मुद्दाम माझ्या एका मित्राची मदत घेतली होती. त्याने माझ्या विनंतीमुळे हळूच विभाला धक्का दिला आणि मी संधी साधून विभाजवळ गेलो. शिवाय त्यानंतरच्या संवादादरम्यान मी एकटा बडबडत असलो तरी बोबडी माझीही वळली होतीच पण मुद्दाम चेहऱ्यावर कुठलेही हावभाव न दाखवता मी शांतपणे विभाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होतो.

परीक्षेचा अभ्यास आधीच केला होता, पुस्तकेही मी कधीचेच वाचून मोकळे केले होते. एकूण एक मुद्दा ठळकपणे लक्षात होता मला पण तरीही विभासोबत वेळ घालवता यावा म्हणून मी खोटा बहाणा दिला व तिला महत्त्वाचे मुद्दे ऐन परीक्षेच्या वेळी विचारले. शिवाय परीक्षेदरम्यान माझ्याकडे पेन नव्हता असे काही नाही. माझ्याकडे पुष्कळ पेन होते. माझे मित्रही मला देऊ शकले असते पण मी मुद्दाम विभाला मदत मागितली कारण पेन परत करण्याच्या निमित्ताने मला विभाशी मैत्री करता येईल, ही सुप्त योजना त्यामागे होती.

एवढेच नव्हे तर माझा अपघात झाल्यानंतर मी मुद्दाम दुरावा राखला होता कारण मला त्यावेळी सर्वकाही सुचेनासे झाले होते. विभापुढे स्वतःच्या प्रेमाची कबुली देऊन तिच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ करायचा नव्हता म्हणून मी माघार घेतली होती. कळलं? त्यामुळे रोमॅण्टिक फक्त तुझी आजीच नाही, मीही आहे.

प्रेमातला शूरवीरपणा फक्त तुझ्या आजीनेच नव्हे तर मी ही केला होता पण हो, ज्याप्रसंगी ती माझी साथ सोडून जाईल, अशी आशंका मला वाटत होती अगदी त्याप्रसंगीही ती ठामपणे उभी राहिली आणि तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली, हे धाडस फक्त तुझी आजीच करू शकली, हे ही मला मान्य आहे. " केदारने आधी स्वतःच्या प्रयत्नांचा खुलासा केला पण नंतर विभाचे कौतुक करून प्रतिपादनाचा समारोप केला आणि विभाच्या डोळ्यात लगेच आनंदाश्रू जमा झाले.

सर्व ऐकून झाल्यावर सखी तिच्या जागेवरून उठली आणि मोबाईल प्रभारित (चार्ज्ड) झाल्यामुळे मोबाईलचे चार्जर काढून ठेवून ती मोबाईल घेऊन परत आजी-आजोबांजवळ बसली आणि म्हणाली, " आजी-आजोबा, ओव्हरऑल कहाणीतून मला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळला. मला खरंच खूप भारी वाटतंय कारण मला तुमची प्रेमकहाणी आज निवांतपणे ऐकता आली. व्वा! मोबाईल चार्ज होईपर्यंत खूप चांगला विरंगुळा झाला माझा. "

" विरंगुळा म्हणजे? तुला तर समाजशास्त्र विषयाच्या उपक्रमासाठी आमच्या प्रेमकहाणीचा अहवाल लिहायचा होता ना? " विभाने भुवया उंचावत विचारले.

" नाही, मी गंमत केली होती. तुम्ही दोघे टाळाटाळ करत होते मला तुमची प्रेमकहाणी सांगायला आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्याने मला कंटाळा येत होता; म्हणून शक्कल लढवून मी तुम्हाला गंडवलं. सॉरी. " सखीने हसतच कबुली दिली आणि तिचे उत्तर ऐकून केदार हसायला लागले.

केदारला हसताना पाहून विभा तक्रारीच्या सुरात म्हणाली, " अगदी तुमच्यावर गेलीये ही आणि तुम्ही असं हसून तिला आणखी पाठबळ देता. "

" आजी, शांत हो ना. मला माहीत आहे की मी खोटं कारण सांगून तुमची प्रेमकहाणी जाणून घेतली पण त्यामुळे मला शाश्वत प्रेमाचा मतितार्थ कळला ना? " सखी हळूच विभाला बिलगत म्हणाली.

" ह्म्म. ते ही आहेच. " विभा आणि केदार एकत्रच बोलले.

" म्हणूनच मीही ठरवलंय की मी प्रेम करणार. अकरावीत असतानाच तुम्हालाही प्रेम झालं होतं ना. आता तोच आदर्श घेऊन तुमच्या पावलावर पाऊल टाकणार. " थोड्या उत्साही स्वरात सखी उद्घोषणा करत म्हणाली.

तिच्या घोषणेला प्रोत्साहन देत विभा म्हणाली, " अरे व्वा! छान! "

" छान काय? ती काहीही बरळतेय आणि तू तिला साथ देतेय? " केदार वैतागून म्हणाले.

" हो कारण हेच तर वय असतं प्रेम करण्याचं. " विभा गालातल्या गालात हसत म्हणाली.

" पण हल्लीचे तरुण माझ्यासारखे समजुतदार नसतात ना. " केदार पोटतिडकीने म्हणाले.

" तुम्ही आणि समजूतदार? मारा थापा. " विभा हसत म्हणाली आणि तिच्या मताचे खंडन केदार परत करायला लागले. अशाप्रकारे त्या दोघांची मिश्किल खडाजंगी सुरू झाली. सखी मात्र नेहमीप्रमाणे मोबाईल चाळताना आजी-आजोबांच्या आंबटगोड रुसव्याफुगव्यांचा आस्वाद घेऊ लागली.

समाप्त.

🎭 Series Post

View all