प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक- विभक्त:एक गुन्हा? भाग-१
" काय गं तू ऐकलस का ? आपल्या बिल्डिंगमध्ये त्या तिसऱ्या फ्लोअरवर एक नवीन बाई राहायला आली आहे." सुधाने बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीला विचारलं.
" हो ऐकलं आहे, पण कशाला तिला राहण्यासाठी जागा द्यायची? मला तेच समजत नाही कित्येक भाडोत्री असेच मिळतात ना ?" ती सुद्धा नाक मुरडत म्हणाली.
" हो ना आणि तिचं काम म्हणे रात्रीचं असतं." सुधार म्हणाली
" हो ना आणि तिची मुलगी सुद्धा आहे त्यात तिच्या नवऱ्याबद्दल काही विचारलं तर ती काही सांगतच नाही, असे मी ऐकले आहे.
" बापरे ! त्या मुलीचे वडील काय बाहेर राहतात की काय?" तिने विचारले.
"आता ते मात्र ज्यांच्या मालकीचे घर आहे त्या मालकांनाच विचारायला हवे. मी तर आता सोसायटीची मीटिंगमध्ये बोलणारच आहे. कोणालाही कसे काय तुम्ही भाड्याने घर देता?" चिडूनच सुधा म्हणाली.
कृष्णाई हिने तिच्या आपल्या एका फ्लॅटमध्ये भाडोत्री ठेवलेला होता. ती भाडोत्री म्हणजे एक स्त्री आणि तिच्या सोबत राहणारी तिची सात ते आठ वर्षाची मुलगी. जसे बॅचलर मुलांना भाड्याने जागा मिळणे मुश्किल असते, तसेच एकट्या स्त्रीला सुद्धा भाड्याने घर मिळणे मुश्किल असते. त्यात सुद्धा तिच्यावर खूप बंधने असतात. अवेळी कोणी अनोळखी पुरुष जर तिच्या घरी आला तर सगळेजण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागतात. त्यात स्त्रियांना अशा एकट्या राहणाऱ्या बायकांबद्दल खूप माहिती हवी असायची.
सोसायटीची मीटिंग रविवारी ठरवलेली होती आणि त्याच्यामध्ये कृष्णाईला सुद्धा बोलवलेलं होतं, कारण त्यांचा फ्लॅट हा त्यांनी भाड्याने दिलेला होता. तसेच खूप जणांना ती कुठेच दिसत नाही, म्हणून स्वतःच्याच मनाने तर्क लावायला सुरुवात केली होती.
" हे बघा ताई, मला रविवारी मिटींगला येता येणार नाही आणि जर खरंच तुम्हाला त्रास होत असेल तर मी खोली खाली करायला तयार आहे." नम्रता म्हणाली.
" ताई, तुम्ही उगाच काळजी करू नका. तुम्ही जे काही सर्व आहे ते मला सांगितले आहे आणि तसेच इथल्या लोकांना असल्या गोष्टींमध्ये जरा जास्तच रस असतो. सर्व सांगून सुद्धा जर ते असं काही बोलणार असतील तर मला काय बोलावे हे समजत नाही." कृष्णाईही नम्रताला समजावत म्हणाली.
" हो ताई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काही चुकीचं करत नाही आहात तर त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही." कृष्णाईचा नवरा सुद्धा म्हणाला.
" तुम्ही बघा ना, असले कोणाला पण भाड्याने आपली खोली देत आहेत, त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होईल? एक तर ती बाई कधी कोणात मिळून मिसळून राहत नाही. मला तर ती खूपच गूढ वाटते." सुधा सेक्रेटरीच्या बायकोजवळ येऊन बोलत होती.
" पण नक्की तुम्ही म्हणता ते खरं आहे ना? कारण मी तर कृष्णाई ताईंना ओळखते. त्या तर कधी असं करणारच नाहीत, एकतर त्या सर्वांना मदत करणाऱ्या आहेत. तसेच पैशासाठी त्या उगाच असल्या लोकांना भाडोत्री म्हणून ठेवणार नाहीत, असे मला तरी वाटते." सेक्रेटरीची बायको म्हणाली.
" मी सुद्धा सगळ्यांच्या भल्यासाठीच सांगत आहे ताई. उद्या उठसूट कोणी सुद्धा भाड्याने खोली देईल आणि मग जर उद्या त्याचे वाईट परिणाम आपल्या मुलांवर होणार असतील तर कसे होणार?" सुधा खुप काळजी आहे असे सांगत म्हणाली.
" मी तर माझ्या मुलगीला त्यांच्या मुली सोबत खेळायला सुद्धा पाठवत नाही." लगेच सुधाची मैत्रीण तिच्यासोबत आलेली ती म्हणाली.
सेक्रेटरी असलेले कदम साहेब आत मधून सर्व ऐकत होते.
खरंतर हा मीटिंगचा विषय नव्हता, पण तरीसुद्धा जे काही असेल ते खरे समोर असेल असे म्हणून कृष्णाईच्या नवऱ्याने सुद्धा मिटींगला हजर राहण्यासाठी आलेल्या पत्रकावरती सही केली.
" अहो, तुम्हाला काय वाटतं खरंच नम्रताला खोली खाली करावी लागेल का? " तिने आपल्या नवऱ्याकडे बघत रात्री विचारले कारण दुसऱ्या दिवशी बिल्डिंगमध्ये मीटिंग होणार होती.
" हे बघ कृष्णा, आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो. आपल्याला त्या बाईमध्ये काहीच वाईट वाटत नाही, पण जर कोणी काही बघितलं असेल तर ते उद्या आपल्याला समजेलच आणि तसे पण आपण इथे कायमचे राहणार आहोत. त्यामुळे आपल्याला सोसायटीच्या निर्णयाच्या विरुद्ध जाता येणार नाही. कारण आपण एका समाजात राहतो आणि सोसायटी सुद्धा त्या समाजातच येते, त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस." त्यांनी आपल्या बायकोला समजून सांगितले.
" तरीसुद्धा मी माझ्या परीने तिला या खोलीमध्ये राहण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते नक्कीच करेन." कृष्णाई ठामपणे म्हणाले.
"त्यासाठी तुला कोणी रोखणार सुद्धा नाही आहे." कृष्णाईचे पती हसूनच बोलले.
क्रमशः
काय होईल उद्याच्या मीटिंगमध्ये?
© विद्या कुंभार
१३/१०/२०२५
१३/१०/२०२५
कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा