विधिलिखित ऋणानुबंध भाग 2 उभ्या आयुष्यात त्यांनी इतके पैसे बघितले नव्हते, मग ऑपरेशन कसं होणार लहान लहान पोरांचं काय? जमीन विकली तर पोरांनी काय करायचं? रुक्मिणीला वाटू लागलं .....आता सारं संपलं,आपल्या आयुष्याची दोरी इतकीच होती म्हणायचं आणि नवऱ्याच्या मांडीवर डोकं ठेऊन पोरांना डोळे भरून पाहत शेवटचा श्वास घ्यायचा, नियती तिच्या जन्मापासूनच तिच्या हात धुवून मागे होती...हिच्या जन्मानंतर लगेच आई वारली,वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला, तेही मनोरुग्ण झाले, विषण्ण अवस्थेत एकदा त्यांनी रुक्मिणीला गोदावरी नदीत फेकण्याचा प्रयत्न केला होता पण आजीमुळे वाचली पुढे मामा मामीनी सांभाळलं पण सतत तिरस्कारच वाट्याला आला,शाळेचं तोंडही तिला कधी पाहता आलं नाही. तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं पण जगात कुठेतरी प्रेम जिवंत असतं ते तिला नवऱ्याकडून मिळालं, तिचा फक्त नवराच नाही तर तो आई आणि बापसुद्धा झाला वेदांत आणि वेदिका नावाची दोन गोंडस मुलं होती.चटणी भाकरी खाऊन सुध्दा ते त्यांच्या राजमहालात सुखी होते पण अचानक हे काय झालं..... रुक्मिणीच्या डोळ्यांची धार थांबेना,तब्येत सतत बिघडू लागली,त्रास वाढू लागला, तिचा नवरा कुठे पैशांची तरतूद होते का ते पाहू लागला, पाहुणे रावळे, शेजारी पाजारी, गावकरी, सर्वांकडे हात पसरून झाले पण पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडली, पण म्हणतात ना ' देव तरी त्याला कोण मारी' तिच्या नवऱ्याला अहमदनगर मधील शिर्डीच्या साई धर्मादाय हॉस्पिटल ची माहिती मिळाली, देव त्यांच्या मदतीला धावून आला, सर्व तपासण्या झाल्या,आणि डॉक्टर सावंत यांनी तिचं ऑपरेशन केलं, ऑपरेशन यशस्वी झालं,निशुल्क झालं,पण तरीही धोका पूर्णपणे धोका टळलेला नव्हता,अजूनही तीन वर्षे परीक्षा होतीच,याच ठिकाणी तिची आणि माझ्या चुलत्यांची भेट झाली,तिने तिची कर्मकहानी सांगितली,दुःखच दुःखाला समजून घेऊ शकतं, माझ्या चुलत्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे, पण त्याचं ऑपरेशन होऊ शकलं नाही, बोलता बोलता ओळख झाली,माझ्या चुलतीने तिचा मोबाईल नंबर घेतला,अधूनमधून त्यांचं फोनवर बोलणं व्हायचं पण त्या चुलत्यांच्या मुलीच्या लग्नाला रुक्मिणी पैसे साठवून साठवून ठेऊन आहेर घेऊन कधीही साधं नावसुद्धा माहिती नसलेल्या आमच्या गावी आली,आणि तिथूनच आमच्यामध्ये माणूसकीच्या धाग्यांनी बनलेलं नातं तयार झालं. तिने तिची कहाणी सांगितली तेव्हा अक्षरशः मी कितीतरी वेळ रडत होते,जगात किती दुःख आहे याची जाणीव झाली, साने गुरुजींचा खरा धर्म आठवला,माझं संवेदनशील मन स्वस्थ बसेना मी मला शक्य आहे तेवढी मदत तिला केली.नविन साड्या,स्वेटर तिच्या मुलांना कपडे,डाळी,थोडेसे पैसे दिले. आज मला देवाने ताई दिली म्हणत ती माझ्या गळ्यात पडत रडत होती.मला तिच्या गावी यायचं आमंत्रण देत होती तेव्हापासून माझी आठवण आली की मिसकॉल देते मग मी तिला फोन करते ख्याली खुशाली तब्येत हवापाणी विचारून झालं की ती मला कधी एखादा अभंग तर कधी एखादा पाळणा म्हणून दाखवते.मी तिचं तोंडभरून कौतुक करते अगदी लहान मुलांसारखी निरागस आहे एक दोन वेळा तिला औषधांसाठी पैसेही पाठवले. काही दिवसांनी जेव्हा कोरोनाची लाट आली तेव्हा तिचा फोन आला हॅलो ताई....कुठे आहे तिकडं कोरोना आलाय का ? भाऊजीची, लेकरांची काळजी घे,माझ्या माहेरच्या,सासरच्या लोकांची ख्याली खुशाली विचारली मी पण तिला घरात राहण्याचा सल्ला दिला. आता मोठा मुलगा दहावी झालाय....शिलाईकाम शिकलाय.. स्मार्टफोन घेतलाय त्याच्यावरून मला व्हिडिओ कॉल केला. घर दाखवलं आणि हो ऑपरेशनच्या वेळी औषधोपचारासाठी मंगळसूत्र मोडलं होतं आता शेतातील सोयाबीनवर जवळजवळ 5 वर्षांनी नवीन घर घेतलंय मंगळ सुत्र पण खरेदी केले ते पण मला दाखवत होती....चेहऱ्यावर प्रसन्न हास्य...तिने आजवर इतकं दुःख सहन केलंय की यापुढे दुःखाला सुद्धा तिच्याकडे जायची लाज वाटेल. अशी ही साधीभोळी, निरागस रुक्मिणी...विधिलिखित ऋणानुबंध असावेत कदाचित शेवटी इतकंच सांगेन.... क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा