विभा-केदार: अ बॉंड बियॉंड डार्कनेस (भाग-चार)

प्रेमाचा मतितार्थ सांगणारी कथा.
केदार बरंच काही बोलला विभाला आणि ती मुळमुळ रडत सगळं ऐकत होती. त्याने तिला अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगितले आणि प्रेम वगैरे थोतांड असल्याचे मत मांडले. विभाचे एकतर्फी प्रेम होते व तिला ते केदारवर लादायचे नव्हते म्हणून ती तिची चूक मान्य करून केदारला प्रत्युत्तर देत नव्हती.

तथापि, बरंच काही बोलून झाल्यानंतर केदार तेथून जाऊ लागला. तेवढ्यात केदारचा एक मित्र अचानक तेथे आला. विभाला रडताना पाहून केदारच्या मित्राने विचारपूस करण्याचा प्रयत्न केला पण केदार खोटे कारण देऊन मित्रासह तेथून निघून गेला. विभा मात्र विखुरल्या गेली होती पण ती अश्रू पुसून घरी गेली. घरी गेल्यावरही ती बराच वेळ स्वतःचा आक्रोश व्यक्त करत राहिली. कालांतराने केदारच्या नकाराला सर्वस्वी मानून ती स्वतःला सावरायला लागली पण तिने केदारवर प्रेम करण्याचा निर्णय मात्र बदलला नाही.

ती पूर्वीप्रमाणेच केदारवर एकतर्फी प्रेम करत होती कुठलीही अपेक्षा न बाळगता पण त्या दिवसानंतर केदारने अबोला घेतला आणि एकप्रकारे दुरावा निर्माण केला. विभाला सर्वकाही कळत होतं पण तिने केदारवर प्रेम करण्यावाचून माघार घेतली नाही. विभाच्या एकतर्फी प्रेम प्रवासादरम्यान आणखी तीन महिने उलटून गेले.

त्याच दरम्यान एके दिवशी विभाच्या वर्गमित्राने सगळ्यांसमक्ष विभाला प्रेमाची कबुली दिली. विभा त्या क्षणी काहीच बोलली नाही पण तिचा निर्णय त्या विद्यार्थ्याला ती एकांतात कळवणार असल्याचे सांगितले. त्या विद्यार्थ्यानेही स्वेच्छेने तिची अट स्विकारली. कालांतराने शिकवणीचे तास झाल्यावर सर्वजण वर्गखोलीबाहेर गेले. खोलीत फक्त विभा आणि तो विद्यार्थीच होता. त्या विद्यार्थ्याने विभाला परत एकदा तिचा निर्णय विचारला त्या क्षणी विभाने स्पष्टपणे नकार दिला.

विभाचा नकार त्या विद्यार्थ्याला पचला नाही व त्याने कारण विचारले. विभाने स्पष्टपणे सांगितले की तिचे केदारवर प्रेम आहे. ते ऐकताच त्या विद्यार्थ्याला प्रचंड राग आला आणि तो त्वेषातच म्हणाला, " त्याच्यासाठी तू मला नकार देतेय? त्या आंधळ्यासाठी? "

" म्हणजे? " विभाचे डोळे विस्फारले.

" हं! तुला सांगितले नाही वाटतं त्याने. थांब मीच सांगतो. केदारचा गेल्या दिवाळीत जो अपघात झाला ना; त्यामुळे त्याला केरटायटीस संसर्गामुळे नीट काहीच दिसत नाहीये. सध्या त्याला अस्पष्ट दिसत आहे पण तीन महिन्यांनी तो पूर्णतः आयुष्यभरासाठी आंधळा होणार आहे. त्याला आता वीणाही वाजवता येणार नाहीये. त्याच्यासारख्या आंधळ्याला कुणी नोकरीही देणार नाही भविष्यात आणि तू त्याच्यासाठी मला नकार देत आहेस? आताही विचार कर नीट आणि तुझा निर्णय बदल. माझ्या प्रेमाला स्विकारलंस तर आयुष्यभर सुखात राहशील. तुझाच नफा आहे यात. " तो विद्यार्थी खुलासा करत म्हणाला.

खरंतर तो खुलासा धक्कादायक होता पण विभाचे प्रेमही तेवढेच कणखर होते म्हणून ती सडेतोड उत्तर देत म्हणाली, " मी प्रेम केलंय केदारवर. प्रेम म्हणजे सौदा वा व्यवहार नव्हे नफा-तोटा पाहायला. तसेच मान्य आहे की मला केदारच्या आंधळेपणाविषयी कल्पना नव्हती पण जो अपघात झाला त्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. मी का त्यांच्यावर प्रेम करणे सोडू? त्यांना भविष्यात वीणा वाजवता येवो अथवा न येवो, त्यांना नोकरी मिळो वा न मिळो पण ते काही ना काही चांगले करणार, ही खात्री मला नक्कीच आहे.

कदाचित जगाकरिता ऐन तारुण्यात आंधळेपणाने ग्रासणे एक कमजोरी वा दोष मानले जात असेल पण मला ती कमजोरी वाटत नाही. मला केदार त्यांच्या गुणदोषांसह आवडतात. मी त्यांना ते जसे आहेत तसे स्विकारले आहे आणि माझ्या प्रेमात तसूभरही फरक पडणार नाही. त्यामुळे कुणावर प्रेम करावे, कुणाच्या प्रेमाचा स्विकार करावा आणि कुणाला नकार द्यावा हे ठरवायला मी समर्थ आहे. माझ्या नकाराने तुझ्या भावना दुखावल्या असतील मला मान्य आहे त्यासाठी मी दिलगीर आहे पण तू यापुढे केदारविषयी विष पसरवणार नाहीस, अशी अपेक्षा करते. "

मोजक्या शब्दात विभाने त्या विद्यार्थ्याला खडेबोल ऐकवले आणि त्यानंतर ती वर्गखोलीबाहेर जाऊ लागली. तेवढ्यात तिला उंबरठ्याबाहेर केदार दिसला. त्याच्या डोळ्यात अश्रू साचले होते त्यावरून त्याने विभा आणि त्या विद्यार्थ्याचे संभाषण ऐकले असल्याचा अंदाज येत होता. त्याचे अश्रू पाहून विभाला त्या क्षणी केदारला घट्ट मिठी मारावीशी वाटली पण त्याच्याकडे पाहूनही काहीही न पाहिल्याप्रमाणे ती तेथून जाऊ लागली.

दरम्यान जड अंतःकरणाने विभाला हाक मारून केदारने थांबवले. ती पाठमोरे वळताच त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या मिठीत बराच वेळ तो रडत राहिला. विभाही त्याच्या पाठीवर सावकाश थोपटून त्याला शांत करू लागली. त्या दरम्यान तो विद्यार्थी मात्र तेथून कधीचाच निघून गेला होता.

तथापि, कालांतराने आक्रोश शांत झाल्यावर केदार विभाला मिठीतून बाहेर काढत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, " तुझे कोणत्या शब्दात आभार मानू, हेच मला कळत नाहीये विभा. विभा, तीन महिन्यांपूर्वी तुझं मन दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. माझंही प्रेम आहेच तुझ्यावर पण माझ्या अपघाताचे परिणाम जाणून घेतल्यावर आपल्या नात्याला आणि प्रेमाला अर्थ राहणार नाही, हा विचार करून मी अबोला घेतला व तुझ्यापासून दूर राहू लागलो. मला वाटलं होतं की तू माझा नकार ऐकल्यावर माझ्यावर प्रेम करणे टाळशील पण तू करतच राहिलीस. मी खरंच खूप दुखावले गं तुला कळत-नकळत अन् एक तू आहेस की माझ्यावर जीवापाड प्रेम करतेय. "

" एखाद्याने आपल्यावर प्रेम करावं हे आपल्या हाती नाही पण आपण कुणावर प्रेम करावं, हे नक्कीच आपल्या हाती असतं म्हणून मी अपेक्षा न बाळगता करत राहिली प्रेम तुमच्यावर. शिवाय जिथे अपेक्षा असते तिथे अपेक्षा भंगण्याची भीती असते पण अपेक्षा नसलेल्या नात्यात ना कशाचीही तमा, ना कशाची भीती. त्यामुळे मी एकतर्फी प्रेम करून समाधानीच होती. " विभाने तिचा दृष्टीकोन मांडला.

" खरंच खूप जगावेगळी आहेस तू आणि अशी व्यक्ती माझ्यावर प्रेम करतेय, हे कळल्यावर आनंद द्विगुणित झाला आहे. " केदार बोलला.

" हे सगळं तर ठीक आहे पण तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही आणि तुम्ही माझ्या प्रेमाचा स्विकार करून आपल्या नात्याला आकार देणार आहात की नाही? " विभाने चाचरत विचारले.

" अर्थातच माझं प्रेम आहे राणी तुझ्यावर. प्रेम नसतं तर हक्काने मिठी मारून तुझ्यापुढे व्यक्त झालो नसतो, रडलो नसतो; त्यामुळे तुझ्या मनातल्या सर्व शंका दूर कर कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुझ्या प्रेमाचा मी स्विकारही केलाय आणि आपल्या नात्याला आकार देण्याचेही मी वचन देतोय. " विभाचा हात हातात घेत केदार बोलला. ते ऐकताच विभाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अशारितीने त्यांचे शाश्वत प्रेम एकरुप झाले. कालांतराने केदारला पूर्णपणे अंधत्व आले पण विभाने साथ निभावली. शिवाय तिने केदारला वीणावादन सोडू दिले नाही. बालपणापासून केदारला वीणावादनाची सवय होती म्हणून अंधत्व येऊनही वीणावादनावर फरक पडला नाही परंतु तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याने एक वर्ष वीणावादनाचे प्रशिक्षण घेतले व प्रयत्न सुरू ठेवले. एकदा वार्षिक स्नेहसंमेलनात केदारचे वीणावादन प्रसिद्ध संगीतकारांनी ऐकले आणि त्यांनी चक्क एका चित्रपटात केदारला वीणावादन करण्याची संधी दिली.

संधीचे सोने करून केदारने उत्कृष्ट वीणावादन केले, तो चित्रपट बराच गाजला आणि केदारची प्रसिद्धीही वाढली. त्यानंतर अविश्वसनीयरित्या त्याची प्रगती दिवसेंदिवस होतच गेली. यशोशिखर गाठताच त्यांनी त्यांचे प्रेमप्रकरण कुटुंबियांना सांगितले. केदारचे कुटुंब आनंदी होते, विभाच्या आईवडिलांचा सुरुवातीला नकार होता पण तो नकारही होकारात बदलायला फार काळ लागला नाही आणि अशारितीने ते दोघे विवाहबद्ध झाले.

भूतकाळ समाप्त.

क्रमशः

🎭 Series Post

View all