Login

विधिलिखित ऋणानुबंध भाग 3

Vidhilikhit runanubandh

विधिलिखित ऋणानुबंध भाग -३                                                                                      आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाचच आलेली नसतात... प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं .कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. मला वाटतं ते विधिलिखित असावं.कुणाची एंट्री व्हावी आणि कुणाची एक्झिट याचा पण काळ टायमिंग नक्की असावं.जोडया स्वर्गात बनत असल्या तरी डिव्होर्स हा जमिनीवर होतो हे विसरून चालणार नाही. याच व्यक्तीशी आपली ओळख का होते ? यांच्याशी का पटत नाही? का ह्याच्या बरोबर जमतं ?न बोलता याला सारं कसं उमजतं यांचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही.                                                                                                   मग जी नाती रक्ताची नसतात ती शेवटापर्यंत कायम का राहतात याचं उत्तर आपल्याकडेच असतं.नात्यात व्यवहार आला कि प्रेमाचा, सहानुभूतीचा, वात्सल्याचा पापुद्रा हळूहळू उडू लागतो आणि तो सगळा उडाल्यावर झीज सुरु होते नात्याची. रंग केव्हाच उडून गेलेले असतात. एक घाव दोन तुकडे या नाटकाचे पडदे केव्हाच उघडलेले असतात आणि मग जेव्हा नाटक सुरु होतं त्याला अंक आणि अंत नसतो. हतबलतेशिवाय बाकी हातात काहीच उरत नाही. ऑल इज कर्मा. आपल्याला, समोरच्याला काय दुर्बद्धी सुचते आणि ती गोष्ट सुरु होते. नकळत, जाणूनबुजून, सारासार विवेक बाजूला ठेवून निव्वळ समोरच्याला संपवायची भाषा सुरु होते. कली आपलं काम चोख बजावत असतो. जी नाती तयार होतात ती आपण जिवापाड जपावी.. आपल्या जगण्यासाठी ज्या ऑक्सिजनची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपलं माणसं ... शेवटी जे जगमान्य काय आहे गिव्ह अँड टेक पॉलिसी.सच्च्या मनाने हिचा प्रीमियम भरला तर रिन्यूअल आपोआप होत जातं. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं.मन जुळलं की आपलेपणाचं नातं होते...अट एकच आहे ते वन वे नसावं.                                                                                            व. पु म्हणतात..प्रॉब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो. अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो …. ! या दोन्ही कोट्स साठी थंब रुल आहेत माणसं,आपली माणसं,जिवाभावाची माणसं,निरपेक्ष प्रेम,माणुसकी,सहानुभूती,आपुलकी,कणव, परोपकारता.. जिथे बॉण्डिंग स्ट्रॉंग असते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... ज्यांचे कान आणि मन दोन्ही हलके नसतात ते आलेल्या वादळाला सामोरं जाऊन आपलं संरक्षण करतात.आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्रांचे किंवा मैत्रीणीचे " मी आहे ना " एवढे शब्द संजीवनीसारखे काम करतात...                                                                                                               अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... एखाद्या कातर क्षणी तुम्हाला एखाद्याची उणीव वाटतं असेल कि या क्षणी हा किंवा ही आपल्याजवळ हवी असायला पाहिजे होती आणि नेमका त्याच वेळी त्याचा,तिचा फोन किंवा मेसेज येणं या सारखं सुख नाहीय.टेलीपथी बहुतेक यालाच म्हणत असावी. मेड फॉर इच अदर जरी बनता आलं नाही तरी मेड बाय इच अदर बनता आलं तरी खूप आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य ऐकलं होतं कि जर श्रीमंती मोजायची झाली तर आमच्या घराबाहेर जितक्या चपला असतात त्या मोजलं तर मला वाटतं कि माझ्याइतका श्रीमंत माणूस कोणी नसावा.'कठीण समय येता कोण कामास येतो ' आणि आला आणि त्याची कृतज्ञता ठेवली, जाणीव ठेवली तरी खूप आहे. पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण ..                                                                   क्रमशः

0

🎭 Series Post

View all