Login

विधवा : एक प्रेरणादायी स्त्री (भाग ३)

ही कथा आहे एका अशा विधवा स्त्रीची, जी आत्मविश्वासाने स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी उभी राहते. गावात आल्यानंतर अगदी तीनच दिवसांत 'विधवा एक कलंक असते' असं मानणाऱ्या लोकांच्या मनातील कलुषित विचार नष्ट करते. तिलाही समाजात ताठ मानेने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे पटवून देते. सौ. जानकी नारायण कटक लिखित तिने केलेल्या समाज परिवर्तनाची ही 'विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.' कथा नक्की वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.
        


                सरपंचांचं बोलणं ऐकून सुधाने पर्समधून मोबाईल बाहेर काढला. सर्वांकडे एक कटाक्ष टाकून तिने मोबाईलमध्ये काहीतरी करायला सुरुवात केली. उपस्थितांना ती नेमकं काय करत आहे हे समजत नव्हतं. तिची थंड प्रतिक्रिया पाहून सर्वांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या.

"तुमच्यापैकी कोणाला त्या माणसाचा चेहरा लक्षात आहे का ज्याने ही अंधश्रद्धा गावात पसरवली होती?" मोबाईल पुन्हा पर्समध्ये ठेवत तिने सर्वांकडे पाहून विचारलं.

"आम्ही सर्वांनी पाहिलं आहे त्याला." यावेळीही सरपंचांनीच उत्तर दिलं.

"मला एक चित्रकला वही आणि पेन्सिलची आवश्यकता आहे. मिळू शकेल?" तिने पाठीमागे वळून मुख्याध्यापकांकडे पाहून विचारलं.

त्यांनी होकारार्थी मान डोलावली. शिपायाला स्टाफरूममधून चित्रकलेची वही आणि पेन्सिल आणायला सांगितली. शिपायाने आणून तिच्यासमोर धरली. सुधाने ती हातात घेतली आणि सरपंचांना पुढे यायला सांगितलं. तिला बसण्यासाठी खुर्चीही आणली गेली.

"तुम्ही आता त्या माणसाचं वर्णन सांगा." यावरून सर्वांना समजलं होतं की ती त्या माणसाचं चित्र काढणार आहे.

"हे सर्व करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे बाई?" सरपंचांनी विचारलं, तशी ती किंचित हसली.

"विधवा या गावासाठी अपशकुनी नाही, हे सिद्ध करायचं आहे मला. तुम्ही फक्त मला त्या माणसाचं वर्णन सांगा." सुधा त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून उत्तरली. मग सरपंच ती विचारेल तसे ते सांगत होते.

सुधा एक उत्तम चित्रकार होती. जसे सरपंच सांगत होते तशी ती वर्णन त्या कोऱ्या कागदावर उतरवत होती. त्या चित्राचं ती काय करणार आहे? हा प्रश्न सर्वांना भेडसावत होता. तिने नाक आणि डोळे रेखाटले होते, तेवढ्यात तिथे पोलीसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. अचानक आलेले पोलीस पाहून गावकरी घाबरले.

"बाई, आम्ही तुम्हाला गावातून जायला सांगितलं तर तुम्ही थेट पोलीसांनाच इथे बोलावलं?" सरपंचांनी घाबरून विचारलं.

"मी इतकीही निष्ठुर नाही सरपंच. पोलीसांना मीच बोलावलं आहे, पण वेगळ्या कारणासाठी." ती सरपंचांशी बोलतच होती की तेवढ्यात इन्स्पेक्टर तिच्याजवळ येऊन उभे राहिले.

"काय झालं सुधा आत्या? तुम्ही मला ताबडतोब इथे का बोलावलंत?" जसा तो तिच्यासोबत बोलत होता, त्यावरून तो तिच्या ओळखीचा वाटत होता.

आणि होताही ओळखीचाच. तो तिच्या शाळेतल्या मित्राचा मुलगा होता. प्रथमेश जाधव असं त्याचं नाव. सुधा आणि प्रथमेशचे वडील दोघांनी लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत एकत्रित शिक्षण घेतलेलं होतं.

दोघांनी एकमेकांना भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्यात बांधून घेतलेलं होतं, त्यामुळे प्रथमेश तिला आत्या म्हणत होता. तो या गावाशेजारी असलेल्या छोट्या शहरात पोलीस अधिकारी होता. तिथून इकडे यायला त्याला २० मिनिटे लागली होती. आल्याबरोबर त्याने तिला काय झालं म्हणून विचारलं होतं.

"मला तुझी छोटीशी मदत हवी आहे प्रथमेश." असं म्हणत तिने घडलेली घटना आणि त्यामागचं कारण असलेली ती अंधश्रद्धा सांगितली.

"हे मी सुद्धा ऐकलं आहे आत्या, पण माझा यावर मुळीच विश्वास नाही. यामध्ये तुम्हाला माझी जी मदत हवी आहे ती मी करायला तयार आहे." प्रथमेशने मदत करायला होकार दिला.

"थोडा वेळ थांब." तिने त्याला थांबायला सांगून चित्र रेखाटण्यावर लक्ष केंद्रित केलं.

सरपंचांनी सांगितलेल्या वर्णनावरून तिने हुबेहूब त्या माणसाचं चित्र रेखाटलं होतं. तिने तो कागद सरपंचांसमोर धरला.

"हाच आहे तो माणूस?" इतका वेळ फक्त ते सांगत होते तशी ती रेखाटत होती, त्यामुळे तिने तो कागद त्यांच्यासमोर धरून खात्री करण्यासाठी विचारलं.

"हो, हाच आहे." सरपंचांनी सांगितलं. मग तिने तो कागद प्रथमेशकडे दिला.

"प्रथमेश, हाच माणूस आहे तो ज्याने या गावात विधवा अपशकुनी आहे अशी अफवा फैलावली होती. याचा शोध घे. मला याला गावकऱ्यांसमोर उभं करायचं आहे आणि त्याला जाब विचारायचा आहे." सुधा म्हणाली, तसे गावकरी अवाक झाले.

आत्तापर्यंत या गावात कोणीही असा विचार केला नव्हता. कोणीही तो माणूस खरंच सांगत आहे की फक्त अफवा पसरवली आहे याची माहिती काढण्याची तसदी घेतली नव्हती. आज पहिल्यांदाच कोणीतरी... कोणीतरी म्हणण्यापेक्षा, एका विधवा स्त्रीनेच ठाम पाऊल उचललं होतं.

"ठीक आहे आत्या. पुढच्या दोन दिवसांत तुम्हाला कळवतो." प्रथमेश किंचित हसून म्हणाला आणि लगेच तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर तिने गावकऱ्यांवर नजर टाकली.

"प्रथमेश दोन दिवसांची मुदत घेऊन गेला आहे. आता या दोन दिवसांत मलाही पहायचं आहे कुठला अपशकुन घडतो ते. खरंच जर माझ्या येण्याने इथे काही वाईट घडलं, तर मी स्वतः हे गाव सोडून निघून जाईन. पुढच्या दोन दिवसांनी याच वेळेला आपण तुमच्या बैठकीच्या ठिकाणी भेटू सरपंच. येते मी." एवढेच बोलून सुद्धा आपल्या अजय विजयला घेऊन तिथून निघून गेली. ते तिघेजण जाताच बाकीचेही निघून गेले.


************************


                            *दोन दिवसांनंतर*

वेळ: दुपारी ३:३० वाजता.
स्थळ: सरपंचांची पिंपळाच्या झाडाखाली असलेली बैठक.


सुधा मधोमध उभी होती. तिच्यासमोर सरपंच तर खाली गावकरी बसलेले होते. सर्वजण वाटेवर नजर लावून होते. थोड्यावेळापूर्वीच प्रथमेशचा फोन आला होता. त्याने अफवा पसरवणाऱ्या माणसाला पकडलं होतं. त्याचा शोध लागताच त्याने फोन करून कळवलं होतं. तिने मग सरपंचांना सांगून बैठक बसवली होती. आता सर्वजण प्रथमेशच्या येण्याची वाट पाहत होते.

पाच मिनिटांनी पोलीसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. आवाज ऐकून सर्वजण उठून उभे राहिले.

"ओ काका, सरका बाजूला. जरा रस्ता द्या." हवालदार एका माणसाला हाताला धरून समोर येत म्हणाले.

त्यांच्यामागे प्रथमेश येत होता. त्या माणसाला पाहून सर्वांचे डोळे मोठे झाले होते.

"आत्या, हाच आहे तो माणूस. याला पकडून आम्ही चौकशी केली. याने ती अंधश्रद्धा पसरवली आहे हे मान्य केलं आहे. हा वेगवेगळ्या गावांत, शहरांत जाऊन लोकांना लुबाडत असतो. त्यांच्या भावनांशी खेळत असतो. वाईट गोष्टी लोकांच्या मनात भरत असतो. एका गावात तर याने मांत्रिक विद्या शिकवण्याचं आमिष दाखवून लोकांना फसवलं होतं. फक्त काडी लावून हा माणूस गायब होतो. याआधी आजूबाजूच्या गावात असलेल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये याच्याविरुद्ध तक्रार आहे, पण हा कधीच कोणाच्या हातात आलेला नाही." प्रथमेश जसा म्हणाला तसे सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले.

"हम्म... चालाख तर इतका आहे की दिवस रात्र वेश बदलून राहत असतो, त्यामुळे कुठल्याही गावातील पोलीसांना याला पकडण्यात यश आलं नाही. पण आमचे प्रथमेश साहेब याच्या दोन पाऊल पुढे आहेत. आमच्या साहेबांनी तुम्ही दिलेलं चित्र दाढी मिशी लावून रंगवलं, तेव्हा कुठे या भित्र्या सशाला आम्ही पकडू शकलो. कधी ना कधी याच्या कर्माचा घडा भरणारच होता." हवालदार पाठीमागून त्याची मान पकडत म्हणाले.

"आता हाच त्याचे कर्मकांड तुम्हा सगळ्यांसमोर मान्य करेल. बोल रे भाऊ पटकन. तिकडे जेलची हवा तुझी वाट पाहत आहे." हवालदार त्या माणसाकडे पाहून म्हणाले. त्यांचा स्वभाव जरा विनोदी होता, त्यामुळे ते त्यांच्या भाषेत बोलत होते.

"होय सरपंच, मी फक्त एक अंधश्रद्धा पसरवली होती. त्याचा वास्तव्याशी काही संबंध नाही. मला लोकांना घाबरवायला, त्यांच्या चेहऱ्यावरची भीती पाहायला मजा वाटत होती. प्रत्येक ठिकाणी मी असा डाव टाकत होतो की समोरच्याला ते खरंच वाटत होतं. कोणाला शंका येण्याआधी मी फरार होत होतो. या गावातही तसंच केलं होतं." त्याने स्वतःच्या तोंडून आपला गुन्हा कबूल केला, आणि ते ऐकून सरपंच व गावकऱ्यांचे डोळे मोठे झाले.


आता तरी सरपंच व गावकऱ्यांचे डोळे उघडतील का? पाहूयात पुढील भागात.