विभा-केदार: अ बॉंड बियॉंड डार्कनेस (भाग-एक)

दृष्टी पल्याडचे प्रेम
गेल्या एक तासापासून सखी मोबाईल चाळत बसली होती. एव्हाना मोबाईलची चार्जिंग संपत आली होती; त्यामुळे तिने लगेच मोबाईल चाळणे थांबवले व मोबाईल चार्जिंग करायला ठेवला पण त्यानंतर तिला थोडा कंटाळा येऊ लागला. विरंगुळा करण्यासाठी तिने थोडा वेळ वृत्तपत्र आणि नियतकालिक वाचले पण मोबाईल अद्याप पूर्णपणे प्रभारित (चार्ज्ड) झाला नव्हता.

दरम्यान सखीने मनोमन शक्कल लढवली आणि गूढ हसत तिने सोफ्यावर बसून असलेल्या तिच्या आजी-आजोबांकडे पाहिले व ती मनातल्या मनात म्हणाली, 'मी उगाच काळजी करत होती. हे दोघे सोबतीला असल्यावर माझी करमणूक सहज होईल.'

ती मनातल्या मनात विचार करत होती तेवढ्यातच विभाचे अर्थात सखीच्या आजीचे सखीकडे लक्ष गेले. सखीला गालातल्या गालात हसताना पाहून विभाच्या कपाळावर लगेच आठ्या पसरल्या आणि तिला सखीचे हावभाव जरासे संशयास्पद वाटले; त्यामुळे तिने लगेच केदारच्या पोटाला अर्थात सखीच्या आजोबांच्या पोटाला हळूच कोपराने स्पर्श करत थोडीशी कुजबुज करून सखीकडे पाहण्यासाठी खुणावले. केदारनेही खूण लक्षात घेत सखीकडे पाहत घसा खाकरला.

दरम्यान ते दोघेही एकत्रच आपापल्या हातातील साहित्य बाजूला ठेवून सखीला उद्देशून म्हणाले, " सखी, काय झालं? असा कोणता विचार करतेय? एवढा आनंद कशाचा झालाय? "

" आनंद वगैरे नाही झाला कशाचाच. मी फक्त सहज एक विचार करत होती. " सखी बोलली.

" हो तर कोणता विचार करत होतीस? " केदार आणि विभाने आग्रही स्वरात विचारले.

" हेच की तुम्हा दोघांची प्रेमकहाणी कशी असेल? साठ-सत्तरच्या दशकात जिथे 'वडीलधाऱ्यांची जी पसंत तीच माझी पसंत' या विचारसरणीचा पुरस्कार होत होता त्या काळात तुम्ही दोघांनी चक्क प्रेमविवाह केला. किती विलक्षण आहे हे! शिवाय आजोबांना तर काही दिसतही नाही. अशा व्यक्तीला आपलेसे करायला किती ना धाडस लागले असेल. " सखी आश्चर्य व्यक्त करत म्हणाली.

" त्यात काय धाडस? प्रेम आहे ते, कुणावरही आणि कसंही होऊ शकतं. प्रेमाला बंधनं नसतात मुळी. शिवाय तुझे आजोबा जन्मतः असे नव्हते. " विभाने खुलासा केला.

" काय सांगतेस आजी? खरंच! " सखीने अविश्वासाने विचारले.

" हो मग खरंच बोलतेय मी. " विभा केदारच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाली.

" मग नेमके आजोबांच्या डोळ्यांना काय झाले? आजोबांना अंधत्व कसं आलं? " सखीने काळजीने विचारपूस केली.

" एका अपघातामुळे. " केदार उत्तरले.

" अच्छा! मला सविस्तर सांगा ना सर्व प्लीज. मला खरंच जाणून घ्यायचं आहे. तुम्ही कधीच मला तुमची प्रेमकहाणी सांगितली नाही. कायम विषय टाळता पण आज मी कुठलाही बहाणा ऐकून घेणार नाही. " सखीला एव्हाना आजी-आजोबांच्या प्रेमकहाणीत बराच रस निर्माण झाला होता म्हणून ती हट्ट करत बोलली.

" नाही, नको. नंतर कधीतरी. " विभा केदारकडे पाहत बोलली.

" आजी-आजोबा, प्लीज. खरंतर, मला समाजशास्त्र विषयाला अनुसरून एक सर्वेक्षण करायचं आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक उपक्रम करायला सांगितला आहे आमच्या शिक्षकांनी. " सखी मुद्दाम खोटा बहाणा देत बोलली.

" कशाचे सर्वेक्षण आणि कोणता उपक्रम? " केदारनेही गोंधळूनच विचारले.

" ॲक्च्युली, आम्हाला सगळ्यांना आमच्या आजी-आजोबांच्या प्रेमकहाणीचा एक अहवाल बनवायचा आहे. अर्थात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी प्रेमविवाह केला नसेल याचीही शिक्षकांना खात्री होतीच म्हणून ज्यांच्या आजी-आजोबांनी प्रेमविवाह केलेला नाही त्यांना त्यांच्या आजी-आजोबांचे लग्न झाल्यानंतरची कहाणी जाणून घेत ती कहाणी माहितीच्या स्वरूपात अहवालात नमूद करायची आहे.

आजी-आजोबा, हा उपक्रम माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. शंभर गुण आहेत यावर म्हणून तुम्ही दोघे मला मदत करा. माझा अहवाल सर्वोत्तम करण्यासाठी तुम्ही मला सविस्तर तुमची प्रेमकहाणी सांगा. प्लीऽऽऽज! " सखीने विभा व केदारकडे आर्जवी स्वरात हट्ट केला.

" काय करायचं? " केदारने विभाला विचारले.

" सांगायचं का? " विभानेही केदारलाच प्रतिप्रश्न केला.

" ह्म्म. " केदार आणि विभाने दीर्घ श्वास घेत हुंकार भरला. एकीकडे सखीचे कान टवकारले होते. दुसरीकडे सखीला प्रेमकहाणी सांगताना केदार व विभाचे मन भूतकाळात गुंतले आणि त्यांना भूतकाळात रमलेले पाहून सखीसुद्धा त्या भूतकाळाची कल्पना करायला लागली.

भूतकाळ (इसवी सन सुमारे १९५८)

एक तरुणी तिच्या फौजदार वडीलांच्या सायकलवर बसून एका प्रशस्त महाविद्यालयाच्या प्रांगणात शिरली. सायकलवरून खाली उतरताच तिच्या वडिलांनी तिला नानाविध सूचना द्यायला सुरुवात केली. त्यांना तिने आधी बोलू दिले. त्यांचे बोलून झाल्यावर ती तरुणी तिच्या वडिलांना उद्देशून नम्रपणे म्हणाली, " अण्णा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगितलेलं सर्वकाही माझ्या लक्षात आहे. "

" विभा, तू फार साधी आहेस गं. तुझ्या भोळेपणाचा कुणी फायदा घेईल, ही भीती मला सतत वाटते. एक काम करतो, मीही तुझ्यासोबतच येतो. तू एका फौजदाराची मुलगी आहे म्हटल्यावर तुला कुणी त्रासच देणार नाही. " त्या तरुणीचे अर्थात विभाचे वडील (अण्णा) बोलले पण त्यांची अति काळजी पाहून विभाने उसासा घेतला.

तेवढ्यात तिथे एक इसम आला आणि अण्णांना उद्देशून म्हणाला, " नमस्कार पाटीलसाहेब, काय काम काढलंत? "

" काही नाही, पोरीला घेऊन आलो. तिचा आज महाविद्यालयाचा पहिलाच दिवस आहे ना म्हणून थोडी धाकधूक वाटतेय. " अण्णा विभाकडे काळजीने पाहत उत्तरले.

" एवढंच आहे ना मग कशाला काळजी करता? मी आहे की! मी घेईल तुमच्या लेकीची काळजी. तुमची लेक माझ्या लेकीप्रमाणेच आहे. " तो इसम मंद हसत बोलला.

त्यानंतर त्या इसमाने विभाला औत्युक्याने विचारले, " काय गं? कुठल्या शाखेत प्रवेश घेतला आहे? वाणिज्य, कला की विज्ञान शाखा? "

" कला शाखेत सर. " विभा नम्रपणे बोलली.

" अरे व्वा! छान! याचा अर्थ तू माझीच विद्यार्थिनी आहे. मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, सुभाष भिडे. तू मला भिडे गुरुजी म्हणायचं. आता चल बाळा, मी तुला तुझा वर्ग दाखवतो. " तो इसम अर्थात सुभाष भिडे विभाला मार्गदर्शन करत बोलले.

" हो गुरुजी. " विभाने लगेच दुजोरा दिला. अण्णाही आश्वस्त झाले.

" येतो पाटीलसाहेब. तुम्ही काळजी करू नका. आमच्या महाविद्यालयात तुमची लेक आणि तिचे भविष्य अगदी सुरक्षित आहे. " सुभाष भिडे हसत बोलले.

अण्णांनीही समाधानी चेहऱ्याने लेकीला निरोप दिला. अण्णा जाताच विभा आणि भिडे गुरुजीही महाविद्यालयात दाखल झाले. भिडे गुरुजींनी विभाला सर्व वर्गखोल्या दाखवून त्यांची माहिती दिली. प्राचार्यांचे कार्यालय व शिक्षकांची खोलीही दाखवली. बारीक-सारीक माहिती जाणून घेतल्यानंतर विभाने गुरुजींचा हसतमुखाने निरोप घेतला आणि त्यानंतर ती तिच्या वर्गखोलीत गेली.

पहिला दिवस विद्यार्थी अन् शिक्षकांच्या परिचयात निघून गेला. दुसऱ्या दिवशीपासून अभ्यासाला सुरुवात झाली. सर्व अगदी सुरळीत सुरू होतं. घर ते महाविद्यालय हा प्रवास अत्यंत सुखकर सुरू होता. अभ्यासाचाही कसला ताण नव्हता म्हणून विभा खूष होती अन् असाच एक महिना निघून गेला.
......
वर्तमान-

" कॉलेज सुरू होऊन एक महिना झाला तरीही तुम्ही दोघे एकमेकांना भेटले नाहीत? " सखी एकाएकी बोलली आणि तिच्या आवाजाने विभा आणि केदारची लय भंग पावली.

विभा सखीकडे निक्षून पाहत म्हणाली, " तुला कशाचाही धीर नाहीये ना. लगेच प्रश्न विचारण्याची तळमळ सुरू झाली तुझी. आता कुठे तर सुरुवात आहे आणि तू लगेच... "

विभाचा त्रागा केदारच्या लक्षात आला पण ते तिला शांत करत म्हणाले, " शांत हो. जिज्ञासेमुळे विचारले असेल सखीने. नको चीडचीड करू लगेच. "

" हो आजी, सॉरी अगं. मी खूप उत्सुक आहे ना म्हणून मला माझी जीभ आवरली गेली नाही आणि मी लगेच प्रश्न केला. " सखीने लगेच आपली चूक मान्य केली.

" ह्म्म, बरं पण आता ऐकायचं आहे ना पुढे काय झालं ते? " विभाने नजर रोखून विचारले.

" अर्थातच. " सखी सावरून बसत उत्तरली पण त्यावर विभा सूचक हसली.

क्रमशः


🎭 Series Post

View all