Login

विधवा - एक नवा प्रवास. भाग - ३ (अंतिम भाग)

विधवा - एक नवा प्रवास
विधवा - एक नवा प्रवास. भाग - ३

रात्री झोपताना तिने समीरचा फोटो घेतला आणि हसून त्याच्यासोबत बोलू लागली.
"बघा ना समीर… मी पुढे चाललेय, पण आज हे बघायला तुम्ही नाही आहात, खरं तर तुमच्यामुळेच मला हे करण्याची जिद्द मनात आली. मी तुमची डायरी वाचली आणि मला तुमच्या भावना समजल्या." संध्या बोलली आणि तसाच समीरचा फोटो कवटाळून बसली आणि आता आजिबात थांबायचं नाही असा तिने निश्चय केला.

चार महिन्यांनंतर संध्याने एक लहान जागा भाड्याने घेतली आणि त्या जागेला नाव दिलं "सूर्योदय स्त्री केंद्र".

पहिल्या दिवशी पाच विधवा महिला होत्या. महिनाभरात पंधरा. नंतर तीस. अशा प्रकारे महिलांची संख्या वाढत गेली. मग तिने विविध कोर्सेस चालू केले

शिवणकाम, सौंदर्यप्रसाधन प्रशिक्षण, इंग्रजी संभाषण, कायद्याचं प्राथमिक मार्गदर्शन अजून बऱ्याच गोष्टींचं शिक्षण तिने महिलांना दिलं.
काही महिन्यांत महिलांनी लघुउद्योग सुरू केले. हातमाग, भाजीपाला विक्री, सिलाई सेंटर.

संध्या आता फक्त शिकवत नव्हती, ती आशा पेरत होती आणि अनेक महिलांचा आधार बनत होती.

सुरुवातीला गावातल्या लोकांना ही गोष्ट खटकायला लागली आणि तिच्याबद्दल काही पण बोलायला लागले.
"एक विधवा असं पुढे जाऊन काम करते हे चुकीचं आहे!"
"कदाचित तिला दुसरं लग्न करायचं असेल. म्हणून ती असं करतेय." असे लोकं बोलायचे. पण संध्याने दुर्लक्ष केलं.

मात्र काही महिन्यांत, स्थानिक वृत्तपत्रात तिच्या कामावर लेख आला... "संध्या देशमुख " साक्षरतेपासून स्वयंपूर्णतेपर्यंतचा प्रवास." तो लेख वाचून लोकांचं तिच्याविषयी मत परीवर्तन होऊ लागले आणि लोकांच्या नजरा बदलू लागल्या.

सासुबाईंना सुद्धा संध्याचा अभिमान वाटू लागला. एक दिवस तिच्या सासूबाई स्वतःच केंद्रात आल्या. त्यांना तिथे बघून संध्या क्षणभर अचंबित झाली. मग तिनेच बोलायला सुरुवात केली.

"तुम्ही आता इथे कसं काय आलात?" संध्याने घाबरतच विचारले.

"मला माफ कर संध्या, मी तुझ्या विषयी खुप चुकीचे बोलले!" सासुबाई म्हणाल्या.

"तुम्ही माफी नका मागू, तुम्ही मोठ्या आहात!" संध्या.

"हो पण आमचे विचार मात्र लहान होते, आम्हाला वाटलं तू आपलं नाव खाली आणशील… पण तू आमची मान वर केलीस. सगळा गाव अभिमानाने तुझ्याविषयी बोलतोय. हे बघून खरंच खूप छान वाटतंय." सासुबाई म्हणाल्या तेव्हा संध्याला खूप आनंद झाला.

त्या दिवशी संध्या पुन्हा एकदा रडली पण हे अश्रू सन्मानाचे होते. तिच्या कर्तव्याचे होते आणि तिचं होत असलेल्या कौतुकाचे होते.

काही दिवसांनी संध्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला  "महिला उत्थान (विकास) पुरस्कार" तो पुरस्कार भेटताना तिला भाषण करायला सांगितले. तेव्हा ती सुद्धा अभिमानाने भाषण करू लागली.

"मी संध्या समीर देशमुख, मी विधवा आहे. आणि हो, मी आजही पांढरी साडी घालते. पण आज ती दुःखाची नाही वाटत तर ती माझ्या आत्मसन्मानाची आहे. जेव्हा आयुष्य उजाड वाटतं, तेव्हा आपल्याला कोणीच हात द्यायला येत नाही… आपणच स्वतःला हात द्यावा लागतो.

विधवा होणं हे काही अपमानाचं नाही… ते आपलं नशीब आहे. पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आज मला अभिमान आहे की मी पुन्हा सूर्योदय पाहिलाय आणि तो माझा एकटीचा नाही तर माझ्या आणि अनेक स्त्रियांच्या आयुष्यातला." तिच्या भाषणावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

संध्या अजूनही कोणाच्या आधाराशिवाय एकटीच राहते. पण तरीही तिला एकटं वाटत नाही. तिच्या आजूबाजूला आशेचे, प्रेरणेचे, उभारीचे असंख्य चेहरे आहेत.

ती रोज समीरचा फोटो हातात घेते आणि म्हणते,
"तुम्ही गेलास, पण माझं आयुष्य थांबलं नाही. याला कारण तुम्ही माझी प्रेरणा आहात, तुम्ही अजूनही माझ्या आठवणीत आहात आणि त्याच आठवणीने मला जगण्याची प्रेरणा मिळते.

समाप्त....

🎭 Series Post

View all