Login

विधवा : एक प्रेरणादायी स्त्री (भाग१)

ही कथा आहे एका अशा विधवा स्त्रीची, जी आत्मविश्वासाने स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी उभी राहते. गावात आल्यानंतर अगदी तीनच दिवसांत 'विधवा एक कलंक असते' असं मानणाऱ्या लोकांच्या मनातील कलुषित विचार नष्ट करते. तिलाही समाजात ताठ मानेने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे पटवून देते. सौ. जानकी नारायण कटक लिखित तिने केलेल्या समाज परिवर्तनाची ही 'विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.' कथा नक्की वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.


                           एक असं गाव जिथे विधवा स्त्रियांना कलंकित मानलं जात होतं. गावातील सरपंचांनी ज्या बायका विधवा होतील त्यांना गावातून बाहेर हाकलून द्यायचं, असे नियम बनवले होते. एकही विधवा स्त्री गावात दिसत नव्हती. असं मानलं जायचं की जर विधवा स्त्री या गावात राहिली, तर गावात काहीतरी अघटीत घडतंच. गाव तसं छोटंच होतं, त्यामुळे तिथे ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं. तिथे सभा, बैठकी व्हायच्या त्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली.

काही महिन्यांपूर्वी विधवा गावासाठी अपशकुनी आहे अशी अंधश्रद्धा पसरवून एक व्यक्ती अचानक गावातून गायब झाली होती. ती व्यक्ती गायब होण्याच्या एक दिवसाआधीच गावातील एक स्त्री विधवा झाली होती. गावातील लोकांनी या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडला आणि खरंच विधवा स्त्री आपल्या गावासाठी अपशकुनी आहे ही अंधश्रद्धा गडद झाली.

अशातच यापासून अनभिज्ञ असलेली एक विधवा स्त्री आपल्या दोन मुलांना घेऊन या गावात आली. आता ती गावात आल्यानंतर काय घडणार ते पाहूयात... 


**************************


'टकटक... टकटक...!'

दरवाजावर कोणीतरी टकटक केली, तशा आत काम करत असलेल्या ६५ वर्षीय कमला मावशी साडीला हात पुसत दरवाजा उघडण्यासाठी आल्या. त्यांनी दरवाजा उघडला तर एक अनोळखी स्त्री दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित पाहून कमला मावशींच्या चेहऱ्यावरही हसू उमललं.

"कोण पाहिजेत? मी तुम्हाला ओळखलं नाही." कमला मावशींनी हसून विचारलं.

"मी सुधा महादेव शास्त्री, आजच या चाळीमध्ये राहायला आले आहे. ती पलीकडची तीन नंबरची खोली माझी आहे." सुधाने आपली ओळख दिली.

"मी कमला, मला चाळीतले लोक मावशी म्हणतात. तूही मावशी म्हणू शकतेस. तुला काही हवं होतं का?" कमला मावशींनी सुधाच्या हातात असलेली वाटी पाहून विचारलं.

सुधा वयाने त्यांच्यापेक्षा लहान होती, तर त्या जशा इतरांशी बोलत होत्या तशा तिच्याशीही बोलत होत्या.

"हो मावशी, आम्ही आजच इथे राहायला आलो आहोत. मुलांना भूक लागली होती तर म्हटलं त्यांच्यासाठी थोडासा शिरा करून द्यावा. सामानात असलेली साखरेची पिशवी उघडायला गेले तर चुकून पिशवी फाटली. सगळी साखर जमिनीवर सांडली. अजून खोलीची साफसफाई केलेली नाही. फक्त झाडून घेतलं आहे, तरीही खाली फरशीवर थोडीफार धूळ आहेच, त्यामुळे ती साखर उचलावीशी वाटली नाही. आधी दोघांना खायला द्यावं आणि नंतर साफसफाई करावी असा विचार करत होते, पण झालं भलतंच. "

" इथे जवळपास कुठे किराणा दुकान दिसत नाही. उद्या गावात जाऊन घेऊन आले असते. तोपर्यंत म्हटलं शेजारी कोणाकडून तरी थोडी साखर घ्यावी. मधल्या दोन खोल्यांना टाळा लावलेला दिसत आहे. बहुतेक ते घरी नाहीत. तुमच्या खोलीचा दरवाजा आतून लावलेला दिसला म्हणून इथेच आले. थोडी साखर देता का मावशी? जेव्हा मी किराणा भरेन तेव्हा तुम्हाला माघारी करेन. " सुधाने सगळं सविस्तर सांगितलं.

तिला साखर मागायला कसंतरी वाटत होतं, पण मुलांसाठी तिला घ्यावी लागणार होती.

"हो गं, दुकान इथून थोडं लांबच आहे. पंधरा-वीस मिनिटं लागतात बघ जायला. आण इकडे ती वाटी." असं म्हणत कमला मावशींनी सुधाच्या हातातून वाटी घेतली.

"तू आत ये ना तोपर्यंत." कमला मावशींनी तिला आत यायला सांगितलं.

तीही त्यांच्या पाठोपाठ खोलीत गेली. चाळीतील सगळ्याच खोल्या एकसारख्या होत्या. ती येऊन दरवाजाजवळ असलेल्या खुर्चीवर बसली. समोर एक पलंग होता आणि त्यावर एक वृद्ध पुरुष झोपलेले होते. बहुतेक मावशीचे पती असावेत असा तिने विचार केला. दोन मिनिटांत कमला मावशी साखरेने भरलेली वाटी घेऊन तिच्याजवळ आल्या.

"आम्ही दोघेच इथे राहत आहोत बघ. मुलगा बाहेरगावी असतो, पण येतो शनिवार-रविवार दोन दिवस. तेवढंच आम्हालाही बरं वाटतं. बरं, तुमच्या घरी कोण कोण असतं?" कमला मावशींनी शेजारी असल्यामुळे आपल्याबद्दलही सांगितलं आणि तिच्याबद्दलही विचारलं.

"मी आणि माझी दोन मुले. मोठा १६ वर्षांचा आहे तर छोटा १२ वर्षांचा आहे." सुधाने तिच्या मुलांबद्दल सांगितलं.

"वय किती तुझं?" साधारण बायकांना जशी एकमेकींचं वय जाणून घेण्याची उत्सुकता असते, त्याच उत्सुकतेने कमला मावशींनीही विचारणा केली.

"५०." तिनेही आढेवेढे न घेता आपलं वय सांगितलं, पण तिचं वय पाहता कमला मावशींना तिची मुले खूपच लहान वाटली.

"मुले खूप लहान वाटत आहेत मग तुझी."

कमला मावशींच्या काळात स्त्रियांची लवकर लग्न होत होती आणि मुलंही लवकर होत होती, त्यामुळे त्यांचे जुने विचार त्यांना सुधाबद्दल विचार करायला भाग पाडत होते.

"माझं लग्न लवकर झालं होतं, पण मला मुले उशिरा झाली." सुधाने हसू कायम ठेवत उत्तर दिलं.

"आणि नवरा?" त्यांनी जसं विचारलं तसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. ती खाली मान घालून तिच्या विचारात गुंग झाली.

'नवरा! काय सांगू मी माझ्या नवऱ्याबद्दल?'

सुधा ५० वर्षीय शिक्षित महिला होती. तिची दोन मुले होती. मोठा अजय आणि छोटा विजय. मागील कित्येक वर्षांपासून तिने तिच्या मुलांना शिकवण्याचं ध्येय आणि आपल्या संसार गाड्याची जबाबदारी एकटीने उचलली होती.

नेहमीप्रमाणे नवऱ्याबद्दल निघालेला प्रश्न ऐकून तिचं हृदय पिळवटून निघालं. ती मनातल्या मनात खिन्नपणे आपल्या नशिबावर हसली. ती तिच्या नशिबावर हसत होती, तर कमला मावशींच्या डोक्यात वेगळेच प्रश्न तयार व्हायला लागले होते.

'नवऱ्याने टाकली की काय हिला? की मग खोटं सांगत आहे? खरंच हिचं लग्न झालेलं आहे ना? हिच्याकडे पाहून तसं काही वाटत नाही. लग्न झालेलं असतं तर गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, हातात बांगड्या दिसल्या असत्या, पण हिच्या अंगावर तर तसं काहीच दिसत नाही.'

कमला मावशी मनातल्या मनात आपले तर्क-वितर्क जोडत होत्या, ज्यापासून सुधा अनभिज्ञ होती. दोन मिनिटे झाली तरी तिने काही सांगितलं नव्हतं, म्हणून त्यांनी तिला आवाज दिला.

"काय झालं गं? बरी आहेस ना?" कमला मावशींनी तिला विचारात गुंग झालेली पाहून विचारलं. त्यांच्या आवाजाने ती भानावर आली.

"काही नाही मावशी. येते मी." असं म्हणत ती जाण्यासाठी उठली. कमला मावशींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी तिला आवाज देऊन थांबवलं.

"अगं सुधा, तू सांगितलं नाहीस तुझ्या नवऱ्याबद्दल." त्यांनी तिला थांबवून विचारलं. त्यांचा तोच प्रश्न ऐकून ती जागीच थबकली.

"माझे पती माझा छोटा मुलगा दोन वर्षांचा असतानाच वारले." अखेर सुधाने आपल्या विस्कळीत मनातील दुःख सांगितलं, पण ते ऐकून कमला मावशींचे डोळे मोठे झाले होते.

सुधा मागे वळून न पाहता लगेच तिच्या खोलीकडे निघाली. नवऱ्याचा विषय निघताच तिचं मन भरून आलं होतं. पाणावलेले डोळे साडीच्या पदराने पुसत ती तिच्या खोलीत गेली. मात्र ती विधवा असल्याचं समजताच कमला मावशी संतापल्या होत्या.

"शिव शिव शिव शिव शिव! एका विधवेचे पाय माझ्या घराला लागले. आता कसं होईल माझ्या घराचं? कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी आधी चौकशी न करता तिला माझ्या घरात घेतलं देव जाणे! माझा नवरा आधीच अंथरुणाला खिळून आहे. त्यात ही अपशकुनी बया माझ्या घरात येऊन गेली. आता लगेच हे मी सरपंचांच्या कानांवर घालते. त्याआधी घरात गोमुत्र शिंपडते. देवा परमेश्वरा, माझ्या नवऱ्याचं रक्षण कर रे!" कमला मावशी लगातार देवाचा धावा करत होत्या.

त्यांची भीती इतकीच होती, की एका विधवेचे पाय आपल्या घरात पडल्यामुळे आपल्या नवऱ्याला काही होऊ नये. ते आधीच अंथरुणात पडून होते. त्यात काही बरं-वाईट झालं तर?

असो, अशी कुजलेली मानसिकता घेऊन कमला मावशी सगळ्या घरात गोमुत्र शिंपडत होत्या. आता गावच्या सरपंचांना आणि गावकऱ्यांना समजलं तर काय होईल? पाहूयात पुढील भागात.