विभा-केदार: अ बॉंड बियॉंड डार्कनेस (भाग-तीन)

ज्योत प्रेमाची... एक आगळीवेगळी कथा... प्रेमाचे गुपित उलगडणारी
केदार विभासह वेगवेगळ्या विषयांवर बोलत होता अन् विभा फक्त उत्तर देत होती म्हणून तो केविलवाण्या स्वरात तिला म्हणाला, " तू खरंच अबोल आहेस की माझ्याशी बोलताना तुला कंटाळा येत आहे? तसे असेल तर सांग मला, मी विनाकारण बरळून तुला त्रास देणार नाही. "

" माफ करा पण तुम्ही गैरसमज करून घेत आहात केदार. मला कंटाळा आलेला नाहीये. उलटपक्षी तुम्ही माझ्याशी बोलत आहात तर मला आनंदच झालाय. " विभा केदारची समजूत काढण्यात एवढी गुंतली की ती नकळत ओघाओघात बरंच काही बोलून गेली.

त्यानंतर तिने जीभ चावली पण केदारला फारसे लक्षात आले नाही म्हणून तो विभाचे शब्द ऐकून प्रत्युत्तर देत बोलला, " थोडक्यात तुला कंटाळा आला नाही माझा, हेच ना! "

" हो. " विभाने खात्रीपूर्वक सांगितले आणि तिचे उत्तर ऐकून केदारच्या ओठांवर स्मितहास्य पसरले.

" ऐकून बरं वाटलं. " केदार म्हणाला. विभा हलकीशी हसली. त्याच दरम्यान ते दोघेही त्यांच्या वर्गखोलीपर्यंत पोहोचले.

ते दोघेही एकत्रच वर्गात शिरले आणि त्यांनी शिक्षकांच्या बाकावर हातातील सर्व साहित्य ठेवले. त्यानंतर विभा तिच्या बाकाकडे जात होती तेवढ्यात केदार तिला हाक मारत म्हणाला, " विभा, मला एक मदत करतेस का? मी दोन महिने महाविद्यालयात येत नव्हतो आणि दररोज यायला लागल्यावरही अधुनमधून वीणावादनाच्या तालीममुळे माझं अभ्यासाकडे दूर्लक्ष झालं. आज त्याच विषयाची परीक्षा आहे ज्या विषयाचा मी नीट अभ्यास करू शकलो नाही गेल्या सहा महिन्यात; त्यामुळे तुला हरकत नसेल तर मला थोडक्यात काही मुद्दे समजावून सांगू शकतेस का तू? "

" हो, चालेल ना. " विभा बोलली आणि लगेच तिच्या पिशवीतून वही काढून केदारला मुद्देसूद ठळक बाबी सांगू लागली.

तिने पंधरा-वीस मिनिटांत संपूर्ण ठळक मुद्द्यांचा केदारला आढावा दिला. तेवढ्यात शिक्षकही आले. त्यानंतर उत्तरपत्रिकांचे वाटप सुरू झाले. सर्वजण परीक्षा देऊ लागले. कालांतराने परीक्षेचा कालावधी संपला. सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे केदार हसतमुखाने वर्गाखोलीबाहेर जाऊ लागला. लगेच विभाने चाचरत केदारला हाक मारली. तिची हाक ऐकून केदार जागीच थांबला व पाठीमागे वळला.

विभा दिसताच मित्रांना पुढे जायला सांगून तो विभाला उद्देशून म्हणाला, " मला हाक दिलीस का? "

" हो, मला विचारायचं होतं की तुम्हाला उत्तरे लिहायला कुठलीही अडचण गेली नाही ना? " विभाने विचारले.

" अगदी सोपे भासले प्रश्न अन् हे तुझ्यामुळे शक्य झालं. खूप खूप आभार तुझे. " केदार कृतार्थ स्वरात म्हणाला.

" आभार नका मानू. एवढी मोठी मदत नाही केली मी. " विभा उत्तरली.

" बरं, तुला श्रेय घ्यायचंच नसेल तर मी काय बोलणार. असो. राहिला हा विषय. " केदार हसत बोलला आणि विभाही थोडीशी हसली. त्यानंतर ते दोघे वर्गाखोलीबाहेर एकत्रच गेले. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी नजरेनेच त्या दोघांनी एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली. पुन्हा एकदा परीक्षेची वेळ झाली.

उउत्तरपत्रिकांचे वाटप सुरू झाले. तेवढ्यात केदार विभाजवळ गेला आणि म्हणाला, " मी सतत तुला त्रास देत असतो आणि तुला मदत मागत असतो पण ह्या क्षणी खरंच मला तुझ्या मदतीची गरज आहे. तुझ्याकडे फाऊंटन पेन आहे का? मी काल रात्री बाबांना हिशेबासाठी दिला होता पण त्यांच्याकडून मी तो पेन परत घेतलाच नाही आणि माझ्या मित्रांकडेही प्रत्येकी एकच पेन आहे; म्हणून या क्षणी तूच माझी मदत करू शकतेस. तुझ्याकडे एक अतिरिक्त फाऊंटन पेन असेल तर मला देतेस का? मला खरंच गरज आहे. "

" एवढी विनंती करायची गरज नाही, मी देते तुम्हाला. माझ्याकडे आहेत तीन-चार फाऊंटन पेन. परवाच अण्णा शहरात गेले होते आणि तेथून घेऊन आले. हे घ्या. खूप छान चालतो हा पेन. कदाचित तुम्ही नेहमी जो पेन वापरता त्यापेक्षा हा वेगळा असेल पण सुटसुटीत अक्षर निघतात. तुम्हाला या पेनचीही सवय होईल. " विभाने तिच्या पिशवीतून एक लहानशी आयताकृती पेटी काढली व त्यातून दोन पेन काढून केदारला दिले.

ते पाहताच तो म्हणाला, " फक्त एकच हवा. "

" हो पण मी दोन देतेय कारण अनावधानाने गरज पडली तर? म्हणून हा एक जवळ ठेवा आणि एका पेनचा वापर करून परीक्षा द्या. " विभा नम्रपणे बोलली.

" आभारी आहे गं. खूप खूप धन्यवाद. " केदार कृतज्ञता व्यक्त करत बोलला.

" आभार नका मानू आणि याक्षणी परीक्षेकडे लक्ष द्या फक्त. " विभा स्मित करत बोलली. केदारनेही दुजोरा दिला व नंतर तो त्याच्या बाकाकडे गेला.

पाहता पाहता परीक्षा सुरूही झाली व परीक्षेचा कालावधीही संपला. उत्तरपत्रिका गुरुजींकडे सोपवल्यानंतर सर्व विद्यार्थी खोलीबाहेर जाऊ लागले. त्यादिवशी केदार स्वतःच विभाची वर्गाखोलीच्या बाहेर वाट पाहत होता. ती येताच मित्रांना पुढे जाण्यास सांगून तो विभाशी संवाद साधू लागला. त्याने पुनश्च तिचे आभार मानले आणि तिने हसून प्रतिक्रिया दिली. कालांतराने ते दोघेही मित्र बनले. परीक्षा आटोपली आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. या काळात विभाला केदारची बरीच आठवण येत होती आणि ती दिनदर्शिकेवर रोज दिनांक न्याहाळताना दिवाळीच्या सुट्ट्या संपण्याची वाट पाहत होती.

अंततः दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. नेहमीप्रमाणे महाविद्यालय सुरू झाले. विभा आणि केदारची मैत्री घनिष्ठ झाली होती व विभाचे केदारप्रती प्रेमही दिवसेंदिवस बळावत होते. ते वर्ष संपले. दुसरे वर्ष सुरू झाले. विभा आनंदी होते एकतर्फी प्रेमातच म्हणून ती केदारशी असणारी मैत्री जीवापाड जपत होती. पाहता पाहता पुन्हा सहा महिने उलटून गेले. सहामाही परीक्षा आटोपल्यावर दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या गेल्या.

त्या सुट्ट्यांदरम्यान तिने सहज तिच्या भावना एका पत्रात मांडल्या पण ते प्रेमपत्र केदारला देण्याचे धाडस ती करू शकत नव्हती म्हणून ते तिने तिच्या एका आवडत्या कादंबरीत ठेवले. दुसरीकडे केदार मात्र त्या सुट्ट्यांदरम्यान वीणावादनाच्या स्पर्धेकरीता आग्रा येथे जाणार होता परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा खूप मोठा अपघात झाला अन् त्या अपघातानंतर त्याचा हसरा चेहरा अगदी नैराश्याने ग्रासला.

केदारच्या अपघाताविषयी अनभिज्ञ विभा तिच्याच धुंदीत होती. कालांतराने दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या व महाविद्यालयाचा नित्यक्रम सुरू झाला. एक आठवडा केदार महाविद्यालयात गेलाच नाही; त्यामुळे विभा फार चिंताग्रस्त होती पण एक आठवड्यानंतर तो गेला. त्याला पाहून विभा खूष झाली व ती त्याची ख्यालीखुशाली विचारू लागली. त्याच दरम्यान तिला त्याच्या अपघाताविषयी कळले. अपघाताविषयी कळताच विभाला अर्थातच दुःख झाले.

तथापि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिने त्याला तिची आवडती कादंबरी वाचायला दिली पण तत्पूर्वी त्यातील प्रेमपत्र काढायला ती विसरून गेली. केदारनेही स्वेच्छेने ती कादंबरी वाचण्यासाठी समर्थन दर्शविले. एका आठवड्यात कादंबरी वाचून ती तिला परत देण्याचे आश्वासन देत तो कादंबरी घरी घेऊन गेला. त्याने एका आठवड्यात ती कादंबरी वाचून काढली पण अनावधानाने त्याला ते पत्र दिसले.

आधी तो ते पत्र वाचणार नव्हता पण नंतर जिज्ञासेमुळे त्याने न राहवून ते पत्र वाचले. विभाच्या भावना कळताच केदार आश्चर्यचकित झाला आणि दिर्घ श्वास घेत तो त्याच्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने शिकवणी आटोपताच, सर्व विद्यार्थी व वर्गशिक्षक वर्गखोलीच्या बाहेर गेल्यावर विभाला अगोदर कादंबरी दिली. एव्हाना विभाला कळून चुकले होते की तिने ते पत्र कादंबरीतून बाहेर काढले नव्हते म्हणून केदारने कादंबरी देताच ती कादंबरी चाळून पत्राची शोधाशोध करू लागली.

अंततः तिने वैतागून डोकं पकडून घेतल्यावर केदारने तिच्यापुढे ते पत्र धरले. त्याच्या हातात ते पत्र पाहून विभाने मात्र भीतीने आवंढा गिळला. विभाने धाडस करून केदारची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण केदारने तिला बोलण्याची संधी दिली नाही व तो तिच्यावर भलताच बरसला.

क्रमशः


🎭 Series Post

View all