विधिलिखित ऋणानुबंध भाग -४ अंतिम. काल एक चित्रपट बघताना एक छान वाक्य समोर आलं. त्या एका छोट्या वाक्यात खूप सारा अर्थ दडलेला होता. ते ऐकलं आणि पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो. ते वाक्य होतं, प्रत्येकाचे स्वतःचे नशीब असते परंतु कोणीही त्याचे अनुसरण करण्याचा निर्णय घेत नाही. हे वाक्य ऐकून मनात विचारांचा कल्लोळ सुरु झाला. विधिलिखित म्हणतो ते प्रत्येकाचं वेगळं असतेच. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्याचा अंदाज ना आजवर कोणाला आला न कधी येईल. नशिबाचा खेळ असं म्हणत आपण पुढे चालायला तर लागतो पण नशीब घडवता ही येतं हे पण तितकच खरं. आपण काय निवडायचं हे मात्र आपण ठरवायचं. जन्माला येताना प्रत्येक जीव स्वतःच असं विधिलिखित घेऊन जन्माला येतो. ना तो स्वतःचे आई-वडील निवडू शकतो ना स्वतःची भावंड. ना आपलं कुटुंब निवडू शकतो ना आपला धर्म आणि देश. आयुष्यात खूप कमी गोष्टी असतात की ज्या आपण निवडू शकतो. पण जेव्हा ती निवडण्याची वेळ येते तेव्हा खरच आपण निवडतो का? आयुष्यात बघितलेली स्वप्न असो वा आयुष्यात आलेली व्यक्ती असो प्रत्येकवेळी आपण ती निवडतोच असं नाही. घडाळाच्या काट्यावर आणि समाजाच्या साच्यात बंदिस्त केलेल्या आयुष्यात अनेकदा ते निवड करण्याचं आपण एकतर टाळतो तरी किंवा दुसऱ्याच्या भरवश्यावर सोडून तरी देतो. मात्र हाच निर्णय आपला असताना सुद्धा आयुष्यात समाधानी नसल्याचं खापर मात्र आपण नशिबावर फोडतो. कधी कधी नशिबाचे फासे उलट ही पडतात पण सहजासहजी मिळेल असं आयुष्यात काहीचं नसतं. जिकडे आईच्या उदरातून जन्माला यायला ९ महिने लागतात. एका नवीन जिवाला जन्म देताना होणारा त्रास तर न शब्दात न मावणारा तिकडे बाकीच्या गोष्टी सगळ्याच फिक्या. विधिलिखित असं काही असते तर ह्याच उत्तर हो पण आहे नाही पण. विधात्याने जन्माला येताना प्रत्येकासाठी वेगळा साचा ठेवलेला असतोच. जिकडे रंग, रूप, शरीर एकसारखं दुसरं असतं नाही तिकडे विधिलिखित तरी एक कसं असणार? त्यानेच प्रत्येकाचं विधिलिखित त्याच सोबत लिहलेलं असते. फरक इतकाच की त्या नशिबाला आपलं आयुष्य बनवायचं का नाही हा निर्णय मात्र ज्याचा त्याने घ्यायचा असतो. नशीब घडवणारे वेगळेच असतात. ते निर्णय घेतात आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याचा, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या पदरात पडून घेण्याचा त्यासाठी वाटलं तर समाजाच्या भिंती उखडून टाकतात, चालीरीती बदलवून टाकतात. ना काळ त्यांना थांबवू शकत ना वेळ. ते वाटचाल करत राहतात आपलं विधिलिखित स्वतःच्या हाताने लिहीत जातात. मध्ये काही आलं तरी आपल्या ध्येयापासून त्यांना कोणी परावृत्त करू शकत नाही. अश्या वेळी एकच मार्ग उरतो तो म्हणजे आपल्याला वाटते तेच आयुष्य जगण्याचा. ज्याला आपण नशीब किंवा विधिलिखित म्हणतो. विधिलिखित असणं हे जरी मान्य केलं तरी ते जगायला लागणारा निर्णय मात्र आपणच घ्यायचा असतो. तो निर्णय घेण्याची पात्रता ही आपणच आत्मसात करायची असते. जे लोकं ती आत्मसात करतात त्यांच नशीब पालटायला वेळ लागत नाही. त्यांच आयुष्य समृद्ध व्हायला खोट्या कुबड्यांची गरज लागत नाही न समाधानाचे क्षण मिळवण्यासाठी त्यांना गोष्टी विकत घेण्याची गरज पडते. कारण विधिलिखित (नशीब) फुटकं असलं तरी त्या फुटलेल्या नशिबातुन पण अंकुर उगवायची पात्रता आपल्या अंगी निर्माण केली तर आयुष्यच विधिलिखित आपण आपल्याच हाताने लिहू शकतो नाही का? रुक्मिणीच्या माध्यमातून इतकेच सांगायचे आहे की, जगाच्या काना कोपऱ्यात कोठीही रहा ज्याच्याशी तुमची ओळख होणार आहे ती माणसे तुम्हाला कधी ना कधी नक्की भेटतील ... आणि त्या माणसाशी तुमचे नाते असे असते की तुम्ही त्याच्या खुप जवळचे होतात...कदाचित यालाच विधिलिखित ऋणानुबंध म्हणत असतील...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा