विभा-केदार: अ बॉंड बियॉंड डार्कनेस (भाग-दोन)

अनंत प्रेमाची प्रेमकथा
विभा लगेच सखीची समजूत काढत म्हणाली, " तुला आमची प्रेमकहाणी जाणून घ्यायची आहे ना तर प्रश्न कमी विचार आणि आधी सगळं ऐकून घे, समजून घे व सर्वकाही जाणून घेतल्यानंतर वाटल्यास हवे तेवढे प्रश्न विचार पण आता मध्येच काही बोलू नकोस कारण एकदा तंद्री भंगली की परत त्याच लयीत, त्याच उत्सुकतेने सगळं सांगायला अडचण होते. "

" बरं आजी. " सखीने लगेच होकार दिला. त्यानंतर परत केदार आणि विभा गतकाळातील सुवर्ण आठवणीत रमले आणि सखी आजी-आजोबांचा भूतकाळ ऐकतच त्यांची प्रेमकहाणी तिच्या परीने तिच्या कल्पनेत रंगवायला लागली.

भूतकाळ-

विभाच्या महाविद्यालयीन शिक्षणाला सुरुवात होऊन साधारण एक महिना झाला होता. पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिन होता; त्यामुळे स्वातंत्र्य दिनाची महाविद्यालयात जय्यत तयारी सुरू होती. विभानेही स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. पाहता पाहता स्वातंत्र्य दिनही उजाडला. वक्तृत्व स्पर्धेत विभाने स्वतःची छान छाप पाडली होती. दरम्यान सर्व बारीकसारीक स्पर्धा आटोपल्यावर कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी एका तरुणाला मंचावर आमंत्रित केले गेले.

तो तरुण त्याच्यासोबत एक वीणा घेऊन मंचावर हजर झाला. त्यानंतर सर्व मान्यवरांना अभिवादन करून त्या तरुणाने केवळ वीणाचे तार छेडून उपस्थितांना 'नया दौर' चित्रपटातील 'ये देश है वीर जवानों का' हे गीत ऐकवले. कुणीही गात नव्हते त्यादिवशी पण ती वीणाच फार बोलकी झाल होती कारण तो तरुण अगदी तल्लीन होऊन ती वीणा वाजवत होता आणि विभा अगदी भान हरपून ते संगीत ऐकत होती. काही वेळाने ते गीत संपले आणि संगीतही थांबले व टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

केवळ विभाच नव्हे तर सर्व मान्यवर आणि इतर प्रेक्षकही त्या तरुणाच्या संगीताला, त्याच्या कौशल्याला दाद देत होते. विभा तर अगदी त्या तरुणाचे संगीत ऐकताच कळत-नकळत त्याच्या प्रेमात पडली. हळूहळू टाळ्यांचा कडकडाट कमी होत आला होता पण ती मात्र उत्साहाने टाळ्या वाजवत होती. तेवढ्यात तिच्या मैत्रिणीने तिला हळूच कोपर मारून भानावर आणले. भानावर येताच विभाने टाळ्या वाजविणे थांबवले.

त्याच दरम्यान तिचे लक्ष तिच्यापेक्षा वरीष्ठ वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या संवादाकडे गेले आणि ती निमूटपणे त्यांचे शब्द ऐकायला लागली. एक विद्यार्थिनी म्हणाली, " हा किती सुंदर वीणा वाजवतो. "

" हो मग शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास आहे त्याला. त्याच्या आजोबांकडूनच त्याला ही देणगी लाभली आहे, असे म्हणता येईल. " दुसरी विद्यार्थिनी दुजोरा देत बोलली.

" आचार्य चिंतामणी केळकरांचा वरदहस्त लाभलेला नातू तल्लख तर असणारंच. " आणखी एक विद्यार्थिनी बोलली.

विभा त्यांचा संवाद ऐकत होती. दरम्यान ती थोडासा अंदाज घेऊन किंचित चाचरत त्या विद्यार्थिनींना म्हणाली, " ताई, त्यांचे नाव काय आहे? "

" अगं तू ओळखत नाहीस का त्याला? तुझ्याच वर्गात आहे तो. " एक विद्यार्थिनी उत्तरली.

" पण मी त्यांना आजपर्यंत कधी वर्गात पाहिलेच नाही. " विभा परत त्या तरुणाकडे पाहून विद्यार्थिनीला उद्देशून बोलली.

" अरे हो, बरोबर आहे. तो सहसा वेगवेगळ्या स्पर्धेत व्यग्र असतो. गेली दोन महिने तो ग्वाल्हेरला गेला होता म्हणून नियमित येत नव्हता असेल पण उद्यापासून तो नक्की येईल. " ती विद्यार्थिनी बोलली.

" बरं पण ताई त्यांचे नाव? " विभाने परत मूळ प्रश्न विचारला.

" केदार केळकर. " ती विद्यार्थिनी बोलली आणि नंतर परत त्या दोघी-तिघी आपापल्या संवादात रममाण झाल्या.

दुसरीकडे त्या क्षणापर्यंत विभाला केवळ त्या तरुणाच्या संगीताने भुरळ पाडली होती पण त्याचं नाव ऐकल्यावर ती नावावरही भाळली. कालांतराने कार्यक्रम संपला, सर्वजण आपापल्या घरी जाऊ लागले पण विभाची नजर मात्र केदारवरच खिळली होती. तिच्याही नकळत ती त्याच्यात एवढी गुंतली की महाविद्यालय सुटल्यानंतर ती घरी न जाता त्याचा पाठलाग करायला लागली. ठराविक अंतर राखून ती चोरून-लपून त्याच्या प्रत्येक हालचाली बारकाईने टिपत होती. तो त्याच्या घरात शिरताच विभा माघारी परतली पण त्या दिवसानंतर हा तिचा नित्यक्रमच झाला.

ती त्याला कळू न देता रोज त्याचा पाठलाग करायची. वर्गात तिचे शिक्षकांकडे कमी आणि केदारकडेच लक्ष असायचे. अर्थात तिने तिच्या अभ्यासावर परिणाम घडू दिला नाही. रात्री जागरण करून ती तिचा अभ्यासही पूर्ण करायची पण दिवसभर मात्र त्याच्याच विचारात हरवलेली असायची. हे सुमारे तीन महिने घडत राहिले. कालांतराने सहामाही परीक्षेचे दिवस आले. परीक्षेचा पहिला दिवस होता. विभाला भिडे गुरुजींनी उत्तरपत्रिकांचा एक ढीग आणि काही पुस्तके तिच्या वर्गखोलीत घेऊन जायला सांगितले.

भिडे गुरुजींची आज्ञा पाळून विभा तो गठ्ठा घेऊन वर्गखोलीच्या दिशेने जात होती आणि तेवढ्यात एका विद्यार्थ्याचा तिला धक्का लागला व तिचा तोल जाऊ लागला. ती पूर्ण साहित्यासह खाली पडणार होती पण त्याचक्षणी तिच्या हाताला एक स्पर्श झाला. तिला त्या व्यक्तीचे फक्त डोळे दिसत होते. दुसरीकडे त्या व्यक्तीने विभाला नीट सांभाळले व ती स्थिरस्थावर झाल्यावर अर्धे साहित्य त्याने स्वतःच्या हाती घेतले.

" धन्यवाद माझी मदत केल्याबद्दल. " साहित्य कमी होताच विभाने सुटकेचा श्वास घेतला व त्या व्यक्तीचे आभार मानत ती त्याच्याकडे पाहायला लागली पण त्या व्यक्तीला पाहताच ती अगदी डोळे विस्फारून पाहतच राहिली कारण ती व्यक्ती खुद्द केदार होता.

तेवढ्यात केदार म्हणाला, " आभार काय मानायचे त्यात. फार काही मदत केली नाही मी. "

त्याचा आवाज ऐकताच विभाची तंद्री भंग पावली आणि पापण्यांची उघडझाप करून तिने हलकेच हसून हुंकार भरला. त्यानंतर ते दोघे एकत्रच वर्गखोलीकडे जाऊ लागले. विभा चोरून-लपून त्याच्याकडे पाहत होती पण काहीच बोलत नव्हती. तेवढ्यात केदारच विभाला उद्देशून म्हणाला, " स्वातंत्र्य दिनाला फार उत्कृष्ट भाषण दिले होतेस तू. "

" धन्यवाद. तुम्हीही खूप सुंदर वीणावादन केले होते. " विभा लगेच बोलली.

" तू ऐकले होते? " केदारने उत्सुकतेने विचारले.

" अर्थातच. म्हणूनच तुमच्या संगीताची स्तुती करतेय ना. " विभा बोलली.

" हल्ली काही जण न ऐकता समीक्षण करतात ना सांगोवांगी गोष्टी ऐकून; त्यामुळे खात्री करण्यासाठी विचारले. " केदार स्पष्टीकरण देत बोलला.

" असेही करतात लोक? " विभाला नवलच वाटले.

" हो ना पण असो तो विषय. मला सांग, तुला खरंच कसे वाटले माझे वीणावादन? मी नीट वाजवले होते ना? " केदार मैत्रीपूर्ण व्यवहार करत विभाला विचारपूस करू लागला.

" मला खरंतर शास्त्रीय संगीताविषयी फारशी माहिती नाही पण खरंच तुम्ही ज्या देशभक्तीपर गीताचे सूर छेडले ते अगदी माझ्या आठवणीत आणि हृदयात स्पष्ट छापले गेले आहे, याचा अर्थ तुम्ही खरंच कौशल्यपूर्ण वीणावादक आहात. " विभाने तर्कशुद्ध वक्तव्य मांडले.

" तू फार लालित्यपूर्ण भाषा वापरून बोलतेस. वक्तृत्व स्पर्धेत स्वतःचे मत मांडताना तू जे भाषासौंदर्य वापरलेस ते मला विशेष भावले. " केदारनेही विभाची स्तुती केली.

" धन्यवाद. " विभाने मंद हसून प्रतिसाद दिला.

" आपण दोघे एकाच वर्गात आहोत ना? " केदार विभाकडे पाहत म्हणाला.

" हो. " विभा उत्तरली.

" मग मला नावानेच हाक मार ना आणि माझ्याशी आदरार्थी न बोलता समवयस्क व्यक्तीप्रमाणे बोल. " केदार बोलला.

" आपण एकाच वर्गात असलो तरी तुमची प्रतिभा पाहता तुमच्याशी साधारणपणे बोलणे मला वावगे वाटत नाही. मला खरंच तुमचा आदर आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या शब्दातूनही आदर देतेय. " विभा नम्रपणे म्हणाली.

" एकाच वर्गात असूनही हे तुझं असं मला आदर देणं, थोडं विचित्र आहे पण तुझ्या इच्छेचा मी मान राखतो. " केदार विभाच्या मताचा आदर राखत बोलला.

" धन्यवाद. " विभा म्हणाली आणि परत शांत झाली.

क्रमशः

🎭 Series Post

View all