Login

विधवा : एक प्रेरणादायी स्त्री (भाग २)

ही कथा आहे एका अशा विधवा स्त्रीची, जी आत्मविश्वासाने स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी उभी राहते. गावात आल्यानंतर अगदी तीनच दिवसांत 'विधवा एक कलंक असते' असं मानणाऱ्या लोकांच्या मनातील कलुषित विचार नष्ट करते. तिलाही समाजात ताठ मानेने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे पटवून देते. सौ. जानकी नारायण कटक लिखित तिने केलेल्या समाज परिवर्तनाची ही 'विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.' कथा नक्की वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.


              सुधा आपले डोळे पुसतच तिच्या खोलीमध्ये आली. आपले ओले डोळे आपल्या मुलांना दिसणार नाहीत याची तिने पुरेपूर काळजी घेतली होती. खोलीत आल्याबरोबर तिने मुलांसाठी शिरा बनवायला घेतला. मुलेही भुकेने व्याकुळ झाली होती. तिने दोघांना आवडतो तसा शिरा बनवला आणि त्या दोघांना वाढला.

"अजय, तू लगेच इथल्या शाळेत जा. विजयच्या दाखल्यासाठी चौकशी करून ये." अजय जो सुधाचा मोठा मुलगा होता त्याच्यावर तिने ही जबाबदारी सोपवली.

"आई, अगं तूही तिथे असायला हवं." अजय कचरत म्हणाला, कारण त्याच्यावर पहिल्यांदाच तिने अशी मोठी जबाबदारी दिली होती.

"मला जरा ही साफसफाई आवरायची आहे बाळा. बराच वेळ शाळेत जाणार त्यामुळे मला लगेच यायला जमणार नाही. मी तासाभरात तिकडे येईन." ती प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"ठीक आहे आई. विजय, आवर पटकन. लवकर जाऊन येऊ." अजय घाईत शिरा खात म्हणाला.

"हळू खा. आज जाऊन फक्त चौकशी करायची आहे." सुधा हसून म्हणाली.

अजय आणि विजय आपापलं आवरून शाळेकडे जायला निघाले. शाळा त्या चाळीपासून १० मिनिटांच्या अंतरावरच होती. तिथे फक्त पाचवी ते दहावीपर्यंतच शाळा होती. विजयच्या जुन्या शाळेचा दाखला दोघांनी सोबत घेतला होता.

शाळेच्या आवारात पोहोचताच तिथे असलेली अस्वच्छता दोघांच्या नजरेस पडली. जागोजागी कचरा होता. शाळेत मुलांपेक्षा जास्त कचऱ्यांचीच गर्दी होती. शाळा नेमकी मुलांची की घाणीची? असा प्रश्न नक्कीच पाहणाऱ्याला पडणार होता. मुलांना जेवताना कंटाळा आला किंवा खाऊन उरलेला डबा शाळेसमोरच्या छोट्या-छोट्या झुडूपांमध्ये रिता केला जात होता. त्याचा उग्र वास दोघांच्या नाकात शिरताच त्यांनी नाकावर हात ठेवला.

"दादा, किती घाण आहे इथे!" लहानगा विजय नाकावर हात ठेवून म्हणाला.

"जाऊ दे विजू, आपल्याकडे पर्यायही नाही रे." अजय त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला पुढे घेऊन जात म्हणाला.

"इथल्या लोकांना याचा त्रास होत नसेल का? मला तर एक मिनिटही थांबावं वाटत नाहीय. मला नाही शिकायचं दादा इथे." विजय चालता चालता थांबत म्हणाला.

त्यावर अजय काही बोलणार तेवढ्यात...

"कोण पाहिजेत रे तुम्हाला?" एका माणसाने त्या दोघांना पाहून त्यांच्याजवळ येत विचारलं. कपड्यांवरून तो तिथला शिपाई दिसत होता.

"आम्हाला मुख्याध्यापकांना भेटायचं आहे. माझ्या भावाचा या शाळेत दाखला घ्यायचा आहे." अजय विजयचा हात धरत म्हणाला.

"ठीक आहे. मी इथला शिपाई आहे. मी तुम्हाला मुख्याध्यापकांच्या केबिनकडे घेऊन जातो. या माझ्या मागे." शिपाई त्यांना आपल्यासोबत यायला सांगत होता, मात्र विजय अजयकडे पाहून नकारार्थी मान हलवत होता.

"तुला शाळा शिकून मोठं व्हायचं आहे विजू. आपल्या आईचं, माझं आणि तुझं स्वतःचं नाव मोठं करायचं आहे. मी पण केलं आहे ना. आता तुझी बारी!" अजय त्याची समजूत घालत होता. आपल्या आईसाठी आणि भावासाठी मग तोही जायला तयार झाला.


****************************


"इतक्या महिन्यांत कधीच कुठल्या विधवा स्त्रीचा पाय आपण आपल्या गावात पडू दिला नाही. हीच बया कशी काय आली काही कळेना! सरपंच, ती अवदसा आधी गावातून हाकलून लावा. माझा नवरा आधीच मरणाच्या दारात उभा आहे." कमला मावशींनी घरात गोमुत्र शिंपडून झाल्यावर आधी सरपंचांचं घर गाठलं होतं.

सरपंचांच्या सांगण्यावरून पंधराच मिनिटांत पंचायत बसवून संपूर्ण गावाला गोळा केलं होतं. गावकरीही एक विधवा स्त्री गावात आली म्हणून घाबरले होते आणि सरपंचांच्या आश्रयाला आले होते.

"पण असं घडलंच कसं? आपल्या गावातले नियम गावाच्या बाहेरही सर्वांना माहित आहेत, मग त्या बाईलाच कसं माहित नाही? नक्की कुठून आली आहे ती?" सरपंचांनी नाकपुड्या फैलावत विचारलं.

"मी एवढं खोलात विचारलं नाही."

"मग मुलबाळ, नवरा हे बरं विचारायचं सुचलं." सरपंच करारी आवाजात म्हणाले, तशी कमला मावशींनी मान खाली घातली.

"आत्ताच्या आत्ता त्या बाईला गावातून घालवावं लागेल. अजून कुठला अनर्थ घडायला नको. चला तिच्या घरी." सरपंच खुर्चीवरून उठत म्हणाले.

"सरपंच, ती बाई गावातल्या शाळेकडे गेली आहे. तिच्या छोट्या मुलाचा दाखला घ्यायचा आहे म्हणे तिथे." कमला मावशींनी मिळालेली माहिती सांगितली.

"मग शाळेतच जाऊन अडवू. तिला इकडे येऊ द्यायचं नाही आपण." सरपंच म्हणाले, तसा सर्वांनी होकार दिला.


****************************


"अरे देवा! मलाच उशीर झाला वाटतं." सुधा भरभर पावलं उचलत स्वतःशीच पुटपुटली.

काहीच वेळात ती शाळेजवळ पोहोचली. तिथे पोहोचताच तिचीही अवस्था तशीच झाली, जशी तिच्या मुलांची झाली होती. पटकन तिचा हात तिच्या नाकावर पोहोचला होता. ती दुर्लक्ष करून शाळेत जायला निघाली.

"ओ बाई थांबा." मागून धारदार आवाज कानी पडताच तिने मागे वळून पाहिलं.

सरपंच, कमला मावशी आणि पंधरा-वीस गावकरी तिच्या पाठोपाठ तिथे पोहोचले होते. बाकीच्यांना नंतर सगळं घडलेलं कळणारच होतं, म्हणून सगळे सोबत आले नव्हते. त्या सर्वांमध्ये कमला मावशी सोडल्या तर इतर कोणी तिच्या ओळखीचं नव्हतं. आधीच वासाने गुदमरत होतं, त्यात या लोकांनीही तिथेच अडवलं होतं.

"आपण मला आवाज दिला का?" तिने न समजून विचारलं.

"तुमच्याशिवाय कोण आहे इथे?" सरपंचांनी तिरकसपणे विचारलं. ते तिलाही जाणवलं.

"माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही." त्यांचं बोलणं जिव्हारी लागूनही ती अदबीने त्यांच्याशी बोलत होती.

"मी कडुबा साळवे, या गावचा सरपंच आहे. आज आमच्या गावातला नियम मोडला आहे तुम्ही." सरपंच स्वतःची ओळख करून देत म्हणाले, पण तिला आत्ताही त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता.

"मी कसला नियम मोडला आहे? मला तर काही माहित नाही."

"आसपासच्या सगळ्याच गावांना आमचा महत्त्वाचा नियम माहित आहे. मग तुम्हाला कसा माहित नाही?" सरपंचांनी कपाळावर आठी पाडून विचारलं.

"गावांना माहित आहे ना, पण मी तर शहरातून आले आहे."

यांचं संभाषण सुरू होतं, तेव्हाच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्गातील मुलांना शांत बसवून बाहेर आले होते. अजय आणि विजयही आपल्या आईला पाहून तिच्याजवळ येऊन उभे राहिले होते. दोघेही घाबरले होते.

"मग या गावात येण्याआधी तुम्ही इथला नियम माहित करून घ्यायला हवा होता. माहित झाल्यावर तुम्ही इथे येण्याची हिम्मत केली नसती."

"नक्की काय झालं आहे? मुद्द्याचं बोला." आता तीही चिडली होती. आपली नक्की चुकी काय? हे तिने हाताची घडी घालत विचारलं.

"या गावात एक विधवा स्त्री प्रवेश करू शकत नाही. विधवा स्त्री या गावासाठी अपशकुनी ठरते." सरपंचांनी सांगितलं, तशी तिच्या हाताची घडी सैल झाली आणि डोळे मोठे झाले.

"काय!?" तिच्यासाठी ते धक्कादायक होतं.

"होय, याआधी एका विधवा स्त्री मुळे गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. जेव्हा कधी विधवा स्त्री गावात राहील, तेव्हा अपशकुन घडतंच. आणि आता गावाच्या भल्यासाठी आम्हाला नाईलाजाने तुम्हाला इथून बाहेरचा रस्ता दाखवावा लागणार आहे."

"जग एवढी प्रगती करत आहे आणि तुम्ही अशा निरर्थक अंधश्रद्धांमध्ये अडकून पडलेला आहात?" सुधाने अविश्वासाने त्यांच्याकडे पाहून विचारलं.

"आम्हीही एवढा विचार करत नव्हतो. त्यावर विश्वास ठेवत नव्हतो. जेव्हा सर्वांसमक्ष घडलं, तेव्हा या गोष्टी खऱ्या आहेत हे जाणवलं. जर त्या माणसाने वेळीच लक्षात आणून दिलं नसतं, तर आजपर्यंत शंभर-दोनशे लोक गेले असते."

"होय सरपंच, आपल्या गावाच्या हितासाठी आपण एका विधवेला आपल्या गावात ठेवू शकणार नाही. त्याचसोबत त्यांच्या मुलालाही आम्ही शाळेत दाखला देऊ शकत नाही. ओ बाई, तुम्ही घेऊन जा तुमच्या मुलांना इथून." मध्येच एक शिक्षक सरपंचांच्या हो मध्ये हो मिसळवत म्हणाले.

शिक्षकांचं बोलणं ऐकून मुख्याध्यापकांनी वैतागलेले भाव चेहऱ्यावर आणले, कारण तेही या अफवेला मानत नव्हते. मात्र ते मध्ये बोलणार नव्हते, कारण सगळे सांगूनही न समजून घेणारे लोक होते.

सुधाला वारंवार विधवा म्हटलं जात होतं, त्यामुळे ती तीळ तीळ तुटत होती. तरीही आपल्या चेहऱ्यावर तसं न दाखवता ती खंबीर उभी होती.

"असं आहे तर! एक माणूस आला, त्याने तुम्हाला खोटी गोष्ट सांगितली आणि तुम्ही त्याला खरं मानलंत? कोण आहे तो माणूस? आत्ताच्या आत्ता त्याला माझ्यासमोर उभं करा." सुधा चिडून बोलत होती.

"तो माणूस गायब झाला आहे. एक विधवा स्त्री गावात आली आणि तो गायब झाला." सरपंचांनी घडलेली घटना सांगितली.

"एक अनोळखी व्यक्ती गावात आली, अंधश्रद्धा पसरवून गेली आणि तुम्ही विश्वास ठेवलात? तुमच्या या मानसिकतेवर मला मनापासून टाळ्या वाजवाव्याशा वाटत आहेत." उपहासाने म्हणत खरंच तिने टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

"हे बघा बाई, ते काहीही असो. तुम्ही आजच्या आज गाव सोडा." सरपंचांना तिच्या उपहासी बोलण्याने काहीच फरक पडलेला दिसत नव्हता.

"आणि जर मी नाही म्हटलं तर?" ती अजूनही माघार घ्यायला तयार नव्हती.

"तर मग आम्हाला जबरदस्तीने तुम्हाला गावातून हाकलावं लागेल." सरपंच रूक्ष आवाजात म्हणाले.


खरंच गावकरी सुधाला आणि तिच्या मुलांना जबरदस्ती गावातून हाकलून लावतील का? कळेलच पुढील भागात.