Login

विधवा : एक प्रेरणादायी स्त्री (भाग ४)

ही कथा आहे एका अशा विधवा स्त्रीची, जी आत्मविश्वासाने स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी उभी राहते. गावात आल्यानंतर अगदी तीनच दिवसांत 'विधवा एक कलंक असते' असं मानणाऱ्या लोकांच्या मनातील कलुषित विचार नष्ट करते. तिलाही समाजात ताठ मानेने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे पटवून देते. सौ. जानकी नारायण कटक लिखित तिने केलेल्या समाज परिवर्तनाची ही 'विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.' कथा नक्की वाचा.
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.


"मला वाटतं की हा पुरावा पुरेसा आहे तुम्हा सर्वांसाठी." सगळं समोर आल्यानंतर सुधा गावकऱ्यांवर आणि सरपंचांवर नजर टाकत म्हणाली, तशा गावकऱ्यांनी आपल्या माना खाली घातल्या.

"मी विधवा झाले यात माझा दोष नाही सरपंच. ज्याच्या आयुष्याचा कार्यभार संपतो, त्याला देहरूपी कुडीतून मुक्त व्हावं लागतं. यांच्यानंतर मी एकटी माझ्या दोन्ही मुलांना मोठं करत आहे. त्यांचं शिक्षण, त्यांना स्वावलंबी बनवण्याचं कार्य मी एकटीने हाती घेतलं. नवरा जाणे म्हणजे एका स्त्रीचा सर्वात मोठा आधारस्तंभ कोसळणे, पण त्याही परिस्थितीत एका स्त्रीने एकटीने जगण्याचा निर्णय घेतला की तिला अशा अडचणींचा सामना करावा लागतो."

"एक महिला विधवा असली तरी महिलाच आहे. तिलाही समाजात ताठ मानेने जगण्याचा आणि समाजात सर्वांसोबत वावरण्याचा अधिकार आहे, स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा अधिकार आहे, मग फक्त ती विधवा झाल्याने स्त्री राहत नाही असं कुठे आहे का? नाही ना? मग का एका विधवा स्त्रीला असं वागवलं जातं? कुठल्याही देवकार्यात असो की शुभ समारंभात असो आम्हाला खालचाच दर्जा दिला जातो, का तर आम्ही विधवा आहोत."

"लोक असा विचार करतच नाहीत की विधवा जरी असली तरी ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे. या सर्व नात्यांना पूर्णविराम लावला जातो जेव्हा ती विधवा होते. समाजाची अशी कुजलेली मानसिकता मला अजिबात पटत नाही."

"आज मी जे काही केलं ते या आधी कुठल्याही स्त्रीने किंवा कुठल्याही पुरुषांनी केलं नसेल, पण मला आज हे सहन झालं नाही म्हणून मी स्वतःसाठी ठामपणे उभी राहिले. माझ्यासारख्या अनेक अशा विधवा स्त्रिया आहेत ज्या आपल्या मुलांकडे पाहून जगण्याचा निर्णय घेतात, नाहीतर आपला नवरा गेल्याने प्रत्येक स्त्री खचत असते. तरीही ती समाजाची किंवा स्वतःची चिंता करत नसते. तिला चिंता असते ती फक्त आपल्या मुलांची आणि त्यांच्या भविष्याची."

"असो, माझा भूतकाळ विसरून मी माझ्या मुलांचं वर्तमान आणि भविष्य याकडे लक्ष देत आहे. आता ही पसरलेली अंधश्रद्धा पुन्हा डोकं वर काढणार नाही याकडे लक्ष द्या. एक सरपंच म्हणून खबरदारी घेणं, आणि एक रहिवाशी म्हणून जबाबदारी घेणं तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. येते मी."  आपल्या मनातलं सगळं मोकळं करून ती तिथून निघून गेली.

सुधा गेल्यानंतर प्रथमेशही त्या माणसाला घेऊन तिथून निघून गेला. आता फक्त सरपंच आणि गावकरीच तिथे उभे होते. दोन-एक मिनिटे तिथे शांतता पसरली होती. मग सरपंचांनी बोलायला सुरुवात केली.

"आजपासून गावात ही अंधश्रद्धा पाळली जाणार नाही. असे बाहेरचे लोक येऊन आपल्याच माणसांत मनभेद तयार करतात. इथून पुढे असं होणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घेऊयात. आज सुधा बाईंनी आपल्या डोळ्यांवरची पट्टी हटवली आहे. पुन्हा कधी अशी पट्टी बांधून घ्यायची नाही, असा निश्चय करूयात. आपल्यामुळे सुधा बाईंना आणि इतर स्त्रियांना याचा त्रास होता कामा नये." सरपंचांसोबत सर्व गावकऱ्यांनी मनापासून निश्चय केला.

सुधामुळे एका अंधश्रद्धेला आळा बसला होता. तिने त्या कलंकातून सगळ्या विधवा स्त्रियांची मुक्तता केली होती. या गावात येणारी कुठलीही स्त्री आता या अफवेला बळी पडणार नव्हती. इतरांप्रमाणे त्यांनाही मान दिला जाणार होता. एक विधवा म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून त्या बायकाही ताठ मानेने वावरू शकणार होत्या. 


***************************


वेळ: सकाळी १० वाजता.
स्थळ: शाळेसमोरचा परिसर.


शाळेच्या आवारात टाळ्यांचा गडगडाट झाला. शाळेतील शिक्षक समोरच्या स्टेजवर बसलेले होते, तर मुले खाली बसलेली होती. आज शाळेतील मुख्याध्यापक निवृत्त होणार होते. त्यांच्या निरोपासाठी आणि नवीन मुख्याध्यापकांच्या स्वागतासाठी छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचांनाही बोलावलं होतं. मुलांचे पालक म्हणजेच गावकरीही उपस्थित होते. विजयचा शाळेत दाखला झाला होता तर सुधा आणि अजयही आले होते.

"आज आपले मुख्याध्यापक माननीय श्रीकांत पाटील साहेब, आपल्या सर्वांचा आणि शाळेचा निरोप घेणार आहेत. त्यांनी आपल्या शाळेसाठी खूप जास्त योगदान दिलं आहे. त्यांच्या या कार्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करूयात. मी आपल्या गावचे सरपंच, आदरणीय कडुबा साळवे यांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या स्वहस्ते माजी मुख्याध्यापक श्री श्रीकांत पाटील साहेब यांचा सत्कार करावा." एक शिक्षक सूत्रसंचालन करत होते. त्यांच्या शेवटच्या वाक्यावर सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या.

सरपंच आणि मुख्याध्यापक खुर्चीवरून उठून समोर येऊन उभे राहिले. एका मुलाने शाल आणि नारळ सरपंचांच्या हातात दिलं. सरपंचांनी त्यांचा सत्कार केला आणि पुन्हा टाळ्या वाजल्या.

"मी मुख्याध्यापक साहेबांना थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो." असे म्हणत सूत्रसंचालन करणारे शिक्षक बाजूला झाले.

मुख्याध्यापकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मग वेळ आली ती नवीन मुख्याध्यापकांचं स्वागत करण्याची.

"तर, आता आपण आपल्या नवीन मुख्याध्यापकांचं स्वागत करूयात. मी स्वतः त्यांचं नाव जाहीर करणार आहे, कारण वरून आदेश होता की समारंभापर्यंत त्यांचं नाव जाहीर होऊ नये. आज ती वेळ आली आहे."

नवीन मुख्याध्यापक कोण आहेत हे फक्त माजी मुख्याध्यापकांनाच माहित होतं. वरून आदेश असल्यामुळे शाळेतल्या शिक्षकांना नाव न सांगता फक्त कल्पना दिलेली होती. आता सर्वांनाच नवीन मुख्याध्यापकांचं नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.

"आपल्या शाळेच्या नवीन मुख्याध्यापिका आहेत... श्रीमती सुधा महादेव शास्त्री!" जसं नाव जाहीर झालं, तसे सरपंच, शिक्षक आणि गावकरी आश्चर्यचकित झाले.

'काय!? सुधा आणि मुख्याध्यापिका?'