ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५.
जलद लेखन.
शीर्षक - विधवा : एक प्रेरणादायी स्त्री.
सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. आश्चर्यानेच टाळ्या वाजवत होते. सरपंचांचीही तीच अवस्था होती. सुधा मात्र आपल्या चेहऱ्यावर हलकंसं हसू घेऊन स्टेजवर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. तिचंही शाल-श्रीफळ देऊन स्वागत केलं गेलं. गावकऱ्यांना भानावर यायला बराच वेळ लागला. मग वेळ आली ती तिच्या मनोगताची.
"नमस्कार, मी सुधा महादेव शास्त्री! या प्राथमिक विद्यालयाची नवीन नेमलेली मुख्याध्यापिका. खरं तर हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. मी फक्त एक शिक्षिका होऊन मुलांना शिकवण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं, पण मुख्याध्यापक हे पद स्वतःहून चालून आलं होतं. शिक्षिका ते मुख्याध्यापिका, असा हा प्रवास खूप काही शिकवून गेला. चांगले-वाईट अनुभव आले. पुढेही काही अनुभव येतीलच."
"एक सर्वात मोठा अनुभव मला आला. आयुष्यात सगळं संपलं असं वाटलं होतं. तेव्हा माझ्या स्वर्गवासी पतींचे शब्द मला उभारी देत होते. ते नेहमी म्हणायचे की, 'सुधा, आयुष्यात सुख-दुःख दोन्ही येणारच. जो फक्त सुखात रमतो, त्याचं मन बळकट होत नाही; पण जो दुःखातून जातो, तो अधिकाधिक विकासित होतो. कुठलंही, कितीही मोठं संकट आलं तरी हार मानू नकोस. ते संकटच तुला पुढे जाण्यासाठी बळ देईल.' आजही त्यांचे हे शब्द जसेच्या तसे मनात कोरलेले आहेत."
"आपण स्वतःवर विश्वास ठेवला की कुठल्याही परिस्थितीत यश मिळणारच. कितीतरी कडू आठवणी मनात रुंजी घालत असतात, पण त्यातूनही काहीतरी गोड निर्माण करण्याचं बळ एकटवलं पाहिजे. आपली हिम्मत, जिद्द, चिकाटी, एकाग्रता आपल्याला ते बळ देते. शिका, मोठे व्हा, इतरांनाही आपल्या ज्ञानातून शिकवा, आपल्या चुकांनाही स्वीकारा, त्या चुकांना सुधारा, तरच आयुष्य सुखकर होईल."
तिचं हे मनोगत नाही, तर प्रेरणादायी शिकवणीचे शब्द होते. खास करून हे शब्द गावकऱ्यांसाठी होते, कारण त्या एवढुल्या मुलांना ते शब्द काही समजणार नव्हते. तिने बोलून झाल्यावर आपली नजर गावकऱ्यांवर फिरवली. बऱ्याच जणांची नजर खाली झुकलेली होती. तेवढ्यात सरपंचांनी आणि माजी मुख्याध्यापकांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यात बाकीचेही सामील झाले.
खरंच, विधवा ही सुद्धा स्त्रीच असते. ती कोण, कशी आहे याला नाही, तर तिच्या अस्तित्वाला महत्त्व असतं. सुधासारख्या अशा कित्येक स्त्रिया आहेत, ज्या आजही या अशा मानसिक ताण देणाऱ्या समाजाला सामोऱ्या जात आहेत. सुधा त्यांच्यासाठी प्रेरणादायी उदाहरण होती. वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतं, की सुधा ही फक्त कथेपुरतीच प्रेरणादायी आहे.
समाप्त!
सौ. जानकी नारायण कटक.
सौ. जानकी नारायण कटक.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा