विधिलिखित ऋणानुबंध भाग-१ या जगाची लोकसंख्या सातशे कोटींहून अधिक आहे.पृथ्वीवर एकाच वेळी सात खंडातील सर्व देशात राहणाऱ्या विविध जाती धर्म,आचार-विचार,भाषा,संस्कृती, प्रथा,परंपरा असलेल्या या करोडो माणसांना एकमेकांना पाहणं ओळख करुन घेणं अगदीच अशक्य आहे. फेसबुकच्या मदतीने जग तसं जवळ आलंय पण अजूनही ज्यांच्याकडे साधा बटनाचा नोकिया सुद्धा नाही त्यांच्यासाठी त्यांचं गावचं त्याचं विश्व असतं जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा और जाना कहाँ। पण आयुष्यात कधीतरी असं एखादं वळण येतं की गाडीला चाकोरी सोडून वर्तुळाबाहेर जाणं भाग पडतं . मग खूप मोठं असणारं जग आधी भयावह वाटू लागतं, वर्तुळाबाहेरच्या अनोळखी माणसांची भीती वाटू लागते सारंच अनपेक्षित आणि अनाकलनीय पण हळूहळू याच माणसात देव भेटतो आणि जगणं समृद्ध होतं. रक्ताच्या नात्याहून अधिक घट्ट नाती जोडली जातात सारंच जणू विधिलिखित.... अवघं आयुष्य क्षणात बदलून जातं. तिमिरातुनी तेजाकडे... प्रवास सुरू होतो. आता जग आपल्या गावापेक्षा खूप मोठं आहे हे कळतं.संत ज्ञानेश्वरांचं 'हे विश्वची माझे घर' आता थोडं थोडं कळू लागतं.. असंच काहीसं घडलं शिरांजणीच्या रुक्मिणीच्या बाबतीत शिरांजणी हे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक छोटंसं गाव या गावात रुक्मिणी तिची दोन मुलं व तिच्या पतीसह राहते.घरात अठराविश्वे दारिद्र्य.... मीठ आहे तर पीठ नाही तेल आहे तर तांदूळ नाही चंद्रमौळी घरातून दिवसा सूर्य आणि रात्री तारे सहज दिसतात पावसात एका कोपऱ्यात चौघांनी बसून रात्र काढायची आळीपाळीने घरात साठलेलं पाणी बाहेर काढायचं छत इतक्या ठिकाणी गळतो की खाली ठेवायला भांडी कमी पडतात मुळात घरात भांडीही मोजकीच कामापुरती थंडीत तीच अवस्था निवारा नावापुरता छताच्या, कुडाच्या छिद्रातून कडाक्याची थंडी बिनधास्त आत येऊन आतल्या जीवांना बधिर करून टाकते शिवाय परवर म्हणजे खालच्या शेणामातीने सारवलेल्या जमिनीला कायम लोणा म्हणजे ओल असते उन्हाळ्यात तर सूर्य जणू हिच्याच झोपडीवर आग ओकण्यासाठी आकाशात आलेला असतो पाच एकर कोरडवाहू शेती दुष्काळी पट्ट्यात सदैव निसर्गाची अवकृपा... शिंपी असल्याने कधीमधी शिलाईकामातून थोडेफार पैसे मिळतात.शिवणकाम तरी कशाचं तर लोकांचे फाटके - तुटके कपडे,तळवटं, कापडी पिशव्या यांच्या शिलाईतुन लोक जेवढं देतात तेवढं समाधानाने घ्यायचं आणि त्यातच घर चालवायचं खाणारी तोंड चार कमाई तुटपुंजी मुलांचं शिक्षण चालू तारेवरची कसरत तरीही कोणाविषयी कसलाच राग नाही, तक्रार नाही आहे ती चटणी भाकरी आनंदाने खायची आल्या दिवसाला तोंड द्यायचे भक्तिभावाने पूजाअर्चा करायची कितीही दुःख असलं तरी त्याचा बोभाटा करायचा नाही चेहरा नेहमी हसरा आणि आनंदी...कधीही दुःखाचा लवलेश नसणारा... तरीही नियतीला या चोकोनातलं चिमूटभर सुखसुद्धा पहावलं नाही आणि रुक्मिणी हळूहळू सतत आजारी पडू लागली.तिला सतत दम लागू लागला, ताप येऊ लागला. डोकेदुखी, थकवा,चक्कर गावातल्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे, इंजेक्शन दिले पण काहीच फरक पडेना देव देवऋषी करून झाले पण फरक काही पडेना आधीच खायची भ्रांत आणि त्यात हे दुखणं रुक्मिणीला चिंता वाटू लागली देव गरिबांच्या का मागे लागतो बरं... तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा हतबल होता. गावातल्या डॉक्टरांनी तालुक्याच्या डॉक्टरांकडे जायला सांगितले, मग तर अजून टेन्शन वाढलं... मोठया डॉक्टरकडे जायचं तर जास्त पैसे लागणार होते, ओळखीच्या लोकांकडून उसने पासने करून दोघे हिमायतनगरला गेले तिथं डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना शंका आल्याने सोनोग्राफी करायला सांगितली....रिपोर्टनुसार तिच्या हृदयाची एक झडप निकामी झाली होती, ऑपरेशनचा खर्च दोन-अडीच लाख होता,, दोघांच्याही पायाखालची जमिन सरकली... त्यादिवशी दोघेही एकमेकाची नजर चुकवून अश्रूंना वाट मोकळी करून देत होते... क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा